कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील शाळा,महाविद्यालये बंद आहेत. यंदाचे शैक्षणिक सत्र महिनाभर लांबले आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रार्दुभाव पाहता अजून किती महिने शाळा-महाविद्यालये सुरू होणार नाहीत, याची काहीच गॅरंटी सांगता येत नाही. देशातील विविध सरकारे ऑनलाईन शिक्षण द्यायला उतावीळ झाली आहेत. शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे,असे समजून विविध माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. रेडिओ-टीव्हीच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी खासगी वाहिन्यांवर काही तास आरक्षित करण्यात आले आहेत. 20 जुलै या तारखेपासून त्याद्वारे शिक्षण प्रक्रिया सुरू होणार आहे.
याशिवाय झूम, गुगल क्लासरूमच्या माध्यमातूनही शिक्षण प्रक्रिया सुरू केली जात आहे. महत्त्वाचे या माध्यमातून विद्यार्थ्यांची ई-हजेरी घेण्याचा घाट घातला जात आहे.
ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित झाल्यावर काही उत्साही, हौशी आणि लोभी शिक्षकांनी अशा प्रकारच्या शिक्षणाचे व्हिडीओ करण्याचा सपाटा लावला आहे. पहिली ते बारावी आणि पदवी शिक्षणाचे धडे देणारे हजारो-लाखो व्हिडिओ आज 'युट्युब'वर पडले आहेत. अजूनही त्यात मोठ्या प्रमाणात विविधांगी भर पडतच आहे. याशिवाय आता यात काही खासगी यंत्रणा (कंपन्या) उतरल्या असून ही मंडळीही जिल्हा परिषद किंवा मनपा यांच्याही सहमतीने उपलब्ध प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांकडून मोफत व्हिडिओ, ऑनलाईन शैक्षणिक साधने बनवून घेत आहेत. अर्थात यांमडळींनी सध्या ही सेवा मोफत पुरवली आहे. म्हणजे फक्त दोन महिन्यात हजारो-लाखो ऑनलाईन शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले आहे. अगदी प्रत्येक पाठ आणि त्याचे उपघटक या आधारावर असंख्य शैक्षणिक साहित्य तयार झाले आहे आणि होत आहे. एकीकडे असे पोत्याने शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत असताना दुसरीकडे फक्त 30 टक्के विद्यार्थी याचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. आणखी एक धक्कादायक बाब एका सर्व्हेक्षणातून पुढे आली असून जवळपास 27 टक्के विद्यार्थी त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाला मुकणार आहेत. अनेक विद्यार्थी आता घराला आर्थिक मदत व्हावी म्हणून कामाधंद्याला लागले आहेत. आधीच शिक्षणाची गोडी नसणारी मुले या प्रवाहातून बाहेर पडली आहेत. आश्रमशाळा, निवासी विद्यालये आणि पहिली-दुसरीचे विद्यार्थी या प्रक्रियेपासून लांब आहेत. त्यात घरच्यांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून संवेदनशील मुलांनी आत्महत्याही केल्या आहेत. वास्तव म्हणजे ऑनलाईन शिक्षण आजच्या घडीला फारसे उपयुक्त ठरताना दिसत नाही. मात्र ऑनलाईन शिक्षणाचा बाजार असा काही भरला आहे की,यापुढे आता शिक्षण फक्त ऑनलाईनच उपलब्ध होणार आहे, अशा थाटात त्याची तयारी जोमात सुरू आहे. या शैक्षणिक साधनांचा आगामी काळात नक्कीच उपयोग होणार आहे, मात्र सध्या शिक्षणाचे इप्सित साध्य होणारे नाही. त्यामुळे यावर्षी ऑनलाईन शिक्षणाची सक्ती उपयोगाची ठरणार नाही. आज काही महाविद्यालयांचे ऑनलाईन तास सुरू झाले आहेत. एका विद्यार्थ्याला किमान 2 जीबी मोबाईल नेट डेटा पुरत नाही. म्हणजे ढोबळमानाने एक हजार रुपये कॉलेजच्या शिक्षणासाठी खर्च होत आहे. विद्यार्थ्यांचा वैयक्तिक मोबाईल डेटा आणि वेगळाच. हे शिक्षण विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
घरात पालकांकडे मोबाईल असला तरी तो सकाळी आठपर्यंत आणि संध्याकाळी सहानंतर मुलांना उपलब्ध होतो. शिक्षकांना या कालावधीत गुगलक्लास रूम किंवा झूमच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. याशिवाय आणखीही बरेच अडथळे आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण चालू राहायला काही हरकत नाही,पण या माध्यमातून मूल्यमापन करणे उचित ठरणार नाही. मुलांना मोबाईल,टॅब, लॅपटॉप आणि त्याचा इंटरनेट डेटा मोफत उपलब्ध करून द्यायला हवा. यातून सरकारचा पुढील मात्र फायदा होणार आहे. शिक्षक भरती पूर्णपणे थांबणार आहे आणि शिक्षकांना फक्त ऑपरेटर म्हणून काम करावे लागेल आणि हा धोका शिक्षण क्षेत्राला फार मोठा आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
No comments:
Post a Comment