Thursday, July 23, 2020

(बालकथा) हुशार पाहुणे

एक शिंपी होता.मोठा लोभी. त्याची बायकोही काही कमी लोभी नव्हती. त्यांच्या घरी एकादा पाहुणा आला तर त्यांना वाटायचं, मोठं संकटच आलं. एकदा त्यांच्या घरी दोन पाहुणे आले. शिंप्याला चिंता पडली की, यांना आता कसं पिटाळायचं.

शिंपी आतल्या घरात गेला आणि बायकोला म्हणाला,"ऐक, मी तुला शिव्या दिल्या की, तूही मला शिव्या द्यायच्या. मी तुला काठीने मारायला धावलो की, तू पिठाचे मडके घेऊन बाहेर पळायचं. मी तुझ्या मागोमाग धावत येईन. पाहुणे समजतील की, यांच्यात भाडणं लागली आहेत.आणि मग ते माघारी निघून जातील."

काही वेळानंतर शिंपी दुकानात बसल्या बसल्या बायकोला शिव्या देऊ लागला. त्याला उत्तर म्हणून त्याची बायकोही त्याला शिव्या देऊ लागली. शेवटी शिंप्याने काठी घेतली आणि उठून बायकोच्या अंगावर धावून गेला. बायकोने रागाने पिठाचे मडके उचलेले आणि घराबाहेर पळाली. तिच्या मागोमाग शिंपीही काठी घेऊन धावला.
पाहुणे विचार करू लागले. त्यातला एकजण म्हणाला,"बहुतेक हा शिंपी मोठा  लोभी आहे. त्याची पाहुणचार करण्याची इच्छा नाही,त्यामुळेच त्याने हे नाटक चालवलं आहे. पण आपण याला असा सोडायचा नाही.चल, आपण वरच्या माडीवर जाऊन झोपून जाऊ" पाहुणे वर जाऊन झोपले.
पाहुणे गेले असतील म्हणून शिंपी आणि त्याची बायको दोघेही हळूच घरात आले. पाहुणे घरात नव्हते,त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. म्हणाला,"बरं झालं,ब्याद गेली. "मग दोघेही एकमेकांचे कौतुक करू लागले.
शिंपी म्हणाला,"मी किती हुशार, काठी घेऊन लगेच धावलो." यावर त्याची बायको म्हणाली,"मी पण काही कमी नाही, लगोलग मडकं घेतलं आणि बाहेर पळाले."
पाहुणे वर झोपूनच त्यांचे सगळे बोलणे ऐकले होते. त्यातला एकजण म्हणाला,"आणि आम्हीही किती हुशार!वर येऊन आपलं निवांत झोपलो."
ऐकून दोघेही चरकले. त्यांनी त्यांना खाली बोलावलं. चांगला पाहुणचार केला आणि मग निरोप दिला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012


No comments:

Post a Comment