Saturday, July 25, 2020

(रहस्यकथा) तिथे काही तरी आहे

 ढगांची गर्दी दाटली होती.अधूनमधून विजा चमकत होत्या आणि त्यातून मन चरकायला लावणारा गडगडाट ऐकायला येत होता. रस्त्यावरून दोघेच निघाले होते. बाकी रस्ता निर्मनुष्य होता. चालताना ते सारखं आकाशाकडे पाहत असत आणि मग त्यांचा चालण्याचा वेग वाढत असे. हे दोघे मित्र होते-मोहन आणि रावसाहेब. मोहन जासूस कथा लिहायचा, त्यामुळे त्याला सगळे  गंमतीने 'डिटेक्टिव्ह मोहन' म्हणून बोलवायचे. खरे तर ते जवळच्या शहराकडे निघाले होते. वाटेत त्यांची गाडी खराब झाल्याने त्यांना चालतच जाणं भाग पडलं होतं.

रावसाहेब म्हणाला,"लवकर चल, नाहीतर पाऊस आला की आपलं काही खरं नाही. भिजून जायचो आपण. पुढं आसऱ्याला कुठं झाडही नाही की घरही!"
तो असे म्हणतोय तोच पावसाचे थेंब पडायला लागले. मोहन आता थांबून बाजूच्या मैदानात काहीतरी पाहत होता. काही अंतरावर धूर दिसत होता.
तो म्हणाला,"रावश्या, जरा तो धूर बघ.अशा या मोकळ्या मैदानावर कुणी आग लावली असेल बरं? आजूबाजूला दूरदूरपर्यंत एखादी वस्तीदेखील दिसत नाही."
रावश्याने धुराकडे पाहिलं. बारीकसा धूर आकाशाच्या दिशेने मंदपणे चालला होता. तो म्हणाला,"या आगीची आणि धुराची चिंता सोड आणि आपली काळजी कर. आणि असल्या रिकाम्या जागेत जळणाऱ्या आगीत तुला कसलं रहस्य दिसलं?" रावश्याने त्याचा हात धरून त्याला पुढं ओढण्याचा प्रयत्न केला,पण मोहनची नजर अजूनही त्याच धुरावर खिळली होती.
मोहन म्हणाला,"माझं मन म्हणतंय, या आगीत काहीतरी रहस्य नक्की दडलं आहे. बघ ना ,आजूबाजूला चिटपाखरूही नसताना ही आग लावली कुणी? आणि का लावली? "असे म्हणून तो त्यादिशेने चालू लागला. आता नाइलाजाने रावश्यालाही त्याच्याबरोबर जाणं भाग पडलं. तो बडबडत होता,"अरे,पाऊस पडेल आणि आग आपोआप विझेल.तुला का त्याची पंचेती. "
"अरे,असं नको व्हायला. आग विझण्याअगोदरच आपल्याला तपास केला पाहिजे." काही वेळातच दोघेही त्या आगीजवळ पोहचले. पाऊस वाढत होता. समोर कसलीशी पिशवी जळत होती. पावसामुळे आग विझत चालली होती आणि त्यातून धूर निघत होता.
मोहनने पायाने आग विझवली आणि ती पिशवी घेऊन पाहू लागला. कापडी असलेली पिशवी बऱ्यापैकी जळाली होती. त्याने ती उलटी करणार तोच करणार तोच त्यातून अर्धवट जळालेले कागद खाली पडले. त्याबरोबर आणखीही काही तरी पडल्याचा आवाज झाला. त्यातली अंगठी खाली पडली होती. रावश्याने अंगठी उचलली आणि ती निरखून पाहू लागला. त्यावर 'एन' लिहिले होते.  इकडे मोहन जळालेली कागदं उलटून पालटून पाहात होता. ती कसल्याशा डायरीची पानं होती. पावसामुळे अर्धवट जळलेल्या कागदावरील अक्षरं पुसट झाली होती. अक्षरं व्यवस्थित वाचता येत नव्हती. पिशवीवर 'बीएमसी' असं प्रिंट केलेलं होतं.
मोहन म्हणाला,"पावसामुळे आग विझली असती तर इकडे कुणाचंच लक्ष गेलं नसतं. आता ही 'एन' अक्षराची अंगठी कुणाची आहे? आणि ही कागदं का जाळली गेली? ही अंगठी आणि कागदं जाळण्यामागं काय रहस्य आहे? याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल. आपलं लक्ष गेलं नसतं तर याची उत्तरं शोधली गेली नसती."
मोहनने जळालेली कागदं पिशवीत घालून रस्त्याच्या दिशेने निघाला. अंगठी अजूनही रावश्याच्या हातात होती. आता पाऊस थांबला होता. तिकडे बरंच लांब काही वस्त्या दिसत होत्या. छोटं गाव असावं. ते दोघे तिकडे गेले. तिथे त्यांना एक दुकान दिसलं. त्यावर असलेल्या बोर्डावर 'बीएमसी' लिहिलं होतं.
दोघेही त्या दुकानात घुसले. गल्ल्यावर बसलेल्या माणसाने डोळ्यानंच विचारलं,"काय हवं?"
बाजूलाच पिशव्या विक्रीसाठी अडकवलेल्या होत्या.
मोहनने जळालेली बॅग त्याच्यासमोर धरली आणि विचारलं,"ही बॅग तुमच्या दुकानातूनच विकली गेलीय काय? असेल तर कधी विकली गेली आणि कोणाला?"
गल्ल्यावर बसलेला माणूस उठला आणि त्यानं पिशवी पाहिली. "ही तर जळालेली आहे. एका तासापूर्वी एका तरुणाने पिशवी खरीदली होती. बहुतेक ती हीच असावी."
बॅग जळाली असली तरी त्याचे नवेपण अजूनही जागोजागी दिसत होते.
मोहनने उतावीळपणे विचारलं,"त्या तरुणाचं नाव सांगू शकाल? दिसायला कसा होता तो? आणि तो एकटाच होता की आणखी कोण त्याच्यासोबत होते?"
दुकानदार म्हणाला,"त्याचे केस कुरळे होते आणि त्याने दाढी वाढवली होती. त्याने लाल रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याचे डोळे सुजलेले होते. त्याचा चेहरा रडवेलासा दिसत होता. पण काय झालंय काय,मला तरी सांगा. तो चोर होता का? आणि तुम्ही पोलीस आहात का?"
ऐकून मोहन आणि रावसाहेब दोघेही हसू लागले. मग त्यांनी ही अर्धवट जळालेली पिशवी कुठे सापडली ते सांगितले.
"म्हणजे त्या तरुणाने ही पिशवी जाळायसाठी घेतली होती?" दुकानदाराने प्रश्न केला.
मोहन विचार करत होता,'त्या तरुणाच्या हातात डायरीची पानं असतील. त्याने ती पिशवीत टाकली आणि त्याला आग लावली. पण का जाळली? असं काय होतं या डायरीच्या पानांमध्ये?'
दुकानदार बाहेर आला. त्याने कागदं आपल्या हातात घेतली आणि ती आलटून पालटून पाहिली. पण त्याला त्यात काही विशेष दिसलं नाही. ती काही खास कागदपत्रेही नव्हती.
"आता काय करायचं?" रावसाहेबनं विचारलं आणि त्याने वर आकाशाकडे पाहिलं. आकाश स्वच्छ होतं आणि हलकं ऊन पडलं होतं.
मोहन म्हणाला,"आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी जावं लागेल."
"का?" रावश्याने विचारलं.
"मी या अंगठीचा विचार करतोय. ही या पिशवीत कशी आली? त्याला अंगठी जाळायची नव्हती. ती जळणार तर कशी?कदाचित तो कागदं पिशवीतून काढत असताना त्याच्या हाताच्या बोटातून ती निघून पडली असावी. मला तर असंच वाटतंय. असे असेल तर तो तरुण पुन्हा तिथे नक्की येईल!"
"तो तिथे अंगठी शोधायला येणार का?"
"त्याला अंगठी हरवली असल्याचं लक्षात येईल,तेव्हा तो नक्की येईल. आणि बोटातली अंगठी हरवली आहे, ही गोष्ट फार काळ लपून राहणार नाही. कारण बोटांकडे सारखी नजर जात असते." मोहन म्हणाला आणि पुन्हा वेगाने त्या मैदानाच्या दिशेने निघाला.
"अरे, तो बघ,समोर!"रावसाहेबने मोहनचा हात पकडून समोर नजरेने निर्देश करत म्हणाला.
समोर मैदानात लाल रंगाचा ठळक टिपका दिसला. लाल शर्ट घातलेला तरुण खाली वाकला होता. मोहनचा अंदाज बरोबर होता. दोघेही वेगाने चालत त्या तरुणाजवळ पोहचले. त्या दोघांना पाहून लाल शर्टाचा तरुण चपापला.
मोहनने विचारले,"काय शोधतो आहेस?"
"काही...काही नाही!"तरुण म्हणाला.
"तुझं नाव 'एन'ने सुरू होतं का?" मोहनने विचारलं.
तरुण म्हणाला,"हो, माझं नाव नामदेव आहे.पण तुम्हाला कसं माहीत?"
"आम्हाला हे नाव अंगठीमुळे समजलं." मोहन म्हणाला आणि त्याला अंगठी दाखवली.
"अरे, ही तर माझी अंगठी आहे.मी याच्याच शोधात इकडे आलो होतो." असे म्हणून त्या तरुणाने अंगठी घेण्यासाठी हात पुढे केला.
"आम्हाला काय माहीत की, ही अंगठी कुणाची आहे? पण एक मात्र आम्हाला ठाऊक आहे की, तू तिथल्या वस्तीवरल्या दुकानातून एक पिशवी खरेदी केलीस होतीस आणि त्यात डायरीची पाने घालून ती इथे जाळलीस." मोहन पुढे म्हणाला की,''आम्ही ही घटना पोलिसांना सांगायला चाललो आहोत. पोलिसच सांगतील की, ही अंगठी नेमकी कुणाची आहे."
"प्लिज, पोलिसांकडे जाऊ नका. तुम्हाला अंगठी द्यायची नसेल तर नका देऊ. पण मला पोलीसांच्या चक्करमध्ये पडायचं नाही. पण मी ते सगळं सांगेन,जे कुणाला सांगायचं नव्हतं."
मोहन म्हणाला,"हे बघ नामदेव, जे काही असेल ते खरं खरं सांग. नाहीतर पोलीस...! सांग, ही सगळी काय भानगड आहे?"
त्या तरुणाचा आवाज घोगरा झाला. सांगू लागला, "काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. मी आमच्या घराची साफसफाई करत असताना त्यांची डायरी सापडली. त्यांनी लिहिलं होतं की, ते चंदन तस्करीचं काम करत होते. मग माझ्या लक्षात आले की, एक छोटीशी नोकरी करत असताना त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. मला याबाबतीत कुणालाच काही सांगायचं नव्हतं. पण मला खूप वाईट वाटत होतं.मग मी विचार केला की, ही डायरीच आपण नष्ट करावी. मी दुकानदाराकडून पिशवी विकत घेतली आणि इथे लांब येऊन त्या डायरीतील ती पानं फाडली आणि या पिशवीत घालून आग लावली.मी विचार केला होता की, आता ही गोष्ट कुणालाच कळणार नाही,पण..." आणि बोलता बोलता त्याच्या डोळ्यांत पाणी आले आणि तो हमसून हमसून रडू लागला.
मोहन त्याच्याजवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"तुझ्या वडिलांनी जे केलं ते चुकीचं आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये, तू जे केलंस, ते योग्यच आहे. खरेच, आम्ही कुणाला काही सांगणार नाही." मोहनने त्याची अंगठी त्याला परत केली.
दोघेही तिथून निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले. मैदानात तिथे हलकासा धूर दिसत होता. बहुतेक नामदेवने डायरीची ती पानं पुन्हा जाळली असावीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment