Monday, July 6, 2020

एसटी वाचली पाहिजे


एसटी राज्याची जीवनदायिनी आहे. गोरगरिबांची वाली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाणारी ही एकमेव एसटी आज आचके तोडत आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून तिला सारखा आर्थिक मदतीचा डोस द्यावा लागत होता, त्यामुळे एसटी आज ना उद्या मरणार, असे म्हटले जाऊ लागले होते. तिला असे किती दिवस डोस देऊन जगावायचे, असाही युक्तिवाद केला जात होता. अर्थात या एसटीचे लचके तोडणारे आपल्याच सरकारात आहेत. प्रवाशांना जवळपास 26 सवलती देताना तिच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरकारचा सतत अंकुश राहिल्याने एसटीला उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र निर्णय घ्यायला मोकळीक नाही. त्यामुळे मोडकळीस आलेल्या गाड्यांसह एसटी बिच्चारी जमेल तसं धावत राहिली.
आता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी तीन महिने थांबून राहिली. चाके रुतली. तिला खायला-प्यायला नसल्याने ती जर्जर झाली. फक्त तिला आता सरणावर न्यायचे एवढेच बाकी आहे.
लॉकडाऊनमुळे एसटी थांबून राहिल्याने जवळपास तब्बल दोन हजार कोटींचा महसूल बुडाला आहे. आज एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांना निम्माच पगार देण्यात आला आहे. आता तर तेवढाही द्यायला पैसा नाही. एसटीने राज्य सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे,पण सरकारच आर्थिक गोत्यात सापडल्याने त्याने कोणाकोणाला मदत करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सरकारकडे त्यांच्याच कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे वांदे झाले आहेत. सरकारी नोकरांचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकार एसटीला काय मदत करणार हा प्रश्नच आहे. पण एसटीला वाचवणं आवश्यक आहे. एसटीने स्वतः उत्पन्नाचे सोर्स शोधले पाहीजेतच,पण शिवाय राज्य सरकारनेदेखील मदत केली पाहिजे. एसटीने आता मालवाहतूक करायला सुरुवात केली आहे, ही बाब चांगलीच आहे, अशा पद्धतीने एसटीचे कैवारी म्हणून महामंडळावर बसलेल्या राजकारण्यांनी एसटी वाचवण्यासाठी आपले डोके चालवले पाहिजे.नाहीतर एसटीला सरणावर ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
एसटीकडे सुमारे 18 हजार गाड्या आहेत. 1 लाख पाच हजार कर्मचारी आहेत. जवळपास 65 लाख प्रवाशी रोज एसटीने प्रवास करतात. आणि यातून रोज सरासरी  22 कोटींचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते. मात्र प्रवाशांना 36 सवलतीच्या योजना आहेत. या योजनांमुळेच एसटीला घरघर लागली आहे. प्रवाशांना सवलती दिल्या जात असल्या तरी त्याची भरपाई सरकार करत असते, मात्र ते वेळेवर महामंडळाला मिळत नाही, हेही एक दुर्दैव आहे. मुळात एसटीने कात टाकून नव्या दमाने मार्गक्रमण करायला हवे, असे प्रयत्न केलेच गेले नाहीत. एसटी जाहिरात माध्यमातून बऱ्यापैकी पैसा मिळवू शकते. एसटीकडे खूप मोकळ्या जागा आहेत. त्या जागा अशाच पडून आहेत किंवा त्या अशाच फुकटात इतरांना वापरायला दिल्या आहेत. एसटी बसस्थानक आवाराच्या 100 मीटर परिसरात खासगी वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्रवाशांची पळवापळवी नेहमीची झाली आहे. त्यामुळे एसटी गाड्या मात्र रिकाम्या धावताना दिसतात. सरकार आणि महामंडळाने एसटी फक्त वाचलीच पाहिजे असे नव्हे तर नव्या दमाने ,जोशाने पुन्हा धावली पाहिजे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. एसटीचे खासगीकरण केले आहे, असे समजून तिचा कायापालट केला पाहिजे. म्हणजे तिला तिचे उत्पन्न शोधायला मोकळीक द्या, म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल.
लॉकडाऊन सध्या शिथिल करण्यात आले असले तरी त्याचा उपयोग एसटीला झाला नाही,कारण प्रवाशी वाहतूक अजून बंदच आहे. पुण्या-मुंबईतला कोरोना आता ग्रामीण भागात शिरला असून रोज रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. साहजिकच एसटीने प्रवास करण्याची मानसिकता अजून तयार झालेली नाही. काही मार्गावर एसटी धावत असली तरी  डिझेलचे पैसेसुद्धा निघत नाहीत. असे अजून किती दिवस, किती महिने चालणार माहीत नाही. कारण कोरोनाचा धोका आता अधिक वाढला आहे. लोकांमध्ये कोरोनाची भीती राहिलेली नाही. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि स्वच्छता या कोरोनाला दूर ठेवणाऱ्या त्रिसूत्रीचा वापर करताना लोक दिसत नाहीत. त्यामुळे सध्याला देशात तासाला एक हजार रुग्णांची वाढ होऊ लागली आहे.  24 ते 25 हजार रुग्णांची वाढ रोज होताना दिसत आहे. पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करून भागणार नाही. कारण राज्य आणि देशाची अर्थव्यवस्था सुरळीत आणण्याचे मोठे आव्हान सरकारांपुढे आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सगळे प्रयत्न सरकार करत आहे, मात्र लोकच स्वतः हून आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात येणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत एसटीची रुतलेली चाके कशी आणि कधी मार्गी लागतील सांगता येणे अवघड झाले आहे. राज्य सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याच्या प्रयत्नात असताना राज्यात अनेक धंदे,व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या चालकांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार कोणाकोणाला मदत करणार असा प्रश्न निर्माण झाला असला तरी एसटीला ऊर्जा डोस देण्याची आवश्यकता आहे. तिला पुन्हा रस्त्यावर उतरवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment