Monday, August 10, 2020

15 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवसाचे माहात्म्य काही औरच आहे. जगातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा भारत हा क्षेत्रफळाने जगातील 7 वा सर्वात मोठा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचं निमित्त साधून भारतात वसाहती स्थापन केल्या. त्यातून आपलं साम्राज्यवादी धोरण पुढे रेटले जात होते. यातूनच इंग्रज,डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होते. इंग्रजांनी आपल्या विकसित शस्त्रास्त्रे, युद्धकौशल्य आणि मुत्सद्देगिरी, फुटीचे राजकारण याचा वापर करून हळूहळू देशातील सर्व राज्यं आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत , म्हैसूरचा टिपू सुलतान, 1818 मध्ये मराठा साम्राज्य, 1850 च्या सुमारास पंजाबमधील शीख व जाट असे एक एक प्रदेश हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली घेतलं. 1857 मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला आणि पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला,तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांमध्ये जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटिश सरकारकडे गेला.

लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. 1920 मध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी चळवळीची सूत्रं हाती घेत अहिंसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या. सरतेशेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश यांना वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय क्लेशदायक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. आणि भारत गणतंत्र राष्ट्र बनले. आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून बिरुदावली मिरवत आहे.

मात्र, आजही भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याबाबतीत इथल्या नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडताना दिसतो. स्वातंत्र्यदिनी भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला, पण फक्त अधिकृत सत्तांतर झालं. तरीही ब्रिटिश सार्वभौमत्व तसंच शिल्लक राहिलं. 1935 चा गव्हरमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हाच घटनेसमान सर्व कारभरासाठी आधारभूत राहिला. मात्र प्रजासत्ताक दिनी नवीन घटना अंमलात येऊन इंग्लंडच्या राजाचं सार्वभौमत्व पूर्णपणे आणि कायमचं हटलं. नव्या घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि एकंदरीत व्यवस्थेतील स्थान निश्चित झालं. त्यामुळे भारत आणि पर्यायाने भारतीय नागरिक खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम झाला. या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व अधिक आहे. मात्र हा झाला एक दृष्टिकोन. परंतु प्रजासत्ताक घडण्याकरिता आणि घटना निर्माण होण्याअगोदर स्वातंत्र्य हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. स्वातंत्र्य- अधिकृत सत्तांतर ही एक मोठी सुरुवात होती. एक महत्त्वाचा मैलाचा दगड होता. म्हणून स्वातंत्र्य दिन अधिक महत्त्वाचा! 

देशाच्या अस्मितेचं प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा हा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचं प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकवत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली असून ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय  ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचं खूप कमी नागरिकांना माहीत असतं. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा किंवा प्लास्टिकचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. त्यामुळे कागदी आणि प्लास्टिक झेंडे वापरू नयेत, यासाठी राष्ट्रीय सणांदिवशी जिल्हाधिकारी आवाहन करताना दिसतात. ध्वज संहितेची ओळख सर्व नागरिकांनी करून घेण्याची गरज आहे.

भारताचं राष्ट्रगीत अनेक प्रसंगी गायलं -वाजवलं जातं. राष्ट्रगीताचं योग्य स्वरूप ,ते वाजवलं जातं किंवा गायलं जाण्याचे उचित प्रसंग, तसेच त्या प्रसंगी राष्ट्रगीताप्रसंगी आदर दाखवण्यासाठी पाळण्याचे संकेट व परंपरा यांबाबतीत सरकारच्यावतीने वेळोवेळी सूचना प्रसिद्ध केल्या जातात. जन गण मन... हे भारताचं राष्ट्रगीत नोबेल पारितोषिक पुरस्कार प्राप्त रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याच्या हिंदीतील केलेल्या भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1911 मधील अधिवेशनात म्हटली गेली होती.रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचं जयगीत म्हणून लिहिलं होतं. 

15 ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण होतं आणि ध्वजाला तोफांची सलामी दिली जाते. भारतीय नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या अधिकाराच्या माध्यमातून देशाचा विकास चिंतला पाहिजे. आपली कर्तव्ये काय आहेत, हे जाणून घेऊन ती पूर्ण करण्याकडे आपला कल असला पाहिजे. समाजाचे-त्यातील राज्यसंस्थेचे-कायदे पाळणे, इतरांच्या अधिकारांचे भान ठेवून वागणे, सर्व मनुष्यमात्रांना प्रतिष्ठेची वागणूक देणे, भविष्यातील समाजाला चांगले जीवन जगता येईल अशा रीतीने-जबाबदारीने आजच्या साधनसंपत्तीचा विनियोग करणे आणि समाजातील नीतिनियम पाळणे, अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. फक्त अधिकार आणि हक्क यांचीच भाषा बोलणे योग्य नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

No comments:

Post a Comment