Wednesday, September 18, 2024

प्रेरक कथा: कधीही स्वतःच्या शक्तीचा गर्व करू नका

महाभारताच्या युद्धात एक असा क्षण आला, जेव्हा अर्जुन आणि कर्ण समोरासमोर उभे राहिले होते. दोघेही महान धनुर्धर होते आणि दोघांच्याही हातात दिव्य अस्त्र-शस्त्र होते. युद्ध प्रचंड तीव्रतेने सुरू होते. अर्जुनाच्या बाणांचा वार कर्णाच्या रथावर होताच, कर्णाचा रथ अनेक पावले मागे ढकलला जात होता. याउलट, जेव्हा कर्णाचे बाण अर्जुनाच्या रथावर येत होते, तेव्हा अर्जुनाचा रथ फारसा हलत नव्हता, केवळ थोडासा मागे सरकत होता.

हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात एक विचार आला. त्याला वाटले की त्याच्या बाणांमध्ये अधिक शक्ती आहे आणि त्यामुळेच कर्णाचा रथ जास्त मागे जात आहे. गर्वाच्या भावनेने भारावलेल्या अर्जुनाने श्रीकृष्णाला हे सांगितले. "माझे बाण खूप ताकदवान आहेत. माझ्या बाणांनी कर्णाचा रथ कित्येक पावले मागे ढकलला आहे, तर कर्णाचे बाण माझ्या रथाला तितकेसे हलवू शकत नाहीत."

अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले, "अर्जुना, तुला वाटते की तुझ्या बाणांमध्ये जास्त शक्ती आहे, पण वास्तविकता तशी नाही. खरं सांगायचं तर कर्णाच्या बाणांमध्ये तुझ्या बाणांपेक्षा अधिक शक्ती आहे."

हे ऐकून अर्जुन चकित झाला. त्याने श्रीकृष्णाला विचारले, "हे कसे शक्य आहे, प्रभू? माझ्या रथावर कर्णाचे बाण लागल्यावर तो फारसा हलत नाही, मग कसे म्हणता येईल की कर्णाचे बाण जास्त ताकदवान आहेत?"

श्रीकृष्णाने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, "अर्जुना, तुझ्या रथावर मी स्वतः बसलो आहे. ध्वजावर हनुमान विराजमान आहेत, आणि शेषनाग तुझ्या रथाचे चाक सांभाळून धरत आहेत. यामुळेच तुझा रथ फारसा हलत नाही. मात्र, या सर्व दिव्य शक्ती असूनही कर्णाचे बाण तुझ्या रथाला मागे ढकलू शकत आहेत, याचा अर्थ त्याच्या बाणांमध्ये अपार ताकद आहे. जर मी, हनुमान आणि शेषनाग यांची कृपा नसती, तर तुझ्या रथाची अवस्था काय झाली असती, याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस."

हे ऐकून अर्जुनाला आपली चूक कळली आणि त्याच्या मनातील गर्व दूर झाला. त्याला कळून चुकले की त्याच्या विजयामध्ये केवळ त्याच्या शक्तीचा भाग नाही, तर त्याच्या बाजूने असलेल्या अनेक अदृश्य सहाय्यक शक्तींचे मोठे योगदान आहे.

या कथेतून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू इच्छित होते की कधीही स्वतःच्या शक्तीचा गर्व करू नये. प्रत्येकाने आपल्या क्षमतेची योग्य जाणीव ठेवली पाहिजे आणि शत्रूला कधीही दुर्लक्ष करू नये. प्रत्येकाने परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आणि त्यानुसार योग्य पाऊले उचलणे आवश्यक आहे.

या गोष्टीचे महत्व समजून घेतल्यावर अर्जुनाचा गर्व दूर झाला आणि तो अधिक नम्र, शहाणा आणि सावध झाला. याच कथेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने अर्जुनाला तसेच आपल्यालाही शिकवले आहे की कोणत्याही गोष्टीत अति आत्मविश्वास व गर्व हानिकारक असतो, आणि शत्रूच्या ताकदीची कधीही उपेक्षा करू नये.

- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment