आजच्या आधुनिक जीवनशैलीत मधुमेह हा भारतातील आरोग्याच्या दृष्टीने गंभीर विषय बनला आहे. जीवनशैलीतील बदल, असंतुलित आहार आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव यामुळे भारतीयांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याचा समाज आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.
मधुमेहाचे वाढते प्रमाण:
‘थायरोकेअर’च्या अहवालानुसार, 2023 मध्ये 19.6 लाख भारतीय प्रौढांच्या आरोग्य तपासणीमध्ये असे आढळले की जवळपास 49.43% लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी असामान्य होती. यामध्ये 27.18% लोक डायबेटिक होते, तर 22.25% लोक प्री-डायबेटिक अवस्थेत होते.
जागतिक पातळीवरील आकडेवारी:
जागतिक स्तरावर 83 कोटी मधुमेहग्रस्त लोकांपैकी सुमारे एक चतुर्थांश भारतीय आहेत. म्हणजेच 21.2 कोटी भारतीय प्रौढ मधुमेहाने ग्रस्त आहेत. मद्रास डायबेटीज रिसर्च फाउंडेशनच्या अहवालानुसार, भारतात 10.1 कोटी लोक डायबेटिक तर 13.6 कोटी प्री-डायबेटिक आहेत.
मधुमेह वाढण्याची मुख्य कारणे:
1. जीवनशैलीतील बदल: गतिहीन जीवनशैली (शारीरिक हालचालींचा अभाव). ताणतणाव व झोपेचा अभाव. 2. असंतुलित आहार: कुकीज, चिप्स, केक, तळलेले पदार्थ आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचा वाढता वापर. पिठाच्या पदार्थांचे प्रमाण जास्त आणि फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन. 3. शारीरिक सक्रियतेचा अभाव: शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे रक्तातील साखरेचे नियमन योग्य प्रकारे होत नाही.4.आनुवंशिकता: मधुमेहाचा इतिहास असलेल्या कुटुंबांमध्ये याचा धोका अधिक असतो.
मधुमेहाचे परिणाम:
मधुमेह शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करतो. 1. हृदयविकार व उच्च रक्तदाब: मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. 2. मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका: साखरेच्या असंतुलित पातळीमुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण पडतो. 3. दृष्टीवर परिणाम: मधुमेहामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या प्रभावित होऊन अंधत्व येऊ शकते. 4. तळ हात-पायांची संवेदनाशीलता कमी होणे: नसा कमजोर होऊन सुन्नपणा किंवा वेदना होऊ शकतात.
मधुमेह नियंत्रणासाठी उपाय:
मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, फक्त जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि नियमित आरोग्य तपासणी यावर भर द्यायला हवा. 1. आरोग्यपूर्ण आहार: ताज्या फळभाज्या, संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. साखरेचे प्रमाण कमी ठेवावे आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहावे. 2. नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे चालणे, धावणे किंवा योगा करावा. वजन नियंत्रणात ठेवावे. 3.ताणतणाव नियंत्रण: ध्यान (मेडिटेशन) व ताण कमी करणाऱ्या क्रियाकलापांवर भर द्या. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. 4. नियमित आरोग्य तपासणी: रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. प्री-डायबेटिक अवस्थेत निदान केल्यास मधुमेह होण्यापासून बचाव होऊ शकतो. 5.औषधोपचार व डॉक्टरांचा सल्ला: डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधे घ्यावीत. इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी वेळेवर औषधे घेणे महत्त्वाचे आहे.
जनजागृतीची गरज:
मधुमेहाविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे आणि समाजामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करून लोकांना मधुमेहाचे परिणाम आणि प्रतिबंधक उपाय याविषयी माहिती दिली पाहिजे.
मधुमेह हा केवळ आरोग्याचा नाही, तर राष्ट्रीय समस्याही बनत चालला आहे. मात्र, यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर निदान यामुळे आपण मधुमेहाला रोखू शकतो आणि निरोगी जीवन जगू शकतो.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली
No comments:
Post a Comment