रघुनाथराव त्यांचा मुलगा सुशांत शहरातून गावात आला होता, मात्र ते नेहमीसारखे आनंदी नव्हते. असं का होतंय हे त्यांचं त्यांनाच समजत नव्हतं. पूर्वी, सुशांत घरी आला की त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलायचं, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. त्यांच्या पत्नी, सावित्रीचं निधन झाल्यानंतर, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. पण रघुनाथरावांनी कधीच त्या विचाराला थारा दिला नाही. सावित्री गेल्यानंतरही त्यांनी तिची आठवण मनात जपून, सुशांतचं भवितव्य घडवणं हेच आपलं ध्येय ठेवलं.
शेजारी असणारे त्यांचे जिवलग मित्र माधवराव हेच त्यांचं सर्वस्व होतं. अनेक वेळा रघुनाथराव, माधवरावच्या खांद्यावर डोकं ठेवून सावित्रीच्या आठवणीत हमसून हमसून रडायचे. पण हळूहळू त्यांनी स्वतःला सावरलं आणि एकहाती सुशांतचं संगोपन केलं. त्यांनी त्याला आई-वडील दोघांचा प्रेमाचा अनुभव दिला. शाळा, महाविद्यालय सगळं व्यवस्थित करून, त्यांनी सुशांतला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवलं आणि तो आज एक यशस्वी व्यक्ती झाला. सध्या, तो एका मोठ्या कंपनीत सीईओ म्हणून काम करतो आहे आणि आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह पुण्यात एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो आहे.
रघुनाथराव हे गावातल्या तलाठ्याच्या पदावर होते. सुशांत जेव्हा शिक्षणासाठी शहरात गेला, तेव्हा सावित्रीला सुशांतशिवाय घर ओसाड वाटायचं. तो एकुलता एक मुलगा असल्याने, त्याच्याविना सावित्रीची अवस्था वेड्यासारखी होत असे. जेव्हा सुशांत गावात यायचा, तेव्हा सावित्री आणि रघुनाथराव मिळून त्याच्यासाठी चिवडा, लाडू, करंज्या बनवत. सुशांत परत जाताना, सावित्री त्याला प्रेमानं सगळं बांधून द्यायची आणि हसत सांगायची, “बाळा, उपाशी राहू नकोस. अभ्यासात लक्ष दे. तुला मोठा माणूस व्हायचं आहे.”
पण, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. सुशांतच्या लग्नाच्या स्वप्नांनी सावित्रीचं जीवन उजळायचं होतं, पण ती त्याआधीच कॅन्सरने ग्रासली गेली. तिने शेवटचा श्वास घेतला आणि रघुनाथरावाला एकटं सोडून गेली. तिच्या निधनानंतर, रघुनाथराव यांनी आपलं आयुष्य मंदिरात जाणं आणि गावभर फेरफटका मारणं यावरच मर्यादित ठेवलं. त्यांना आता फक्त एकच स्वप्न होतं, ते म्हणजे सुशांतला मोठं करणं.
सावित्री नसली, तरी रघुनाथराव जेव्हा सुशांत गावात यायचा तेव्हा त्याच्यासाठी नेहमी चिवडा,लाडू, करंज्या बनवायला मोठी आई आणि शेजारच्या माईला बोलवत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली.
गावातले लोक नेहमी म्हणायचे, “रघुनाथराव, आता तुमचा सुशांत मोठा झाला आहे, चांगली नोकरी करतो, आता तुम्ही त्याच्यासोबत शहरात जाऊन रहा ना!” हे ऐकून रघुनाथराव हळहळत म्हणायचे, “अरे, माझं गाव, माझं घर आणि इथले लोक सोडून कसं जाऊ? हे घर म्हणजेच माझं आयुष्य आहे. इथेच माझ्या पत्नीचा आत्मा वास करतो. मी कुठेही गेलो तरी तिला सोडून जाऊ शकत नाही.”
पण, या वेळी काहीतरी वेगळं होतं. सुशांत गावात आला आणि यावेळी त्याने आपल्या वडिलांना पुण्यात येऊन राहण्यासाठी आग्रह केला. त्यानंतरची रात्र रघुनाथरावांसाठी खूपच अस्वस्थ करणारी ठरली. त्यांनी विचार केला, आपल्या म्हातारपणात मुलं शहरात काम करत असताना लहान मुलं कोण सांभाळणार? सुशांत आणि त्याची बायको दोघंही नोकरी करत होते. त्यांना कर्ज, मुलांची शाळेची फी आणि इतर जबाबदाऱ्या होत्या. दोघांच्या नोकरीशिवाय कसं चालणार? त्यांना तेव्हा जाणवलं की, आपल्याला मुलांसाठी काहीतरी करायला हवं. ते आयुष्यभर फक्त सुशांतसाठीच जगले होते, मग आता त्याला मदत का करू नये?
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मित्र माधवराव त्यांना भेटायला आले आणि म्हणाले, “रघुनाथराव, मी ऐकलं की सुशांत तुम्हाला कायमचं घेऊन जायला आलाय? तुम्ही कधीच गाव सोडणार नाही असं म्हणायचात. मग आता का हा विचार?”
रघुनाथराव उठले आणि माधवरावसोबत मंदिरात निघाले. तेवढ्यात सुशांत त्यांना अडवायचा प्रयत्न करत राहिला, पण रघुनाथराव ऐकायला तयार नव्हते. वाटेत माधवराव बोलू लागले, “अरे रघुनाथराव, हे सगळं सोडून पुण्यात जाऊन तुम्हाला काय मिळेल? तिथे सुनेचा तिरस्कार, पोतऱ्या-पोतींची कळकळ आणि मुलाचं दुर्लक्ष. बघितलंस ना, माझा मुलगाही असंच करतो. तिथे गेल्यावर माझं काय चाललंय? याची देखील चौकशी करत नाही.”
रघुनाथराव शांतपणे माधवराव ऐकत राहिले. ते मंदिरात पोहोचले. देवाजवळ हात जोडले, काहीतरी पुटपुटले आणि मग घरी परतले. माधवरावाने त्यांना विचारलं, “मग, काय ठरवलं?”
रघुनाथराव हसले आणि म्हणाले, “माधवराव, लहानपणी त्याच्या एका हाकेला मी धावत जायचो, मग आता का थांबू? खरं तर, मुलं मोठी झाली की आपणच त्यांना परकं करतो. सुशांत मला घेऊन जायला आला आहे, मी त्याला कसं नाही म्हणू? तो माझा मुलगा आहे. त्याच्यासाठीच तर आजवर मी जगलोय. आज त्यांना माझी गरज आहे, मग मी कसा पाठ फिरवू? आता माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करावी.”
एवढं बोलून रघुनाथराव माधवरावला निरोप देऊन आपल्या घरात गेले. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment