Tuesday, July 14, 2020

(लघुकथा) सरडा


आमच्या शेजारच्या पांढरेंच्या मुलीच्या लग्नाला आलेल्या त्यांच्या एका पाहुण्याला निरोप देण्यासाठी कॉलनीतले आम्ही आठ-दहाजण गेटवर उभारलो होतो. ते एकेक करत सगळ्यांशी आत्मीयतेने बोलत होते. तिकडून माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र सुभाष स्कुटरवरून निघाला होता. थांबून त्यानं कुतूहलानं विचारलं,"कोण आहेत रे हे? मोठी असामी दिसते."
"हो, आमदार आहेत ते!" मी म्हणालो.
"अरे यार, मग ओळख करून दे ना, चल! एखाद-दुसरं कंत्राट मिळायला कामी येतील. कुठले आमदार आहेत म्हणालास?" सुभाष
"कवठेमहांकाळचे माजी आमदार आहेत." मी
"म्हणजे माजी आहेत तर!" सुभाषचा आवाज नरम पडला.
"स्वभावानं फार चांगले आहेत ते. चल भेटू!"
सुभाषच्या चेहऱ्याचे भाव बदलले.
"बिरा,मला एक महत्त्वाचं काम आहे निघतो. लेबर माझी वाट पाहाताहेत. ओके .सी यू." असं म्हणून त्यानं स्कुटरला किक मारली आणि भर्रकन निघून गेला.
मी आश्चर्याने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिलो.अचानक माझं लक्ष शेजारील एका वाळलेल्या झाडावर बसलेल्या सरड्याकडे गेलं.
एक हास्य माझ्या चेहऱ्यावर पसरलं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012



No comments:

Post a Comment