Tuesday, July 7, 2020

कोसळणाऱ्या विजा आणि मनुष्यहानी


उन्हाळ्यातल्या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसादरम्यान किंवा पावसाळ्यात पडणाऱ्या विजेच्या घटना तशा सामान्य आहेत. कुठे ना कुठे वीज पडून जीवितहानी अथवा वित्तहानी होत असते. मात्र अलीकडच्या काळात या घटना वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  25 जून रोजी बिहार राज्यात एकाच दिवशी वीज पडून 120 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशामध्ये 24 जणांचा बळी गेला. पुन्हा परवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला बिहारमध्ये एकाच दिवशी आणखी 20 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. हवामान खात्याने अशा 12 राज्यांची यादी प्रसिध्द केली आहे, ज्या राज्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना अधिक घडतात. यात पहिल्या क्रमांकाला मध्य प्रदेश आहे. त्यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार,पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ओरिसा राज्यांचा क्रमांक लागतो.

राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी वीज कोसळून 2 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो. 2000 ते 2014 या दरम्यान वीज पडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 32 हजार 743 इतकी आहे. 1967 ते 2012 दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृत्यूमध्ये 39 टक्के वाटा हा आकाशातून पडणाऱ्या विजेचा आहे. एका ताज्या वैज्ञानिक संशोधनानुसार ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असाच वाढू लागला तर 2100 पर्यंत आकाशातून पडणाऱ्या विजेचे प्रमाण आजच्या तुलनेत आणखी 50 टक्क्यांनी वाढेल. काही शास्त्रज्ञांनी आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे मृत्यू पावणाऱ्या  शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणाला शेताभोवती ताडांच्या झाडांची संख्या कमी असल्याचे सांगितले आहे. ताडाची झाडे उंच असल्याने ती वीज आपल्याकडे खेचून घेतात. त्यामुळे मनुष्य व वित्तहानी कमी होते. असे सांगितले जाते की, ताडाचं जिवंत झाड चांगले विद्युत संवाहक आहे. ताडामध्ये असलेला रस आणि पाणी वीज जमिनीत नेण्याचं काम करतात. नारळाचं झाडदेखील वीज संवाहक आहे. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना घडत असल्या तरी नुकसान होत नाही.
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये वीज ओळखण्याची अद्ययावत यंत्रणा आहे. 1970 च्या आसपास या देशांमध्ये वीज पडून मृत्यू पावणाऱ्यांची मोठी होती. नंतर हे प्रमाण 27 टक्क्यांवर आले. अशी कोणतीच अद्ययावत यंत्रणा आपल्या देशात नाही. आपल्या देशात खरे तर याची मोठी गरज असताना यावर संशोधन होत नाही, हे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. पर्यावरण तज्ज्ञ सांगतात की, बांगलादेशप्रमाणे आपल्या देशातही ताड लागवड मोठ्या प्रमाणात करायला हवी. शेतांच्या बांधावर ,नदी-ओढ्याकाठी पूर्वी ताडाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. मात्र शिंदी, ताडीचे उत्पादन घेण्याच्या नावाखाली ताडीच्या झाडांची नव्याने लागवड करण्यात न आल्याने ही झाडे संपुष्टात येऊ लागली आहेत. सध्या शिंदी कृत्रिमरीत्या तयार करून विकली जात असून याचा आरोग्याला मोठा धोका पोहचत आहे. मात्र शासनाचे याकडे लक्ष नाही.
झारखंडमध्ये बिरसा कृषी विश्वविद्यालयाच्या परिसरात आपत्ती प्रतिबंधक विभागाने एक सेन्सर बसवला आहे. या माध्यमातून 300 किलोमीटर परिघातील आकाशातील वीज आणि त्यातील विजेची तीव्रता यांचा अभ्यास केला जातो. मात्र या अभ्यासातील निष्कर्ष देशातल्या कानाकोपऱ्यात पोहचायला हवेत. त्यातून इतरांना बोध घेता येईल. आपल्या घरात आर्थिन्गची व्यवस्था करून आपण आकाशातून पडणाऱ्या विजेपासून स्वतःचे रक्षण करू शकतो. वादळ-वारे आल्यास घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग बाजूला काढून ठेवणे हितावह ठरते. विजा कडकडत असतात तेव्हा झाडाखाली, विजेच्या खांबाखाली किंवा मोकळ्या मैदानात जाऊ नये. महत्त्वाचं म्हणजे वादळी पावसाच्या आणि विजेच्या कडकडाटात आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावा. या काळात आपण आपली स्वतःची काळजी घेतल्यास विजेपासून स्वतःचा बचाव करता येतो.
कोकणात नारळ आणि सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय इतर उंच जाणारी झाडेही असल्याने या ठिकाणी वीज पडून होणारी हानी जवळजवळ नाहीच. त्यामुळे शेतकऱ्यांनी विजेपासून स्वतःचा बचाव कारायचा असेल तर शेताच्या बांधावर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करायला हवी. शेतकऱ्यांना ताडाच्या झाडांची लागवड करण्याकरिता शासनाने अनुदान आणि प्रोत्साहन द्यायला हवे. यातून शिंदी, ताडी यांचे उत्पादनदेखील घेता येते.
आणखी एक सांगायचा मुद्दा असा की,गेल्या आठ दिवसांत गुजरात, दिल्ली, मिझोराम या राज्यांत भूकंप झाला. आपल्या महाराष्ट्रातदेखील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात धरणी कंप झाला आहे. त्यातच वीज कोसळून मोठी मनुष्यहानी होणं या काही योगायोगाच्या घटना नाहीत. नक्कीच हा आपल्यासाठी निसर्गाचा संदेश आहे. यातून आपण बोध घ्यायला हवा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment