आठवड्याभरानंतर तो घरी आला. फारच थकलेला दिसत होता. चेहराही पडला होता. त्याची बायको धावतच बाहेर आली.
"या, कसे आहात?"
बाहेरच उभारून त्यानं बायकोला सांगितलं,"कोरोनाची टेस्ट देऊन आलोय. कदाचित पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. खूप भीती वाटतेय."
पत्नी एकदम झटका आल्यासारखी मागं सरकली,
" बाहेरच थांबा. रिपोर्ट आल्यावर बघू. मला कसलीच रिस्क घ्यायची नाही. अजिबात घरात येऊ नका." असं म्हणून तिने दरवाजा खाडकन बंद केला आणि आत निघून गेली.
अभय बऱ्याच दिवसांनी आपली ड्युटी संपवून घरी आराम करायला आला होता. सरकारी दवाखान्यात कंपाउंडर असल्यानं गेल्या तीन महिन्यात दोन-चारदाच सुट्या मिळाल्या होत्या. तो बाहेरच कट्ट्यावर डोकं धरून बसला.
एका तासाभरानं त्याला फोन आला हॉस्पिटलमधून! डॉक्टरांचा फोन होता."अभय, तुझा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.अभिनंदन!"
अभयने फोन ठेवला. या वेळेला त्याला आपल्या बायकोला रिपोर्ट सांगण्याची इच्छाच झाली नाही. त्यानं थोडावेळ काहीतरी विचार केला आणि जागेवरून उठला. ...आणि चालू लागला हॉस्पिटलच्या दिशेने...
No comments:
Post a Comment