Saturday, August 8, 2020

अनिश्चिततेच्या काळात अभ्यासक्रम उरकण्याची घाई का?

भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 20 लाखांहून अधिक झाली आहे. यामुळे कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त असून ब्राझिलमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त तर भारतात 20 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आणखी चार-आठ दिवसांत आपण ब्राझीललाही मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावू,कारण कोरोनाबाधितांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळा-कॉलेज सुरू करणे अशक्य आहे. कारण आता ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे पर्याप्त आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या उपचारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे मृत्यू दर वाढत चालला आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो. त्याच बरोबर अनेक शाळा-कॉलेजांनी ऑनलाईन शिक्षणाचा अतिरेक चालवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्याच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. आता या सततच्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांची चिंता पालकांना सतावू लागली आहे. शिक्षक आणि शिक्षण संस्था अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई करत आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत मोबाईल आणि लॅपटॉपसमोर बसावे लागते आहे. आणि हेच आता धोकादायक ठरू लागले आहे. आणि मुळात ज्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप नाही,त्या मुलांचे शिक्षण मात्र खंडित झाले आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांची आकडेवारीही मोठी आहे,त्यामुळे सध्या जे शिक्षण दिले जात आहे,ते फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू मुलांसाठीच दिले जात आहे. यामुळे पुन्हा मागास, वंचित घटकांतील मुले शिक्षणात मागे राहण्याची भीती आहे.

ऑनलाईन शिक्षणात मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करताना इंटरनेटचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आजच्या या आर्थिक तंगीच्या काळात हा एक आर्थिक भुर्दंडच पालकांना सोसावा लागत आहे. कॉलेजच्या मुला-मुलींना दररोज पस्तीस ते चाळीस रुपये रोज इंटरनेटसाठी खर्च करावे लागत आहेत. महिन्याला हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च होत आहेत.  एवढे पैसे आणायचे कोठून असा, सवाल आता पालक विचारू लागले आहेत. काही मुलांच्या पालकांनी इंटरनेट सेवाच बंद करून टाकली आहे. त्यामुळे मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पालक चिंतेत असतानाच त्यांना घरी बसल्या आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यामुळे हे ऑनलाईनदेखील फार काळ टिकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुळात या कालावधीत मुलांचा व्यायाम होत नसल्याने शारीरिक त्रासाने डोके वर काढले आहेच, शिवाय डोळ्यांच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. काही कॉलेजच्या प्राध्यापकांनी ऑनलाईन शिक्षण देताना झूम, गुगलच्या माध्यमातून विद्यार्थी तासाला उपस्थित आहेत की नाहीत,याची खातरजमा करताना विद्यार्थ्यांना तास अटेंड करण्यासाठी दमबाजी केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थितीही आता बिघडत चालली आहे.
शासनाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, मात्र काही शाळांनी हा वगळलेला अभ्यासक्रम अगोदरच शिकवला आहे. आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही. शिवाय कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून शाळा कधी सुरू होणार याची निश्चितता नाही. मुळात औषध किंवा लस उपलब्ध झाल्याशिवाय कोणतीही 'रिस्क' धोकादायक ठरणार असल्याने हा जो ऑनलाईन अभ्यासक्रम उरकण्याचा प्रयत्न चालला आहे, तो काहीच कामाचा नाही. कदाचित शाळा सुरू व्हायला पुढचे वर्ष उजाडेल. त्यामुळे कदाचित आणखी अभ्यासक्रम कमी करावा लागेल अथवा शैक्षणिक वर्षच रद्द करावे लागेल. अशी अनिश्चितता असताना ऑनलाईन शिक्षणाचा आणि अभ्यासक्रम उरकण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अभ्यासक्रम आणखी कमी करणे किंवा शैक्षणिक वर्ष रद्द करणे अशी नामुष्की ओढवली तर सध्या अभ्यासक्रम उरकण्याचा जो प्रयत्न चालला आहे,तो सगळा पाण्यात जाणार आहे. मग या कालावधीत विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास झाला किंवा होणार आहे, याला जबाबदार कोण? याची जबाबदारी कोण घेणार आहे. आगामी काळ सगळा अनिश्चित असताना शिक्षण देण्याचा अट्टाहास का? आणि मग जी मुलं या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली आहेत, त्या मुलांच्या भवितव्याचे काय? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून देण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. मुलांचे कलागुण हेरण्याचे आणि त्या गुणांना आणखी चालना देण्याचे काम यानिमित्ताने करता येईल.हे करताना त्याला हसतखेळत शिक्षण देता येईल. थोडा काळ अभ्यासक्रम मागे ठेवून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे ही सोय उपलब्ध आहे,त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देता येईल. नाट्य, गायन,चित्रकला याशिवाय कार्यानुभव या विषयांना स्पर्श करता येईल. संबंधित क्षेत्रातील'बाप' माणूस यांचा परिचय करून देण्याबरोबरच त्यांच्या मुलाखती उपलब्ध करून देता येतील. मात्र याची कुणावर सक्ती असता कामा नये.
मुळात शिक्षण दहावी आणि बारावीपर्यंत मोफत आहे. मात्र आजच्या घडीला ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांना आर्थिक फटका बसत आहे. मग हे कसले मोफत शिक्षण? गेल्या तीन-चार महिन्यात विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आजार जडल्याचे आणि चष्म्याचे नंबर वाढल्याचे दिसत आहे. शारीरिक समस्याही निर्माण होत आहेत. मुले तासंतास मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.  ऑनलाईन क्लासेसच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे, असे आपण म्हणत असलो तरी सध्या विद्यार्थी शाळा-कॉलेज आणि क्लास यांचे तास ऑनलाईन'अटेंड' करत आहेत, यात त्यांचा अधिक वेळ जात आहे. यामुळे शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्यांकडे शासनाने आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणवणाऱ्या मंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर ही पिढी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत घडवणार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. यंदाचे शैक्षणिक वर्ष अनिश्चित गर्देत सापडले असताना मुलांच्या आरोग्याशी  का खेळ  चालवला जात आहे? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

No comments:

Post a Comment