Sunday, July 12, 2020

(बालकथा) दामाजीपंतांचा नोकर

खूप वर्षांपूर्वी एकदा महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. मंगळवेढा प्रांताची जबाबदारी दामाजीपंतांकडे होती. ते आणि त्यांच्या पत्नी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते दीन-दुबळ्यांची सेवा करीत.
दुष्काळ पडल्याने लोक अन्नाला महाग झाले होते. भुकेने काही लोकांनी दम तोडला होता. परंतु इकडे गोदामे धान्यांनी भरलेली होती. दामाजीपंतांना पाहवलं नाही,त्यांनी आदेश दिला,"गोदामाचे टाळे खोला, गरजूंना धान्य वाटा.कुणीही उपाशी राहता कामा नये."

धान्य मिळवण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागू लागल्या. सगळ्यांनाच मोफत धान्य वाटप केलं जाऊ लागलं. यामुळे हजारो लोक मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून बचावली. परंतु, इकडे दामाजी यांचा नायब सुभेदारला मात्र एक चांगली संधी मिळाली. त्याचा दामाजीपंतांच्या खुर्चीवर डोळा होता.  दामाजींना  या पदावरून हटवल्यावर आपले काम सोपे होईल,याची खात्री होती.त्याने दामाजीपंतांविरोधात बादशहाकडे अतिशयोक्तीयुक्त लेखी तक्रार केली.
बादशहाला नायब सुबेदाराचे पत्र मिळाले. बादशहा संतापला. त्याने मागचा-पुढचा विचार न करता आदेश दिला,"दामाजीपंतांना तातडीने बंदी बनवून माझ्यासमोर हजर करा."
सैन्य घेऊन सेनापती निघाला. दामाजींच्या घरी पोहचला. दारावर जोराची थाप मारली.त्यांच्या पत्नीने दार उघडले. सेनापतीला म्हणाल्या," दामाजी पूजेत व्यस्त आहेत. पूजा संपल्यावरच तुम्ही त्यांना भेटू शकता."
सेनापती वाट पाहू लागला. दामाजींची पूजा संपली. पत्नीने त्यांना सेनापती आणि सैन्य आल्याची कल्पना दिली. दामाजींनी ओळखलं की, बादशहाने त्यांना अटक करण्यासाठी पाठवलं आहे. परंतु, ते क्षणभरही घाबरले नाहीत. ते आपल्या पत्नीला म्हणाले," काळजी करण्याचं काही कारण नाही. आपण काही चोरी केली नाही. असहाय्य आणि दीन-दुबळ्यांना मदत केली आहे. पांडुरंगाच्या मनात जे असेल,ते होईल."
दामाजीपंत बाहेर आले.सेनापतीने बादशहाचा आदेश ऐकवला.त्यांना बंदी बनवून निघाला.
बिदरचा बादशहा बंदिवान दामाजीपंतांची प्रतीक्षा करीत होता. वेळ होत होता, तसा संतापाने त्याच्या अंगाचा तिळपापड होत होता. तेवढ्यात त्यानं पाहिलं की, एक किशोरवयीन मुलगा दरबारात येत आहे.त्याने नियमाप्रमाणे बादशहाला जोहार केला.मग म्हणाला,"हुजूर, मी दामाजीपंतांचा नोकर आहे."
बादशहा चकित झाला.त्याने गुश्शातच विचारलं,'तुझं नाव काय? आणि इथं का आला आहेस?"
तो मुलगा नम्रपणे म्हणाला," जी सरकार, माझं नाव विठू. माफ करा. आपली जनता भुकेने तडफडून जीव तोडत होती. माझ्या मालकाने आपल्या गोदामातील धान्य गोरगरिबांमध्ये वाटून टाकलं. त्याचीच भरपाई करण्यासाठी आलो आहे."
बादशहाने विठूला खजांचीकडे पाठवून दिले. त्याने पूर्ण रक्कम भरून घेतली आणि विठूला त्याची पावती दिली.
विठू पुन्हा बादशहकडे आला. बादशहाने पावतीवर शाही मोहोर उमटवली. विठूने हात जोडले आणि म्हणाला,"सरकार, निघतो आता. मालक काळजी करत असतील."
बादशहाचा नूर पालटला. त्याने दिवाणला हुकूम सोडला," जा आणि दामाजींना सन्मानाने दरबारात हजर करा."
चालत-चालत दामाजीपंत पंढरपूरच्या पुढे निघून आले होते. त्यांनी सकाळी पूजा-पाठ केला. गीताग्रंथ उघडला,तर त्यात एक कागद आढळला. ही तीच ती पावती होती, जी धान्याची किंमत चुकती केलेली होती. दामाजी चकित झाले. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की, दिवाण येतो आहे. त्याने बादशहाचा हुकूम ऐकवला आणि दामाजीपंतांची क्षमा मागितली.
दामाजीपंत बादशहाला भेटले. बादशहा म्हणाला,"दामाजी, मला एकदा विठूची भेट घडवून द्या."
दामाजी म्हणाले," हुजूर,कोण विठू?"
बादशहा नम्रपणे म्हणाला,"दामाजी, तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. मला कसल्याही परिस्थिती त्याची एकदा भेट घडवा."
दामाजीपंतांच्या आता कुठे लक्षात आलं. म्हणाले, "हुजूर, तुम्हाला तर स्वयं परमेश्वराने दर्शन दिलं आहे. तुम्ही तर धन्य झालात." दामाजीपंतांनी हात जोडले आणि तिथेच कीर्तन करायला बसले.
म्हणतात ना, भक्तांच्या मदतीला ईश्वर धावून येतो. त्याची लीला अगाध आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

No comments:

Post a Comment