Thursday, July 2, 2020

(लघुकथा) देवाचं रूप

त्याची आठ वर्षांची मुलगी धानम्मा सायकल खेळताना पडली. तिच्या हाताला खूप लागलं. बरेच दिवस झाले तरी तिच्या हाताचं दुखणं काही कमी होईना. काहींनी शहरातल्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. कैलास यांना दाखवण्याचा सल्ला दिला. त्याने डॉ. कैलास यांची भेट मागून घेतली आणि तो मुलीला-धानम्माला घेऊन दवाखान्यात आला.
धानम्माला तपासल्यावर तिच्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल, असे डॉक्टर म्हणाले. खूप विचार केल्यानंतर त्याने ऑपरेशनचा दिवस विचारला. डॉक्टरांनी त्याला चार दिवसानंतरची तारीख दिली. ऑपरेशनच्या आदल्यादिवशी मुलीला ऍडमिट करायला सांगितलं.
ठरलेल्या दिवशी तो धानम्माला घेऊन दवाखान्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ऑपरेशनला घेण्याचे ठरले. सकाळी लवकर ऑपरेशन होणार असल्यानं आदल्या दिवशीचे रात्रीचे जेवण देण्यास मनाई करण्यात आली. ऑपरेशनसाठी पेशंट उपाशी असणं आवश्यक होतं. अगदी पाणीसुद्धा प्यायला द्यायचं नाही, असं बजावून सांगण्यात आलं. तो आणि त्याची बायको मुलीसोबत होते. सकाळी दोघेही ऑपरेशनची वाट पाहू लागले. परंतु अकरा वाजून गेले तरी डॉक्टरांचा पत्ता नव्हता. धानम्मा भुकेने आणि तहाननेने व्याकुळ झाली होती. मुलगी सारखं 'पाणी पाणी' म्हणत होती. तिची केविलवाणी अवस्था पाहून दोघांचाही जीव तीळ तीळ तुटत होता. तो आता संतापला होता. डॉक्टरांना शिव्या घालू लागला. मुलीची आईदेखील विचार करत होती, इतकी मोठी फी घेऊन देखील डॉक्टरांना पेशंटची काळजी कशी नाही. इथून -तिथून सगळे डॉक्टर सारखेच!
जवळपास बारा वाजत आले होते. आता वाट पाहण्याचे त्याचे 'लिमिट' संपले होते. तेवढ्यात त्याला डॉक्टर येताना दिसले. ते आल्या आल्या ऑपरेशन थिएटरमध्ये  शिरले. त्याने संतापून असिस्टंट डॉक्टरला उशिरा येण्याचे कारण विचारले. असिस्टंट डॉक्टर म्हणाला," रात्री एका कार  ऍकसिडेंटमध्ये डॉक्टरांचा एकुलता एक तरुण मुलगा वारला. आताच ते त्याच्यावर अंत्यसंस्कार करून थेट हॉस्पिटलमध्ये आले आहेत."
हे ऐकून तो अवाक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरारलं. आता त्याच्या मनात डॉक्टरांविषयी आदर निर्माण झाला. तो विचार करत होता, खरोखरच डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरच्या देवाचं रूपच आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment