Saturday, August 22, 2020

खाण्याच्याबाबतीत आळस,लाड धोकादायक

बदललेल्या जीवनशैलीमुळे आज अनेकांना आहाराच्या अनिष्ट सवयी लागलेल्या आहेत. 'फास्टफूड' आणि 'रेडी टू इट' पदार्थांकडे आकर्षित झाले आहेत. घर आणि नोकरी या कचाट्यात सापडलेल्या महिला लवकरात लवकर होणाऱ्या पदार्थांकडे किंवा तयार अन्न पदार्थांकडे आकृष्ट झाल्या आहेत. मात्र यामुळे स्वतःसह मुलांचे आयुष्यही धोक्यात घालत आहेत. खरे तर अन्न पदार्थांबाबतीत कसलाच आळस केला जाऊ नये किंवा आपल्या लाडक्यांना त्याला आवडते ते खाऊ घालू नये. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. 

बाजारात मिळणाऱ्या 'रेडी टू इट' खाद्यपदार्थांमध्ये मेदाचे प्रमाणही अधिक असते. जसे लोणचे टिकवण्यासाठी त्यात भरपूर तेल टाकावे लागते,तशीच काहीशी स्थिती या 'फास्ट फूड' आणि 'रेडी टू इट' फूडची असते. या पदार्थांमध्ये कॅलरी अधिक असते. अशा उत्पादनांमध्ये कार्बोहायड्रेटस आणि प्रोटिन्स असतात. पण आपल्या चौफेर जेवणातून मिळणारे फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे या गोष्टी या पदार्थांमध्ये नसतात. मैद्याचे नूडल्स आपण चवीने पटापट गिळतो, तर चपाती आपण दूध,दही, डाळी, अंडे, भाजी यांच्याबरोबर खातो.त्यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर मिळून त्यात भरपूर पोषणमूल्ये मिळतात. 

घरी एखादा पदार्थ बनवताना व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्या पदार्थांमध्ये आपण बदल करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याला कोलोस्ट्रोलचा त्रास असेल तर त्याच्या चपातीला तूप न लावणे हे करता येऊ शकते. विकतच्या 'रेडी टू इट' किंवा 'फास्टफूड' खाण्यात असा व्यक्तिगत विचार अजिबात नसतो. तो सरसकट सर्वांसाठी एकाच पद्धतीने बनवलेला असतो. 

अलीकडच्या संशोधनातून असेही स्पष्ट झाले आहे की, भारतीय व्यक्ती या चणीने लहानखुऱ्या असल्यातरी त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण अतिरिक्त असते. वजन एकदा वाढले की ते कमी होणे कठीण असते, असाही अनेकांचा अनुभव असतो. ते आटोक्यात राहावे यासाठी आपण दक्ष राहायला हवे. 

प्रामुख्याने मुलांच्या वाढीसाठी योग्य ती पोषणमूल्ये योग्य त्या प्रमाणात मिळणे अत्यावश्यक असते. त्यातूनच त्यांच्या शरीराची घडण होत असते. जर मुलांना फास्टफूडची सवय लागली तर त्यातील प्रिझव्हेंटिव्हजमुळे मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फास्टफूडमध्ये असलेले मेदाचे प्रमाण आणि त्यातली सोडियमची वाढीव मात्रा यामुळे लहान वयातच रक्तदाब व अतिताण यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यात वापरल्या गेलेल्या मैदामुळे वजन वाढते, इन्शुलिन तयार होण्याचे प्रमाण मंदावते. या सगळ्याचे प्रमाण ऐन तिशी-चाळिशीतच दिसायला लागतात. चेहऱ्यावर मुरूम, डाग येणे, शरीरावर, चेहऱ्यावर अनावश्यक लव येणे, गळ्याखाली काळी वर्तुळे येणे-ही सारी लक्षणे तुमच्या जीवन तसेच आहारशैलीत ताबडतोब बदल करणे अत्यावश्यक आहे. 

आजची नवी पिढी मैदानी खेळ खेळत नाही. ही मुले रमतात ती बैठ्या खेळांमध्ये, नाहीतर कॉम्प्युटर, मोबाईल गेममध्ये.त्यामुळे वाढीव कॅलरीज जाळल्या जात नाहीत. 'युरोप-अमेरिकेत कुठल्या आल्या चपात्या?तिथल्या पिढ्या ब्रेडवर तर पोसल्या गेल्या आहेत', असे म्हणणारे लोक युरोप आणि अमेरिकेतील लोकांची सक्रिय जीवनशैली ,व्यायामाची सवय आणि तिथले हवामान या गोष्टींकडे कानाडोळा करतात. आपल्याकडे मात्र लाड केवळ अमुक एका व्यक्तीला आवडते ते खाऊ घातल्यानेच केले जाऊ शकतात, असे मानले जाते. लहान मुलांना भरमसाठ चॉकलेट, मिठाई, शीतपेये देण्यामागची प्रेरणा हीच असते. मात्र प्रिय व्यक्तीला आवडते ते खाऊ घातल्याने त्या व्यक्तीच्या आरोग्य धोक्यात येते, हे मात्र आपण साफ विसरून जातो. विशेषतः मुलांना लहानपणीच खाण्याच्या अयोग्य सवयी लागल्या तर त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

मागे एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑनकोलॉजीचे एक शल्यविशारद यांनी खाण्याच्या अनिष्ट सवयी आणि कर्करोग यांचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले होते. जास्त कॅलरीज असलेले खाद्यपदार्थ आणि शर्करामिश्रित पेये, प्रक्रियायुक्त मांस पदार्थ ,मिठाचा अतिरिक्त वापर केलेले पदार्थ हे कर्करोग निर्माण करणाऱ्या घातक रसायनांची निर्मिती करतात. रक्तातील वाढीव साखरेमुळे स्त्रियांना स्वादुपिंड, त्वचा, मूत्राशयाचा मार्ग, गर्भाशय, स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता दुणावते. असे संशोधन'डायबेटीस केअर' या स्वीडिश जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहे. प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ कॅनिंग, फ्रीजिंग, रेफ्रिजरेशन, डिहायड्रेशन, असेप्टिक प्रोसेसिंग अशा टप्प्याअंमधून जात असतात. या सगळ्या प्रक्रियांमुळे त्या पदार्थांचे पोषणमूल्य कमी होते. रक्तातील साखरेचे आणि मेदाचे प्रमाण वाढल्यास वजन वाढते आणि अतीलठ्ठपणामुळे स्वादुपिंड, मूत्राशय आदी सहा प्रकारचे कर्करोग होतात असे 'अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च' आणि 'वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फ़ंड'ने प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे.

कॅन फूडमध्ये अतिरिक्त प्रमाणात सोडियम असते. व्हाइट ब्रेड आणि पास्तामध्ये मैदा असल्यामुळे तेही आरोग्यदायी नाहीत. चिप्स आणि चिजयुक्त स्नॅक्समध्ये जास्त कॅलरीज असतात. खारवलेले फ्रोझन मासे, केक्स, कुकीज, साखर असलेने ब्रेकफास्ट, सिरियल्स, प्रक्रियायुक्त मांस पदार्थ हेही प्रकृतीला अपायकारक असतात. 'रेडी टू इट' पदार्थांमध्ये असलेले प्रिझव्हेंटिव्हज, कृत्रिम रंग आणि जास्तीच्या कॅलरीज आरोग्याला घातक असतात. भारतीय पारंपरिक जेवणात भरपूर भाज्या, सलाड, डाळी, फळे, धान्य यांचा समावेश असतो. हे खाद्यपदार्थ आरोग्याला पूरक असतात. अशा संतुलित आहारात फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. तुमचा आहार पोषक नसेल तर त्याचा चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यातून हार्मोन्सचे असंतुलन, अस्थमा, अति ताणतणाव असे विकार जडतात. 'फास्टफूड' खाद्यपदार्थांनी पोट भरत नसल्याने ते अधिक खावेसे वाटतात. परिणामी लठ्ठपणा येतो. खरे तर साधे जेवण वा चपाती-भाजी हे पोटभरीचे जेवण असते. आरोग्य उत्तम तर सर्व गोष्टी उत्तम राहतात. त्यामुळे आपल्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना पोषण आहार कसा मिळेल, याची काळजी घरच्या महिलांनी आणि कुटुंब प्रमुखाने घ्यायला हवे. याबाबतीत आळस करू नये, हीच अपेक्षा!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment