तो काळा दिवस होता-6 ऑगस्ट 1945. भयंकर अणुबॉम्बच्या स्फोटाने चार लाख लोकांचा घास घेतला. किरणोत्सर्जनाचे परिणाम पुढे अनेक वर्षे अनंत लोकांनी सोसले. या कटू घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 1945 साली सर्वत्र महायुद्धाचे ढग दाटून आले होते. सगळे जग युद्धाच्या छायेने ग्रासले होते. परंतु लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या अणुबॉम्बच्या विध्वंसक शक्तीची कुणालाच कल्पना नव्हती. मात्र आज त्या घटनेच्या नुसत्या आठवणीने आपल्या हृदयात कालवाकालव होते. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमातले सामान्य जनजीवन सकाळी नित्याप्रमाणे सुरू झाले. सकाळचे सव्वा आठ वाजलेले. शाळा-महाविद्यालये, नोकरी-चाकरीसाठी जाणाऱयांची लगबग. रस्त्यावरून एका छोट्या मुलीला घेऊन तिची आई चालली होती. "आई आई, लवकर बघ, वर आकाशात किती तेजस्वी काहीतरी..." आणि तिचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच सूर्याइतकीच प्रखर उष्णता बाहेर फेकत, सारे आसमंत हादरावणारा महाभयंकर आवाज करत आगीचा लोळ जमिनीवर आदळला होता. त्या मुलीचा आणि तिच्या आईचाच नव्हे तर हिरोशिमातील चार लाख लोकांचा घास त्या भयंकर अणुबॉम्बने घेतला. माणसांचे कोळसे झाले. चालत्या-बोलत्या माणसांचे देह हवेत उंच उडून त्यांचे अवयव जमिनीवर इतस्ततः उधळले. प्रेतांचा खच, रक्ताचे पाट आणि हाडामांसाच्या चिखलाने हिरोशिमाची भूमी संपूर्णपणे व्यापली. रेल्वे, बसेस, ट्रॅम्स आणि इमारती कोसळल्या. आगीचा डोंब उसळला. धुराचे लोट इतके की नजरेसमोर काहीच न दिसावे. पण नजरेसमोर पाहण्यासाठी जिवंत तर कुणी हवे? डोळ्यांची पापणीही लवायला अधिक वेळ लागेल इतक्या क्षणात गगनभेदी किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला. जणू ही पृथ्वीच नष्ट होतेय असं वाटावं. 43 लोकवस्तीचे आणि सात नद्यांचा परिसर असलेले हिरोशिमा क्षणात बेचिराख झाले. भाजलेली,पोळलेली, मरणप्राय वेदना सहन करीत पाण्याच्या शोधात जणू प्रेतेच सैरावैरा धावत होती. नव्हे धावयाचा प्रयत्न करता करताच एकेकजण कोसळून प्राण सोडत होता. मृत्यूला कवटाळत होता. एका शांततापूर्ण शहराचे जळणाऱ्या नरकात रुपांतर झाले होते.
हे महायुद्ध संपल्यावरही 25-30वर्षे किरणोत्सर्जनाचे परिणाम भोगत अनंत लोकांनी प्राण सोडले. हिरोशिमाच्या आसपासच्या आठ ते दहा मैलांच्या परिसरात अणुबॉम्बच्या भयावह परिणामांचे बळी जात राहिले. आजही स्फोटातून अत्यंत गंभीर रीतीने जखमी झालेले व मृतवत जीवन जगणारे काही हजार जीव तिथे आहेत. त्यांची वस्ती सामान्यांपासून , शहरापासून दूर आहे. त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून सरकार सर्वोतोपरी काळजी घेते. त्यांच्या औषधापाण्याची सोया सरकारच करते.
हिरोशिमातील महाभयंकर घटनेला एक वर्ष पूर्ण होताना हजारोंच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने लोकांनी बळी गेलेल्या किंवा त्यांचे भयंकर परिणाम भोगत असलेल्या लोकांसाठी मदतकार्य सुरू केले. पुढे त्यांना बहुसंख्य लोक येऊन मिळाले. या सर्वांच्या प्रयत्नांने 'पीस पार्क' उभे राहिले. ऑगस्ट 1949 मध्ये जपान सरकारने हिरोशिमाला 'पीस मेमोरिअल सिटी' म्हणून घोषित केले.
या परिसरात एक स्मारक उभारले आहे. त्याच्यासमोरचा परिसर स्वच्छ,सुंदर,रमणीय आणि खूप मोठा आहे. इथे दरवर्षी6 ऑगस्टला लाखभर लोक येऊन मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना शोकाकुल होऊन श्रद्धांजली वाहतात.'No more Hiroshimas. Don't allow the disaster of Hiroshima to be repeated...' अशी प्रार्थना करतात.
इथेच एका दुमजली भव्य इमारतीमध्ये 'हिरोशिमा हिस्टरी म्युझियम' उभारले आहे. तिथे अणुबॉम्ब पूर्वीच्या आणि नंतरच्या हिरोशिमाची छायाचित्रे, वस्तू, पुतळे इ.मांडून त्याबद्दलची सविस्तर माहिती जपानी आणि इंग्रजी भाषेत दिली आहे. शिवाय या विषयावरचा अर्ध्या तासाचा लघुपट दाखवला जातो. म्युझियम आणि लघुपट पाहताना मानवी क्रौर्याची, अमानुषतेची दृश्ये पाहून मान शरमेने आणि दुःखाने खाली जाते.
1945 मध्ये त्या बॉम्बस्फोटातून दोन वर्षे वयाची सडाको ससाकी ही मुलगी वाचली होती. पुढे ती शाळेत जाऊ लागली. धावपटू म्हणून तिने नाव कमवायला सुरुवात केली. पण वयाच्या अकराव्या वर्षी तिला किरणोत्साराच्या परिणामाने झालेल्या कर्करोगाने गाठले. ती अत्यंत निराश आणि दुःखी झाली. तिचे वर्गमित्र तिला भेटायला येत.क्रेन पक्षी एक हजार वर्षे जगतो. 'तू जर एक हजार कागदी क्रेन बनवलेस तर तुझी इच्छा पूर्ण होऊन तू पुन्हा पूर्ववत निरोगी होशील', असे मैत्रिणीने सांगितल्यावर सडाको हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेतही रंगीत कागदाचे क्रेन बनवू लागली. मृत्यूपूर्वी तिने 644 क्रेन बनवले. पण अखेरीस मृत्यूने 1955 मध्ये तिला गाठलेच. पुढे तिच्या वर्गमित्रांनी उरलेले 356 क्रेन बनवले आणि सडाकोच्या पार्थिव देहाबरोबर ते सर्व एक हजार क्रेन दफन केले गेले. एका अर्थी तिची इच्छा पूर्ण झाली होती. अनेक वर्षे तिने तेथील लोकांच्या हृदयात स्थान मिळवले.
या दुर्घटनेत ज्या लहान मुलांचे सडाकोप्रमाणे बळी गेले त्यांचे स्मारक उभारण्याचे जपानमधील तरुणांनी ठरवले. त्यासाठी देशभरातून आर्थिक मदत गोळा करण्यात आली. आणि 1958 मध्ये 'हिरोशिमा पीस पार्क'जवळच त्या स्मारकाचे अनावरण झाले. 'माऊंटन ऑफ पराडाईज' नावाच्या ग्रॅनाईटच्या उंच वास्तूच्या शिखरावर आपल्या पसरलेल्या हातात क्रेन पक्षी घेतलेली सडाको त्या ठिकाणी आपल्याला दिसते. दरवर्षी6 ऑगस्टला म्हणजेच शांततादिनी हजारो कागदी क्रेन्स अर्पण केले जातात. या स्मारकावर शब्द कोरले आहेत.
There is our cry
This is our prayer
Peace in the world.
चार टन वजनाचा जगातला पहिला अणुबॉम्ब अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा या शहरावर टाकला. या बॉम्बचे नामकरण 'लिटल बॉय'असे करण्यात आले होते. कारण प्रत्यक्ष डिझाईनपेक्षा थोडा लहान होता. अमेरिकेने बी 29 जातीचे 'इनोला गे' नावाचे विमान बॉम्ब टाकण्यासाठी वापरले होते. पश्चिम पॅसिफिकमधील तिनियान या अमेरिकी तळावरून या विमानाने इतर दोन विमानांसह उड्डाण केले होते. जपानमधील इच्छित स्थळी पोहचण्यासाठी त्याला तब्बल सहा तास लागले. 'इनोला गे' ठरवलेल्या उंचीवर (10 हजार मीटर) आणि ठरवलेल्या लक्ष्यावर येताच त्यातून 'लिटल बॉय' खाली सोडण्यात आला. स्फोटाच्या पूर्वनियोजित उंचीवर (600 मीटर) पोहोचायला त्याला 57 सेकंद लागले. स्फोट होताच हिरोशिमाच्या इतिहासातील तो काळा दिवस उगवला.
अणुबॉम्बमधील युरेनियम व प्लुटोनियम यांच्या विघटन क्रियेतून बाहेर पडणारी ऊर्जा अत्यंत भयंकर व प्रचंड असते. आरडीएक्स किंवा टीएनटी पेक्षा हजारो पटींनी ही ऊर्जा जास्त असते. ऊर्जेबरोबर बाहेर पडणारे किरणोत्सारी किरणे हे जास्त संहारक व खूप वेळ टिकणारे असतात. 'लिटल बॉय' मध्ये 50 किलो युरेनियम-235 हे मूलद्रव्य भरलेले होते. साधारण एक किलो वजनाच्या युरेनियम-235 च्या विघटनाने निर्माण होणारी ऊर्जा ही 16 हजार टन टीएनटी (ट्रायनायट्रो टोल्युईन) विस्फोटाकाच्या ऊर्जेएवढी असते. या ऊर्जेतील50 टक्के ऊर्जा स्फोट स्वरूपात (pressure wave ), 35 टक्के उच्च तापमानाच्या स्वरूपात आणि 15 टक्के ऊर्जा किरणोत्साराच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. स्फोटाच्या केंद्रातील तापमान 10 लाख डिग्री सेल्सिअस इतके असते. स्फोटामुळे प्रचंड वेगाने पसरणारा एक आगीचा लोळ तयार होतो. केवळ एका सेकंदात पसरणारा हा लोळ 200 मीटर एवढी त्रिज्या व्यापतो. या क्षणी या लोळाच्या पृष्ठ भागावरील तापमान 5 हजार डिग्री सेल्सिअस इतकं पोहोचतं. अर्थात स्फोटातील 50 टक्के ऊर्जा 'प्रेशर वेव्ह' या स्वरूपात असल्याने 'प्रचंड विध्वंसक दाब' स्फोट केंद्रातून निर्माण होतो. व या विध्वंसक'दाबलहरी' आपल्या वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट उद्वस्त करतात.
तापमान,विध्वंसक दाब व किरणोत्सर्ग यांच्या मिश्र परिणामाने हिरोशिमाचा अक्षरशः कोळसा झाला. स्फोट केंद्रापासून दोन किलोमीटर त्रिज्येतील सर्व मालमत्ता व मानवी जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. दोन ते तीन किलोमीटर त्रिज्येतील जवळजवळ90 टक्के मालमत्ता नष्ट झाली किंवा त्यांचे प्रचंड नुकसान झाले. किरणोत्सर्गाचे प्रमाण सुरुवातीला प्रचंड होते. ऑगस्ट ते डिसेंबर1945 या कालावधीत अनेक लोक किरणोत्सर्गाने होणाऱ्या रोगाने दगावले. किरणोत्सर्गाची लागण पूर्णपणे नाहीशी व्हायला त्यापुढील चार दशके जावी लागली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012
No comments:
Post a Comment