'युज अँड थ्रो प्लास्टिक' वस्तूंचा वापर करू नका, या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत होता. जाणकार मंडळी अशा प्लास्टिक वस्तूंवर बहिष्कार टाकत होती. सकाळी फिरायला जाणारे वाघमारे आजोबा आणि त्यांचे जोडीदार मित्रांनीदेखील आज एक निर्णय घेतला होता. पंचायत समितीसमोरच्या ए-वन टी स्टॉलवाल्या रमेशला आपण प्लास्टिक कपातून चहा पिणार नाही, हे त्याला सांगणार होते.
फक्त वाघमारे आजोबांनीच नाही तर सांगली रोडला पहाटे फिरायला येणाऱ्या सर्वांनाच तसे वाटत होते. फिरून आल्यावर वाघमारे आजोबा रमेशला म्हणाले,
"गड्या रमेश, आता आम्ही फक्त कपबशी नाहीतर काचेच्या ग्लासातच चहा पिणार बरं!" टपरीवर जमलेल्या सगळ्यांनीही त्याला हेच सांगितलं. रमेशनं ऐकून घेतलं. तो काहीच बोलला नाही.
दिवसभरात त्याला अनेकांनी प्लास्टिकचे कप बंद करण्याविषयी सुनावलं. परंतु, त्याने सगळ्यांच्या बोलण्याकडे ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दुसऱ्यादिवशी फिरून आलेल्या सगळ्यांना 'जैसे थे'च परिस्थिती दिसली. रमेशने काहीच बदल केला नाही. प्लास्टिक कपमधूनच चहा दिला जात होता. ते पाहून सगळे नाराज झाले. सगळे चहा न पिताच माघारी परतले. दिवसभर बऱ्यापैकी त्याला असाच अनुभव आला.
बघता बघता ही गोष्ट आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रात पसरली. पंचायत समिती आणि तहसील ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनीदेखील त्याला कपबशी आणि ग्लास ठेवायला सांगितले. आता मात्र रमेशला काळजी वाटू लागली. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याने लगेच कपबश्या मागवल्या. आणि त्याने एक बॅनरही बनवला. त्यावर लिहिलं -'इथे फक्त कपबशीतून चहा मिळेल.' दुसऱ्या दिवशी बॅनर पाहून फिरायला येणारे सगळे खूश झाले. रमेशच्या चेहऱ्यावरही एकप्रकारचा अभिमान दिसत होता.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment