Monday, July 20, 2020

अभ्यासातील स्वावलंबन


पुष्कळ वेळा मुलामुलींना अभ्यास का करायचा, हा मोठा प्रश्न पडतो. परीक्षेच्या आदल्या रात्री किंवा दिवसभर अभ्यास करून मार्कस मिळतात, मग नियमित अभ्यास कशासाठी? पाठयपुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्याचा कंटाळा येतो. स्वभाव असेल किंवा शिक्षकांच्या निरस शिकवण्यामुळे असेल एकादा विषय नावडता होतो. त्यामुळे त्याचा अभ्यास होतच नाही. अभ्यास विषय आणि दैनंदिन व्यवहार यांची सांगड घालता न आल्याने  अभ्यास का करायचा हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी अभ्यासाची आवड आपल्या पाल्यांमध्ये कशी निर्माण होईल,याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना फक्त पाठ्यपुस्तकात अडकवून ठेवू नये. पालकांनीही पाठ्यपुस्तके वाचली पाहिजेत आणि संबंधित कोणत्या घटकांबाबतीत मुलांना अधिक माहिती देता येईल,हे पाहिले पाहिजे.
अधिक माहिती उपलब्ध करून दिल्यास आणि संबंधित घटकांचा भविष्यात व्यवहारात कसा उपयोग होऊ शकेल, याचा मुलांना परिचय करून दिल्यास त्यांना अभ्यास का करायचा, असा प्रश्न पडणार नाही.
शास्त्रज्ञ, कलाकार, निसर्ग अशा गोष्टींचा परिचय आपण इतर माहिती पुरवून अथवा प्रत्यक्ष स्थळ, व्यक्ती भेट घडवून देऊ शकतो. मुलांना शहरे, खेडी,किल्ले, दुष्काळ-सुकाळ, नैसर्गिक स्थळे पाहायला आवर्जून न्यायला हवे. बारा बलुतेदार आजही खेड्यात पाहायला मिळतात. आज त्याला उद्योग-व्यवसायाचे स्वरूप आले आहे. कालची आणि आजची परिस्थिती यांची मुलांना ओळख करून द्यायला हवी. शहरातल्या मुलांना भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात माहीत नाही,दूध कोण देतं, याची कल्पना नाही. पालकांनी मुलांना प्रत्यक्ष क्षेत्र भेट घडवून याची ओळख करून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही शहरांची सफर घडवून आणायला हवी. कारखाने,उद्योग, मॉल यांचा परिचय व्हायला हवा. व्याख्याने, संगीत कार्यक्रम, नाटके,संग्रहालय, प्रदर्शन यांना मुलांसह पालकांनी हजेरी लावली पाहिजे. शालेय वयात या गोष्टींचे दर्शन आणि आकलन झाल्यावर मुलांना भविष्यात काय करायचं याचे वेध लागतात. त्यांना आयडिया येतात. आणि मग त्यांची भविष्याची वाट मोकळी होते.
आज इंटरेटवर सर्व माहिती उपलब्ध असली तरी मुलांना प्रत्यक्ष अनुभव परिणामकारक ठरू शकतो. भविष्यात ऑनलाईन शिक्षणावर जोर दिला जाण्याची शक्यता आहे, मात्र पालकांनी आपल्याला जमेल तसे मुलांना प्रत्यक्ष अनुभुती द्यायला मागे सरू नये. महत्त्वाचं म्हणजे विविध अनुभवांमधून आपल्या मुलांची जिज्ञासा, चौकसपणा वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. यातूनच अभ्यासाची गोडी लागते. मुलांना शाळेत घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असा गैरसमज पालकांनी करून घेऊ नये. अभ्यासातून आपल्या मुलामुलींची अभ्यास कौशल्ये (वाचन,लेखन, श्रवण, पाठांतर, माहितीचे संकलन, माहितीची पुनरमांडणी इ.),विचार कौशल्ये (जिज्ञासा, निरीक्षण, आकलन, स्मरण, तर्कसंगती, प्रतिभा, समस्या परिहार, निर्णय), नियोजन कौशल्ये तसेच अभिव्यक्ती कौशल्ये कशी विकसित होतील, विद्यार्थ्यांचा भावकोश कसा समृद्ध होईल, नवनिर्मितीची इच्छा व क्षमता कशी वाढेल,याकडे लक्ष द्यायला हवे.
अभ्यास का करायचा? फक्त मार्कांपुरता अभ्यास नाही तर, कुतूहल जागे करून ते शमवण्याकरिता, ज्ञानप्राप्तीच्या आनंदानुभवाकरता अभ्यास करायचा आहे, यासाठी अप्रत्यक्षरीत्या मुलांसाठी पालकांनी  करायला हवं. शिकलेल्या गोष्टींचे उपयोजन कसे वाढेल,हे पाहणं गरजेचं आहे. अभ्यास कोणत्या पद्धतीने केला म्हणजे मुलांना आवडेल,याचे निरीक्षण पालकांकडे असायला हवे. टीव्ही,इंटरनेट यांचाही वापर यासाठी करता येतो. एकेक पुस्तकं मुलाच्या हातात देऊन त्याचे निरीक्षण करायला सांगावं. त्यात अभ्यासाला काय काय आहे,हे त्याला सांगायला सांगायचं. तुम्ही त्यात सुरुवातीला काही गोष्टी सुचवू शकता नंतर ते आपोआपच पुढच्या पाठ्यपुस्तकांत त्यात काय काय आहे, हे शोधेल. मुलाला या इयत्तेत काय शिकायचं ,हे समजणे गरजेचे आहे.
मुले वर्गात व्यवस्थित ऐकून घेतात की नाही हे कळत नसलं तरी त्याने वह्यांमध्ये नोंदी व्यवस्थित केल्या आहेत की नाही, हे पाहायला हवे. मुले लिहून घ्यायला कंटाळा करतात. त्यामुळे शब्द, वाक्य गाळलेली असतात. यामुळे मुलांना काय शिकवलं हे कळणारच नाही. मुलांचा वाचनाचा वेग वाढावा हे जरी अपेक्षित असले तरी घरी धडे मोठ्याने वाचायला सांगून त्याच्या शब्द उच्चारांकडे लक्ष द्यायलाच हवे. अनुलेखन यावरही भर देणे गरजेचे आहे. या मूलभूत गोष्टी पक्क्या करण्याकरता वारंवार याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शुद्ध लेखन आणि वाणी आज महत्त्वाची आहे. जसे बोलतो,तसे लिहिता आले पाहिजे. काही शब्द उच्चारण आणि लिखाण यात फरक आहे, हेही त्यामुळे मुलांना कळणार आहे. श्रवण क्षमता चांगली विकसित होण्यासाठी घरीही काही प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे.
आज मुलांनी तयार उत्तरे देणे अपेक्षित नाही. त्याला जसे कळले,तसे उत्तर येणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्वतःच्या विचाराने उत्तरे लिहिण्याची सवय ठेवायला हवी. नेमकं उत्तर शोधणं आणि ते नेमक्या शब्दांत लिहिणं यासाठी लहान वयात थोडा वेळ द्यावा लागतो.पण एकदा सवय लागली की मुले-मुली त्यांची प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात. धड्याचा सारांश लिहायला सांगितल्यास मुलांना धडा किती कळला, हे कळायला मदत होते.  वर्तमानपत्रे आणि अवांतर पुस्तके घरात अवश्य असायला हवीत. यामुळे अभ्यासात विशेष गती असलेल्या किंवा विशिष्ट विषयाची आवड असलेल्या मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. -मच्छिंद्र ऐनापुरे 7038121012

No comments:

Post a Comment