Saturday, July 18, 2020

(लघुकथा) बाबांची लाडकी


मानसी घरातली कामं पटापट आवरत होती. तिला आज चष्म्याच्या दुकानात जाऊन बाबांचा चष्मा घ्यायचा होता आणि तो घेऊन बाबांकडे जायचं होतं.तिचं सासर- माहेर काही लांब नव्हतं. एकाच शहरात होतं. आई गेल्यापासून तिला वाटलं की, घरातली कामं पटापट संपवून बाबांकडे जाऊन यायची. त्यांना हवं -नको ते पाहायची. ती बाबांकडे निघाली की हमखास सासूचे टोमणे ऐकायला मिळायचे. "निघाली बघा बाबाची लाडकी!" तिथे गेल्यावर भाऊ म्हणायचा,"आली बघा बाबाची लाडकी." मानसी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. तिच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, आईला दिलेलं वाचन! आईनं तिच्याकडून ती गेल्यावर बाबांची काळजी घेण्याचं वचन घेतलं होतं. तिच्या येण्या-जाण्यानं तिच्या भावजयला कसला त्रास नव्हता.
उलट ती आल्यावर भावाजयला घरकामात मदतच करायची. मागच्या वेळी आली होती,तेव्हा तिने बाबांविषयी तक्रार केली होती. 'बाबांना काय झालंय कळतच नाही. काही आणायला सांगितलं तर काहीतरी गडबड करूनच येतात.'
मानसी सावध झाली. ती लगेच बाबांच्या खोलीत गेली. बाबा शून्य नजरेने छताकडे पाहत होते. बाबांना वाचण्याचा छंद होता. तिनं पाहिलं टेबलावरच्या पुस्तकांवर धूळ साचली आहे.एका बाजूला वर्तमानपत्रेही तशीच घडी घातलेल्या अवस्थेत पडली होती. शेवटी तिच्या बाबांना झालंय तरी काय? तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटली. तितक्यात भावजय आली. म्हणाली,"हे बघ दीदी, बाबांनी औषधं एक्सपायरी डेटची आणली आहेत."
बाबा तर प्रत्येक वस्तू अगदी निरखून पारखून आणतात. प्रत्येक वस्तूची प्रोडक्ट आणि एक्सपायरी डेट  काळजीनं पाहायचे. ती हसली. आता सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती म्हणाली,"मी जरा बाबांना बाजारात घेऊन जाते."
बाबांना घेऊन ती डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेली. चष्म्याचा नंबर वाढला होता.त्यामुळेच त्यांना नीट दिसत नव्हतं. "बाबा,आपण लेन्स बदलणार आहोत तर चष्मा पण नवीनच घेऊ." ती म्हणाली.
बाबांना आनंद झाला. त्यांनी गोल्डन फ्रेम असलेला चष्मा निवडला. चष्मावाल्यानं चार दिवसांनी येऊन चष्मा न्यायला सांगितलं.
मानसी दुकानात पोहचली तेव्हा चष्मा तयार झाला होता. तो घेऊन ती माहेरी गेली.बाबा बाहेरच तिची वाट पाहताना दिसले. ती गेल्या गेल्या त्यांनी चष्मा मागून घेतला.तो घालून त्यांनी इकडं-तिकडं पाहिलं. त्यांना आता छान, स्पष्ट दिसत होतं. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
"बाबा, कसं दिसतंय आता?" ती
"एकदम टकटक!" बाबा आनंदाने म्हणाले.
"बाबा, तुम्हाला काय हवं- नको ते दादाला सांगत जा ना तो आणून देत जाईल ना!" ती म्हणाली.
"मला नाही सांगू वाटत." बाबा
"अहो बाबा, तुम्ही सांगितलं नाही तर त्याला कसं कळणार बरं?" ती
"मग तुला कसं कळतं?" बाबा तिच्याकडे पाहत म्हणाले.
बाबांची लाडकी निरुत्तर झाली.

No comments:

Post a Comment