बेल वाजली. मी वरून खाली पाहिलं. दारात काका उभे होते. बघता बघता दोन वर्षं उलटली होती. प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात काका हमखास टपकायचे. आले की, आमच्याकडेच राहायचे. त्यांचं रुटीन चेकअप असायचं. याच शहरात त्यांचा मुलगाही राहतो. पण ते तिथे जात नाहीत. मुलाला त्रास होईल ना! माझा चुलत भाऊ माझ्यापेक्षा चौपट पगार घेतो. दोन -दोन कार आहेत त्याच्याकडे. मोटारसायकलीचं म्हणाल तर बाजारात आलेली नवीन गाडी त्याच्या दारापुढे असते. तरीही काकांना त्याच्या गाडीतून जावंसं वाटत नाही. कारची भीती वाटते त्यांना! मी आणि माझी स्कूटर फालतू असल्यासारखे.
आता पुन्हा दुकान नोकराच्या भरवशावर टाकून तीन-चार तास यांच्याबरोबर धक्के खात, ट्रॅफिक सांभाळत जायचं दवाखान्यात. बाबांचं तर काय सांगायचं. काकांना कधी काही बोलतच नाही. मुलाकडे जा म्हणून सांगायचं! पण तसं कधी घडलं नाही. ...मी जिना उतरत होतो,पण माझा पारा वर वर चढत होता. आज बाबांना बोलायचंच. एकदा ही कटकट संपवूनच टाकू.
दरवाजा उघडला. त्यांच्या पायाला स्पर्श केला. त्यांची बॅग हातात घेतली. नेहमीप्रमाणे त्यांनी आशीर्वाद दिला आणि आत आले. दोघा भावांची 'भरत भेट' झाली. काका नेहमीसारखे बाथरूमला निघून गेले.
मी संधी साधली.वडिलांना म्हणालो," बाबा, दादाचं घर किती मोठं आहे. नोकर-चाकर आहेत. हरेकप्रकारच्या सवलती आहेत. तरीही काका तिकडे न जाता आपल्याकडेच येतात. ...काय कुणास ठाऊक त्यांना इथं येऊन काय मिळतं. इथं तर काहीच नाही." मी मला जे वाटतं ते सगळं बोलून मोकळा झालो.
"आदर!" बाबा म्हणाले आणि मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो.
मी काही न बोलताच तिथून निघालो. दवाखान्यात जायला तयार होण्यासाठी! दादाच्या वडिलांना दाखवायला नाही... तर माझ्या प्रेमळ काकाला!
No comments:
Post a Comment