Tuesday, July 14, 2020

(लघुकथा) निर्णय


"आई,मला नाही जायचंय मेडिकल लाईनला,का बरं बाबा सारखं सारखं म्हणतात की, पुण्याला जायची तयार कर म्हणून.मला तिकडे इंटरेस्ट नाही." रोहित तिच्या आईला शोभाला म्हणाला.
"ठीक आहे, बाबा! तू काळजी करू नकोस, मी बोलेन तुझ्या बाबांशी."
"मला माहित आहे ,बाबा ऐकणार नाहीत. परंतु, मला टेक्निकल लाईनला जायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं नाही." असं म्हणत त्यानं आईच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं.
रात्री जेव्हा प्रतापराव जेवण करून टीव्हीसमोर बसले,तेव्हा शोभा म्हणाली,"मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे."
"बोल, काय बोलायचंय तुला?" प्रतापराव टिव्हीकडे पाहतच म्हणाले.
"हे बघा, लग्नानंतर मी तुमची प्रत्येक गोष्ट मान्य केली. तुमच्या सांगण्यावरून बाबांच्या आजारपणामुळं त्यांची सेवा-श्रुषुशा करण्यासाठी पंधरा वर्षांची नोकरी सोडली. तुमचा प्रत्येक निर्णय मानला. आज फक्त एक निर्णय माझा मान्य कराल का?" शोभा नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली.
प्रतापरावांनी रिमोट बाजूला ठेवला आणि शोभाच्या चेहऱ्याकडे पाहात म्हणाले,"तुला काय म्हणायचं आहे, ते स्पष्ट सांग. काही हवंय का तुला?"
"रोहित पुण्याला जाणार नाही. त्याला मेडिकलमध्ये रुची नाही. तो बीसीए करून एमसीए करायचं म्हणतोय.हा माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आपण आपली इच्छा त्याच्यावर लादू नये, असं मला वाटतं. त्याला त्याच्या मर्जीचे करिअर निवडण्याचा हक्क आहे. आपलं काम फक्त त्याच्या योग्य निर्णयात साथ द्यायची आहे." शोभा दृढतापूर्वक म्हणाली.
"तू म्हणतेस ते बरोबर आहे.तो म्हणतोय तसंच होईल." असे म्हणून प्रतापराव उठले आणि आपल्या खोलीकडे निघून गेले. रोहित आनंदाने उड्या मारतच आईकडे धावत आला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment