बदलत गेलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर विचार करता पती-पत्नी या नात्यातही आज बराच बदल झाला आहे. खरोखरच कुटुंब व्यवस्था पती-पत्नी पुरतीच संकोचली गेली आहे. अलीकडे लग्नविषयक जाहिरातींमध्ये 'मुलगी गोरी,सुंदर, ग्रॅज्युएट, नोकरी करणारी, करिअरिस्ट पाहिजे.' आदी अटी असतात. मुलांच्या जाहिरातीच्याबाबतीतही हेच दिसते. करिअरिस्ट मुलगी ही सुरुवातीला अभिमानाची बाब असते, पण पुढे संसार सुखाचा करताना हीच गोष्ट अडथळा निर्माण करते. हे आव्हान पेलवणे अनेक घरांना अवघड जाते. त्यातच वेगाने येणाऱ्या पाश्चात्यिकारणाचा सामाजिक आणि त्या अनुषंगाने कौटुंबिक जीवनावरचा होणारा परिणाम थांबवता येत नाही. कितीही शिकलेले तरुण-तरुणी असतील तरीही जेव्हा त्यांच्यात पती-पत्नी हे नाते निर्माण होते, तेव्हा पत्नीने पतीशी सल्लामसलत न करता काहीही ठरवणे , एखादा निर्णय घेणे-हा पुरुषांकरिता इगो प्रॉब्लेम होतो. पुढारलेल्या पत्नीनेही आपला सल्ला घेतलाच पाहिजे, कुळाचार केले पाहिजेत आणि आर्थिक सहभागही दिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. बदलत्या काळानुसार 'वतासावित्री'ची जागा 'कडवा चौथ'ने घेतली आहे, एवढेच. मुंबई, पुण्यासारख्या शहरात तर आयुष्याची गती इतकी वाढली आहे की, पती-पत्नीलाही एकमेकांसाठी मुद्दाम वेळ काढावा लागतो. गतिमानतेमुळे नाती व्यवहारी होत चालली आहेत. व्यवहारावर आधारलेल्या या कुटुंबांमध्ये सहनशीलता कमी झाली आहे. एखादे नाते घडविण्यासाठी ,ते दृढ होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो दिलाच जात नाही. कोणतीही गोष्ट करताना जबाबदाऱ्या वाटून घेणे ,दोघांनी मिळून करणे-हा विचार पती-पत्नीत अभावानेच आढळतो.
अलिकडे कुटुंबातील मुलांची संख्या कमी होत आहे. कुटुंबातील सर्व नात्यात ताणतणाव गृहीत धरले जातात, पण पालक-मुलांचं नातं हे प्रेमाचंच असणार , हेही गृहीत धरले जाते. बदलत्या कुटुंबव्यवस्थेतले हे बदल संमिश्र म्हणजे evolutionaryआणि destructive अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत. कुटुंबव्यवस्था बदलली म्हणजे मुले बिघडली , असे नाही. मुलांमध्ये बदल ही नव्या पिढीची गरज आहे. पालक आणि मुलांमधली मित्रत्वाची भावना आता मौलिक होते आहे. अलीकडे शिक्षक -विद्यार्थ्यांमधले नातेसुद्धा बदलले आहे. या नात्यात गप्पा आणि sharing ला वाव आहे. शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदरापेक्षा मुलांना त्यांच्याशी मैत्रीचं नातं हवं आहे. अर्थात आता जे बदल होत आहेत ,ते सगळे वाईटच असतात असं नाही. पूर्वी एकत्र कुटुंबात ज्येष्ठांचा व्यवहार अंतिम शब्द असे. आपण जर लोकशाहीत राहतो, तर कुटुंबात हुकूमशाही का असावी? एकत्र कुटुंबपद्धतीचा पाया जर हुकूमशाहीवर आधारलेला असेल तर ती पद्धती या प्रवाहात टिकणार कशी? अलीकडे मात्र नाती पारदर्शक होत चालली आहेत. निरोगी होत आहेत. 'ए आई' सारखं ' ए बाबा' चं स्थान निर्माण होत आहे. हा नात्यातला बदल समजून घेतला पाहिजे.
आपण आहोत तसे दाखवायला न घाबरणे , स्वतःच्या क्षमतेच्या जाणिवेबरोबरच दुसऱ्याच्या क्षमतेचीही जाणीव ठेवणे आदी गोष्टी लक्षात घेतल्या तर कुटुंब मोडणार नाही. घटस्फोटाचे दूरगामी परिणाम इतके भयानक आहेत की घटस्फोटितांची मुलं पुढे जेव्हा स्वतःचे कुटुंब घडवू पाहतात,तेव्हा कोणावरही प्रेम करायला , विश्वास ठेवायला घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आशय प्रेम नसून व्यवहार आहे. ज्याच्या-त्याच्या भूमिका ठरल्यामुळे हुकूमशाही आली.हुकूमशाहीचा अतिरेक झाला तेव्हा कुटुंब मोडू लागली. पण जेव्हा 'स्त्री कुटुंब मोडते' असा तिच्यावर आरोप होतो ,तेव्हाच ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होती, हे मान्य करण्यासारखे होते.
आई बाबाला विचारते, त्याच्यापेक्षा कमी पैशांची नोकरी धरते, म्हणजे ती कमी महत्त्वाची आहे, हे मुलांना कळते. तसेच पालक- मुले यांच्यात कितीही मित्रत्वाचे नाते असले तरी 'मी जास्त अनुभवी', 'मी सांगतो म्हणून..'हा पालकांचा दृष्टिकोन बदललेला नाही.म्हणजेच बुद्धिपेक्षा अनुभवला महत्त्व दिल्यामुळे शंभर टक्के लोकशाही या नात्यात शक्य नाही. खरे तर शेवटचा निर्णय हा पालकांचाच-हे. चूक आहे. अनुभव पचवणे, रिचवणे आणि तपासून पाहणे यासाठी वृत्तीचा मोकळेपणा हवा. त्यामुळेच नाते पुढे जाऊ शकते. अनुभवाची प्रक्रिया न मांडता निष्कर्ष मांडल्यामुळे नाते पुढे जात नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात संसदेपासून संसारापर्यंत कुठेही लोकशाही नाही. पूर्वीपासून पुरुषांनी स्त्रीचे उदात्तीकरण केले. तिला 'जननी म्हटले. नंतर स्वतःला अडचण आल्यावर तिला नोकरीला लावले. म्हणजेच स्त्रियांना दुय्यम वागणूक देणारी आणि विषमतेवर आधारलेली अशीच सदोष कुटुंबव्यवस्था आपल्याकडे आहे. तीत सुधारणेची गरज आहे. मात्र त्यातल्या त्यात अलीकडे पुरुषप्रधानता खिलाडू वृत्तीने स्वीकारली जात असल्याचे नमूद केले पाहिजे. पुरुष खिलाडू वृत्तीने मुले सांभाळतात. ज्येष्ठांनीही आपल्या अपेक्षा लादणं कमी केलं आहे. स्वातंत्र्याच्या कल्पना विस्तारत चालल्या आहेत. कुटुंबव्यवस्थेचा पाया प्रेमाधिष्ठित व्यवहाराचा असावा. कुटुंबात समानता म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा स्वीकार आणि आत्मस्वीकारही हवा. कुटुंबव्यवस्थेत दोन पिढ्यांमध्ये लैंगिकतेबद्दल संवाद हवा. अनुभवांचे शेअरिंग हवे. कौटुंबिक बदल हे क्रांतिकारी नकोत, तर उत्क्रांतीवादी हवेत. या बदलांना गतीपेक्षा दिशा हवी. त्यात सुधारणावाद हवा. विविधतेचा आदरच नाही, तर उत्सव करणे महत्त्वाचे आहे. 'मी'ने ठळक असावे, पण छप्पर फाडू नये. नियमांकडून नियमनाकडे जाताना खिलाडूपणे स्वीकारलेले गतिशील संतुलन हवे, एकमेकांचा भावनिक स्वार्थ जपायला हवा, Nurture मध्ये जे घडतं ते हळुहळू Nature चा भाग होईल, अशी आपली जबाबदारीची वागणूक हवी.
No comments:
Post a Comment