Monday, July 6, 2020

शिक्षण सेवकांची कैफियत,'सांगा, कसं जगायचं?'


रोज रोजंदारीवर जाणारा अल्पशिक्षित आणि अल्पकुशल मजूर दिवसाला 500 रुपये पगार पाडतो. घरं बांधणारा गवंडी कामात कुशलता आल्यानं रोज 1000 रुपये कमावतो. म्हणजे गवंडयाच्या हाताखालचा आणि रस्त्याच्या कामाला पाट्या उचलायला जाणारा मजूर रोज पाचशे रुपये कमावतो आणि डीएड शिकलेला, गुणवत्तेवर नोकरीला लागलेला शिक्षण सेवक मात्र रोज 200 रुपये कमावतो. आता हा मेळ कसा आणि कुठे घालायचा? याचा अर्थ एकच निघतो,तो म्हणजे शिकून सवरून काही उपयोग नाही. शिकून कोणी मोठं होत नाही. अलीकडे नोकऱ्या नसल्याने अनेक तरुणांना हा प्रश्न नक्कीच  पडला आहे. सरकारी नोकर भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे.
इंजिनिअर किंवा तत्सम पदव्या घेऊन 10-15 हजार रुपयांत काम करायचं. त्यात शहरी भागातील घरभाडे, मेसचे जेवण आणि जाण्या-येण्याचा प्रवास यालाच पैसे पुरत नाहीत. मग त्यात हौस कशी भागवायची आणि घरी पैसे कोठून पाठवायचे, असा प्रश्न पैसे घालून आणि रात्रंदिवस अभ्यास करून पदवी घेतलेल्या तरुणांना सतत सतावत राहतो. त्यात पोरगीही कोण देत नाही. मुलाला नोकरी पाहिजे आणि तीही नोकरी कायम पाहिजे, या अटी घालून मुलीच्या बापाने मुलांना बिन लग्नाचेच ठेवले आहे.  गावी जाऊन गप्प शेती करावी म्हटले तर पाण्याची बॉंब! आणि असली चांगली शेती तरी कुणी पोरगी काही देत नाही. त्यामुळे 'इकडे आड अन तिकडे विहीर' अशा जबर कात्रीत आजचा युवक सापडला आहे.
अलीकडेच बऱ्याच वर्षानंतर आणि प्रतीक्षेनंतर सरकारने राज्यात शिक्षक भरती केली. या सगळ्या नियुक्त्या या गुणवत्तेनुसार झाल्या, हे काय वेगळे सांगण्याची गरज नाही. सरकारने नवीन भरती झालेल्या शिक्षकांना नाव दिलं आहे, 'शिक्षण सेवक'! आणि त्यांना महिन्याकाठी पगार म्हणजे मानधन मिळतं फक्त सहा हजार रुपये. या अल्प मानधनात या शिक्षकाला धड स्वतःचं पोट भरता येत नाही, तिथे आईवडील, बायका-पोरांनी काय अपेक्षा करायची. रोज रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरादेखील यांच्यापेक्षा अधिक पगार पडतो. आणि तो त्याच्या ऐपतीनुसार सुखीदेखील असतो. पण इथं मात्र तऱ्हाच वेगळी आहे. पदवीपर्यंत शिक्षण, त्यासाठी वर्षे वाया घातली आणि मग नोकरी लागल्यावर पगार किती मिळतो तर फक्त सहा हजार! काय करायचं यात आणि कसं जगायचं यात? या प्रश्नांनं सध्या शिक्षण सेवकांचं डोकं उठलं आहे. महागाई वाढत आहे, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत, अशा परिस्थितीत एवढ्याशा पैशांमध्ये काय काय करायचं?  शैक्षणिक आहर्ता नुसार किमान 25 हजार तरी मानधन महिन्याकाठी मिळायला हवी, अशी अपेक्षा शिक्षण सेवकांची आहे. ही कैफियत घेऊन हे उद्याचे भविष्य घडवणारे सेवक सरकारच्या दारासह विविध राजकीय पक्षांच्या ,नेत्यांची उंबरठे झिजवताना दिसत आहेत. मात्र त्यांना फक्त आश्वासनाखेरीज काहीच मिळत नाही. त्यामुळे हा शिक्षण सेवक खचून गेला असला तरी हार मानायला तयार नाही. आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना तेवढ्याच उत्साहाने घडवताना आपल्या मागण्याही नेटाने पुढे रेटताना दिसतो आहे,पण त्याला अजून यश आलेले नाही.
एखाद्या शाळेतील शिक्षक, सहायक शिक्षकाएवढेच काम शिक्षण सेवकाला करावे लागते. मात्र, पगारात मोठा फरक आहे. जुन्या शिक्षकांच्या तुलनेत एक पंचमांशदेखील पगार या नव शिक्षण सेवकांना मिळत नाही. तब्बल दहा-बारा वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती गेल्या वर्षी झाली. त्यानंतर प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेत उमेदवारांना मुलाखतीद्वारे आणि मुलाखतीशिवाय असे दोन पर्याय दिले होते. यातील मुलाखतीशिवाय भरतीतून नवनियुक्त झालेल्यांना शिक्षण सेवक म्हणून सहा हजार रुपये मानधनावर नियुक्त करण्यात आले. या सहा हजारांवर पोट भरत नसल्याने या मंडळींनी मानधन वाढीची मागणी केली आहे आणि ती रास्तही आहे.कारण त्यांना एवढ्या पैशांत काहीच करता येणे शक्य नाही. ही शिक्षण सेवक योजना राज्य सरकारने राबवून आज 20 वर्षे पूर्ण होत आली, तरी त्यात काहीच बदल करण्यात आलेला नाही. अनेक गावांत राहण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अनेक शिक्षण सेवकांना जवळच्या मोठ्या गावात किंवा शहरात राहावे लागत आहे. तिथल्या खोल्यांचे भाडे, मेस आणि प्रवास खर्च या गोष्टीदेखील या सहा हजार रुपयांत पूर्ण होत नाहीत.
एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने त्यांनी 'समान काम, समान वेतन'ची मागणी केली आहे. एकीकडे काही शिक्षण सेवक महिन्याचे मानधन; तर दुसरीकडे काही तासांचे वेतन घेत आहेत.
शिक्षण सेवकही शिक्षकांप्रमाणे कोरोनायोद्धा म्हणून तसेच सर्वेक्षण, दारोदारी जाऊन जनजागृती करत आहेत मोठमोठ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर हे शिक्षक काम करत आहेत आणि तेही विमाकवच नसताना. मग समान वेतनाचा हक्क मिळायलाच हवा, अशी मागणी डीटीएड, बीएड शिक्षण सेवकांनी  केली आहे. शिक्षक भरती
प्रक्रियेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे आमची नियुक्ती झालेली आहे. शिक्षकाएवढेच काम आम्ही करत आहोत. तरीही मानधनात तफावत आहे. सरकारने मानधनवाढीच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी त्यांची कळकळीची मागणी आहे. ऑनलाइन कामे, सर्वेक्षण, रेशन दुकान अशा विविध ठिकाणी ही मंडळी सेवा देत आहेत.  आता शिक्षण सेवक म्हणून काम करीत असलेल्या या शिक्षकांची वयं ही 30 -35 ओलांडलेली आहेत. काहींची लग्नं झाली आहेत. यांच्या सेवादेखील कमी भारतात. त्यामुळे या मंडळींना सेवानिवृत्त होतानाही फार काही हाताला लागत नाही. या मंडळींना आज कर्ज काढून आपल्या  कुटुंबाचा गाडा चालवावा लागत आहे. या सेवकांना किमान 25 हजार रुपये मानधन देऊन त्यांना मानाने जगण्याचे बळ द्यायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

1 comment: