पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर खूप काळ अन्याय झाला.त्यांच्यातील गुणांना शतकानुशतके वाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने विकसित झाले नाही. पुरुषप्रधानतेमुळे पुरुषांना जे अवास्तव स्वातंत्र्य मिळाले,त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. नंतर मात्र स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे पुरुषांच्या या कमतरता उघड झाल्या.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केल्यानेच माणसातले सुप्त गुण उघड होतात.त्यामुळेच बऱ्याचदा दरिद्री, अनाथ, संकटग्रस्त वा अभावग्रस्त मुले ही सर्व तऱ्हेची अनुकूलता लाभलेल्या लक्ष्मीपुत्रांपेक्षा जास्त यश कमावतात. काहीतरी मिळवण्याचे ध्येय त्यांच्यासमोर असते. हीच गोष्ट आजवर दडपल्या गेलेल्या महिलांबाबतीतही घडते आहे. त्यांना आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे असते,तरच आपले शिक्षण पुढे चालू राहते,याची त्यांना जाणीव असते. याउलट मुलांना मोकळे वातावरण, स्वातंत्र्य, शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच त्यांच्यापुढे कमी आव्हान असतात. यामुळे त्यांच्यात जिद्द,प्रेरणा राहत नाही.
आणखी एक कारण म्हणजे मुलींना 'सातच्या आत घरात' चे बंधन पूर्वीपासूनच होते. तसेच दिवसाही त्यांनी उगीचच गप्पाटप्पा, फिरणे वगैरे गोष्टीत अनावश्यक वेळ काढू नये, अशी अपेक्षा नव्हे तशी सक्तीच होती. अर्थातच त्यामुळे मुलींना घरातला वेळ विधायक कामांसाठी देता येई. याउलट मुलांना उशिरापर्यंत खुशाल बाहेर राहण्याची मुभा असल्याने उनाडपणा व व्यसनात ती सहजी सापडू शकतात. त्यांच्या संगतीबाबत पालकांना तेवढे जागरूक राहावेसे वाटत नाही.
पूर्वी स्त्रिया घरात बंदिस्त होत्या तरी त्यांना दिवसभर भरपूर गृहकामे असत. स्वयंपाक, मुलांचा सांभाळ, दळण-कांडण, घरातील वृद्धांची सेवा, पै-पाहुणे यांचा पाहुणचार हे पूर्वापार संस्कार स्त्रीला स्वस्थ बसू देत नाहीत. यासाठी अपार मेहनत आणि चिकाटी लागते. याउलट मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तरी दैनंदिन व्यवहाराचे जीवनशिक्षण त्यांना मिळाले नाही. घरातील अति महत्त्वामुळे आपण कसेही वागलो तरी चालेल, आपले तेच बरोबर, अशी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. अनिर्बंध वर्तणुकीचे संस्कार या पुरुषप्रधानतेमुळे झाले.
शिवाय व्यवस्थापनात मुलीच मुलांपेक्षा अधिक सरस ठरतात. आज मोठमोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीची जागा मुलींनी पटकावल्या आहेत आणि त्या कंपन्या सुव्यवस्थित चालवताना दिसतात. यावरूनच मुलींचे व्यवस्थापन कौशल्य लक्षात येते.
एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील ज्येष्ठांशी वागताना वापरण्याचे कौशल्य, पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना पाळावयाचा शिष्टाचार, स्वयंपाक करताना वापरावी लागणारी कल्पकता, प्रयोगशीलता, कृतीशीलता, कौशल्य, काटकसर, नियोजन, घरखर्च भागवताना पैशांची बचत आणि आर्थिक नियोजन ,घरातील विविध कामे एकाचवेळी पार करताना करावे लागणारे वेळेचे नियोजन, तत्परता अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये आपसूकच व्यवस्थापन कौशल्य विकसित होत जाते. या संस्कारांमुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व घरी असूनही एकांगी झाले नाही. यामुळे मानसशास्त्रीय तत्त्वानुसार, संधी मिळताच 'ट्रान्स्फर ऑफ ट्रेनिंग' होऊ शकते. उलट, पुरुषवर्ग अशा प्रशिक्षणापासून वंचित राहिला. त्यांचा फावला वेळ अनुत्पादक गोष्टीत जातो. कलाकौशल्याची आवड निर्माण होत नाही. ती जोपासली जात नाही. बेफिकीर वृत्ती वाढीला लागते.
संधी मिळताच स्त्रियांना या जीवनशिक्षणाचा उपयोग ,कलागुणांचे संस्कार शिक्षणातही कामी येतात. त्यामुळे परीक्षा तसेच वेगवेगळ्या प्रांतांत स्त्रिया आघाडीवर राहू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. शिवाय त्यांना संधीही दिल्या जात आहेत. आणि त्याचा पुरेपूर लाभ त्या घेत आहेत.
मात्र आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी पुरुष संस्कृतीच्या अन्याय, अत्याचाराचा फटका त्यांना बसतच आहे. स्त्रियांची होत असलेली सरशी या पुरुषांना खटकत आहे. ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या घातक आहे. पुरुषांनी स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या सोबतीने वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व घडवायला हवे. दोघांचेही व्यक्तिमत्त्व सर्वांगीण, परिपूर्ण झाले तरच खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
Friday, July 24, 2020
मुलीच हुशार कशा?
नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे यात मुलीच आघाडीवर दिसल्या. त्यामुळे दरवर्षी लोकांना एकच प्रश्न पडतो. मुलीच हुशार कशा? त्यांच्यावर पुरुषप्रधान संस्कृतीची इतकी बंधनं असताना मुली खुशाल मुलांना मागे टाकून पुढे जाताहेत. ककरिअर क्षेत्रातही असेच घडत आहे. मात्र थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, पुरुषप्रधान संस्कृती मुलींना फायद्याची आणि मुलांना घातक ठरली आहे. निदान आता तरी मुलांनी सावध व्हायला हवे आणि मुलींची परीक्षांमधली यशाची परंपरा खंडित करायला हवी. खरं तर जीवशास्त्रीयदृष्ट्या ,शारीरिकदृष्ट्या मुलामुलींमध्ये फरक असला तरी बौद्धिक दृष्टीने मुलगा आणि मुलगी सारखेच असतात. तरीही आज निकालांमध्ये परीक्षांमध्ये आघाडीवर असताना दिसत आहेत. पारंपारिक सामाजिक दबावामुळे मुलींमध्ये चिकाटी आणि परिश्रम करण्याची वृत्ती जास्त असते,तर मुले मोकाट सुटल्यामुळे चंचल असतात.श्रम घेण्याची त्यांची तयारी नसते. मुलींना संधी मिळताच त्या त्याचे सोने करतात. मुलांना वर्षानुवर्षे संधी मिळत आहे, मात्र त्याचे सोने करण्यात मुले मागे पडताना दिसतात. मुलींची पूर्वापार जडणघडण आणि मुलांची पूर्वापार जडणघडण इथे महत्त्वाची आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment