Sunday, August 16, 2020

प्रेमविवाहातील धोके...

आजकाल प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी वापराच्या काळात वरकरणी गोष्टींना ,बाह्यसौंदर्याला, बेगडी मूल्यांना अवास्तव महत्त्व येऊ लागलेलं दिसतं. आपला जोडीदार निवडताना शाश्वत मूल्यांचा विचार न होता वरवरच्या बाबींचा विचार जास्त होऊ लागलेला आहे. कदाचित यामुळेच घटस्फोटाचं प्रमाणही वाढीला लागलं आहे. दिसायला सुंदर आहे, याकडे अधिक लक्ष दिलं जातं. वागायला-बोलायला समोरचा माणूस कसा आहे, हे पाहिलंच जात नाही. खरं तर लग्नाबद्दल विचार करणं तशी गंभीर बाब आहे.मात्र यामुळेच पुढे संकट ओढवतं. सगळ्यांनाच पश्चाताप होतो. 

 लग्नाचा निर्णय संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. जुन्या काळी घरची मोठी माणसं निर्णय घेत. अपरिचित व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून वाट्याला येत असे. 'लग्न टिकवणं' या मानसिकतेतून संसाराची सुरुवात होत असे आणि लग्नं टिकतही असत.एकत्र कुटुंबाचा अभिमान वाटत असे.पण अलीकडच्या काळात उलटा प्रवास सुरू झाला. पाश्चिमात्य राहणीमान नव्या पिढीला भुरळ घालू लागली. आता लग्न न करता रिलेशनशिपमध्ये स्त्री-पुरुष राहू लागले आहेत. कंटाळा आला की, दुसऱ्याशी रिलेशन ठेवले जात आहे.

जुन्या पिढीत स्त्री-पुरुष नुसते बोलताना दिसले की बोलबाला व्हायचा.मधल्या पिढीत स्त्री-पुरुषाचं समाजात हसणं, बोलणं सर्वमान्य झालं पण चारचौघात एकमेकांना स्पर्श वर्ज्य होता. आता मुलं-मुली एकत्र भेटतात, मोकळेपणानं गप्पा मारतात. हात मिळवणं, पाठीवर हात ठेवणं वगैरे गैर मानलं जात नाही. स्त्री-पुरुष मैत्री समाज पचवू लागला. मैत्रीचं रुपांतर लग्नबांधनात होणार नाही,हेही ग्राह्य धरलं जाऊ लागलेलं आहे. पुष्कळदा मैत्रिणीशी लग्न नको अशी भूमिका पुरुषांकडून घेतली जाते आणि तशीच मुलगीही मित्राशी लग्न करायला उत्सुक नसते. कधी वाटतं लग्नाबद्दलच्या नव्या पिढीच्या कल्पना अजूनही धूसर असाव्यात. करिअर मागे लागलेली आजची पिढी लग्नाला दुय्यम मानू लागली आहे. 

साहित्यिक व.पु.काळे म्हणतात,लग्न जमवताना पत्रिका बघतात.गुण जुळले तर लग्न जमतं. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे अवगुण जुळवून घ्यावे लागतात. त्यांचं म्हणणं होतं,'एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे सांभाळण्याचे!' प्रेम विवाह करणाऱ्यांनी तर हे जास्तच लक्षात ठेवायला हवं. प्रेमविवाह होतो तेव्हा विवाहाआधी एकमेकांना आनंद देण्यासाठी चांगलं वागलं जातं. चांगलं बोललं जातं. चुका माफ केल्या जातात. लग्नापर्यंत प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल खूप अपेक्षा निर्माण होतात. लग्नानंतर मात्र खरं रूप बाहेर आल्यावर अपेक्षाभंग होतो, वादविवाद होतात. भ्रमनिरास होतो. पालकांनी ठरवलेल्या लग्नात निदान अपेक्षा नसतात. त्यामुळे अपेक्षाभंग नसतो. पण आज चित्र पूर्ण उलटं आहे. 

'खऱ्या प्रेमाची' व्याख्या एका मानसशास्त्रज्ञानं खूप छान केली आहे. 'ज्या सहचर्यातून एकमेकांमधील विधायक गुण व सृजनशीलतेला वाव मिळतो ते खरं प्रेम' या सृजनशीलतेत नव्या जिवाचा जन्मही येतोच. खऱ्या प्रेमामध्ये देणं येत असतं, परतीची अपेक्षा नसते. घेवाणीची इच्छा नसते. असं घडलं तरच प्रेम टिकतं. खऱ्या प्रेमात स्वतःचा अहं गौण समजायला लागतो. खूपशा घटस्फोटापर्यंत आलेल्या दाम्पत्यांमध्ये प्रत्येकाचा अतिरेकी अहं कारणीभूत ठरत असतो. प्रत्येक शक्ती भिन्न असते याची जाणीव लग्नाआधी असणं जरुरी आहे. ज्या व्यक्तीबरोबर लग्नगाठ जुळली त्या व्यक्तीच्या लहान लहान सवयींमुळे परस्परांत वाद होऊ शकतात. स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. शिंकणं, खोकणं असल्या किरकोळ सवयी दुसऱ्या व्यक्तीला चीड आणू शकतात. वेगळ्या सवयी, आवडीनिवडी याबद्दल एकमेकांशी बोलता आलं, संवाद साधता आला तर मात्र काही तडजोड शक्य असते. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधला व्यवहार नसतो. तो दोन कुटुंबांमधील दुवा असतो. लग्नातील प्रत्येक जोडीदार आपले नातेवाईक, मित्रमंडळी व आधारगट घेऊन आलेला असतो. लग्नाच्या निमित्तानं ही इतकी सारी मंडळी एकमेकांशी जोडली जाऊ शकतात आणि जोडली गेली पाहिजेत. 'लग्नानंतर आपण वेगळं राहू, नातेवाईक नकोत,' अशी भूमिका असली तरी आपण फार मोठ्या आधारगटाला मुकणार आहोत हे दाम्पत्यानं लक्षात घ्यायला हवं.

प्रेमाच्या अनेक व्याख्यांपैकी एक व्याख्या अशीही आहे की 'केवळ प्रेम करणाऱ्या व्यक्तीबद्दलचं प्रेम नव्हे तर ती व्यक्ती ज्या गोष्टींवर, ज्या व्यक्तींवर प्रेम करते त्या सर्वांवर प्रेम करणं म्हणजे खरं प्रेम!' लग्नाच्या बंधनात शिरण्याआधी या सगळ्या गोष्टींची जाणीव असलेली व्यक्ती जास्त समर्थपणे नव्या जगात स्वतःला सामावून घेऊ शकते व सुखी होऊ शकते. जात, पात, धर्म, शिक्षण, पैसा यांप्रमाणे लग्नसंस्थापण मानवनिर्मित आहे. मानवानं ज्या बुद्धिमत्तेच्या भरवशावर जग मुठीत घेतलं त्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला लग्न टिकवणं, त्यातून आनंद घेणं खरं तर जड जाऊ नये. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment