महायुद्ध होणार हे निश्चित झाल्यावर दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागायला आले. झोपलेल्या श्रीकृष्णाच्या उशाशी पहिल्यांदा आलेला दुर्योधन बसला. नंतर आलेला अर्जुन पायापाशी बसला. जागे होताच श्रीकृष्णाचे लक्ष पहिल्यांदा पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे गेले. श्रीकृष्ण म्हणाला," अर्जुना,कधी आलास? आणि काय काम काढलंस?"
यावर वेळ न दवडता दुर्योधन म्हणाला," आम्ही दोघेही युद्धात मदत मागायला तुमच्याकडे आलोय. पण पहिल्यांदा मी आलोय.त्यामुळे पहिल्यांदा माझे ऐकून घ्यावे."
श्रीकृष्ण म्हणाला,"पण मी पहिल्यांदा अर्जुनाला पाहिलं आहे. आणि दुर्योधना, लहानाचे समाधान प्रथम करावे असे शास्त्रातही म्हटले आहे. त्यामुळे मागण्याचा अधिकार पहिला अर्जुनाचा!" यावर दुर्योधन गप्प बसला. श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले,"बोल अर्जुना, तुला काय हवंय? एका बाजूला प्रचंड पराक्रमी यादव सैन्य आणि दुसऱ्या बाजूला निःशस्त्र असा मी."
क्षणभरही न थांबता अर्जुन म्हणाला,"मला श्रीकृष्ण हवा."
दुर्योधन मनातून खूश झाला. त्याला श्रीकृष्णाचे प्रचंड पराक्रमी यादव सैन्यच हवे होते. दोघांना जे हवे,तेच मिळाल्याने दोघांनाही आनंद झाला. दुर्योधन गेल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनला विचारले,"निःशस्त्र अशा मला मागून तू काय साधलंस?"
अर्जुन म्हणाला,"तुम्ही विश्वकीर्तीवान आहात. यश तुमच्याकडे येणार निश्चित आहे.मला यशाची इच्छा आहे, म्हणूनच मी तुम्हाला निःशस्त्र असलात तरी निवडलं." नंतर महाभारतात काय झालं ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अपूर्व बुद्धिमत्ता आणि विलक्षण कार्यकुशलता असलेल्या श्रीकृष्णाने महायुद्धाच्या मैदानात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले आणि यात पांडवांचा विजय झाला. अर्जुनाचा श्रीकृष्णावर प्रगाढ विश्वास होता,म्हणूनच त्याने श्रीकृष्णाला युद्धात आपल्या बाजूला घेतले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012
No comments:
Post a Comment