Thursday, April 6, 2017

चला,उदासीनतेवर बोलू काही

      जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच..) आज 69 वर्षे पूर्ण होत आहेत. दुसर्या महायुद्धानंतर आरोग्याविषयीच्या समस्यांना तोंड देताना जागतिक पातळीवर संघटना उभारण्याची आवश्यकता लक्षात आली होती. त्यानुसार 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना स्थापन झाली. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ 192 देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगात सहा ठिकाणी यासंघटनेची कार्यालये आहेत. द्क्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. आरोग्यदायी मानवी समुदायाची उभारणी हे या संघटनेचे उदिष्ट आहे. संघटनेचे मुख्यालय जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.

     सात एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो. यावर्षी 'चला,उदासीनतेवर बोलू काही  '  “Depression: let’s talk”.असा विषय निवडण्यात आला आहे. त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते.
उदासिनता हा एक मानसिक आजार आहे. या आजाराबाबत आता जास्त बोलण्याची, चर्चा करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे,कारण या आजारात गेलेल्या व्यक्ती स्वत:चे आयुष्य संपवून टाकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना प्रवाहात आणणं फार गरजेचं आहे. आरोग्य संघटनेने या कारणासाठीच चला,उदासीनतेवर बोलू काही  असा विषय निवडला आहे.
     आजच्या धकाधकीच्या वातावरणात माणसाला उदासिनतेने पार घेरून टाकले आहे. त्यामुळे माणसाने उदासिनता घालवून आनंदी,सुखी जीवन जगणे महत्त्वाचे आहे. सगळ्या सुखसोयी उपलब्ध असल्या तरीसुद्धा आपल्याला नेहमी वाटत राहतं की, आपल्या काही इच्छा अपूर्ण आहेत. आपण मग ह्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यामागे लागतो. अनेकदा असफल ठरतो. अनेकदा आपल्या मनाला कसलं तरी दुःख, कसली तरी व्यथा सतत सलत राहते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपलं सुखी जीवन निराशामय करून ठेवतो. आपली झोप उडते. मग आपल्याला काहीच बरं वाटत नाही. कुठंच लक्ष लागत नाही. एक प्रकारची उदासीनता आपल्या चेहर्यावर पसरते. पण लक्षात ठेवा ही उदासीनता एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपवू शकते.
     खरे पाहायला गेले तर अशी एकही व्यक्ती नसेल जी, उदासीनतेपासून मुक्त आहे, दूर आहे. जगातील नामवंत आणि थोर व्यक्तीची सुद्धा ह्या उदासीनतेपासून सुटका झालेली नाही. शेक्सपिअर, मायकेल, अंजलो, टॉलस्टॉय, लिंकन, इंदिरा गांधी या सारख्यांना सुद्धा कधी ना कधी उदासीनतेनं ग्रासलेल होतं. ही उदासीनता कुण्याच्याही वाट्याला येऊ शकते तसेच औदासीन्य कुठल्याही कारणानं येऊ शकते.
जागतिक सर्वेक्षणांत असे आढळून आले की, नोकरी करणार्या जोडप्यांमध्ये औदासीन्य जास्त असतं. करिअरच्या मागे लागलेल्या युवकांनादेखील या समस्येने घेरले आहे. भारतात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हा मानसिक विकार जास्त सतावतो. उदासीनता आल्यावर व्यक्ती हसणेच विसरते. त्याच्या स्वभावात आमुलाग्र बदल घडून येतो. माणूस चिडचिडा होतो, तो कुणाशीही बोलणं टाळतो. त्याला गोंधळ, गोंगाट सहन होत नाही. मोठ्यानं बोललेलं सुद्धा आवडत नाही. दैनंदिन जीवनातील आवडणार्या गोष्टीसुद्धा त्याला त्या परिस्थितीत आवडत नाही. पाहणार्यांना हा त्याच्यात झालेला बदल लगेच लक्षात येतो. त्यालाही वाटतं त्याचं काही तरी बिनसलंय.
उदासीनता एखाद्या व्यक्तीला इतकी पछाडते की, कधी कधी त्याला वाटतं, ह्यावर काही इलाज नाही. आपलं जगणं निरर्थक आहे. आणि त्यावर उपाय एकच तो म्हणजे आत्महत्या. ह्या उदासीनतेमुळे माणूस आत्महत्याही करतो. आत्महत्या हे भ्याडपणाचे लक्षण आहे. आपण जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे, हीच आपली आयुष्यातील कठोर परीक्षा असते. आपण त्या कसोटीला उतरले पाहिजे. सोन्याला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागते. कित्येक थोर माणसे हे घाव सोसूनच नामवंत झालेले आहेत. माणसाकडे सहनशक्ती असायला हवी.
     उदासीनता दोन विभागामध्ये विभागली जाते. 1) न्युरोटिक डिप्रेशन 2) सायकोटिक डिप्रेशन. न्युरोटिक डिप्रेशनमध्ये उदासीनता यायला काही तरी कारण असावं लागतं. सायकोटिक डिप्रेशनमध्ये उदासीनतेचं स्पष्ट कारण आढळत नाही. ती आंतरिक कारणामुळे मेंदूतून उद्भवते.
उदासीनतेच्या मूळ कारणाचा अद्याप शोध लागायचा आहे. प्रत्येक माणूस दुसर्यापासून वेगळा असतो. कुठल्या क्षणाला, त्याला कुठल्या कारणामुळे उदासीनता येईल सांगता येत नाही. दारूच्या व्यसनाच्या आधीन झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला तिच्या हळवेपणामुळे उदासीनता येऊ शकते. मालक आणि नोकर ह्यांच्यातील तंटा, घरात सून सासूमध्ये होणारे मतभेद, शेजार्यांशी भांडण उदासीनतेला आमंत्रण देत असतात. ह्यामुळे घरातील वातावरण दूषित होतं. प्रत्येक माणूस चुकत असतो. पण प्रत्येकवेळी त्याला शिस्त लावू नये. त्याला स्वतःची चूक समजून घेण्याचा प्रयत्न करू द्यावा.
     तसेच आपण आजच्या युगात पाहत असतोच की, वयात आलेल्या तरुणांमध्ये ही उदासीनता जास्त असते. त्याची कारणेही अनेक असू शकतात. बेकार तरुण-तरुणी तर उदासीनतेला मिठी मारून बसतात. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षांची भीती वाटते व कधी कधी प्रेमभंग, किंवा प्रियकराचा अथवा स्वतःच्या मुलाचा मृत्यू असह्य होऊन उदासीनता येत असते. ह्या अशा परिस्थितीत व्यक्ती आत्महत्यासुद्धा करण्यास प्रवृत्त होत असतातआपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहत असतो की, जास्तपणे व्यवहारात बुडालेली व्यक्ती, कर्जात बुडालेली व्यक्ती, आरोग्य बिघडलेली व्यक्ती तसंच कॅन्सर, एड्ससारखे रोग झालेली व्यक्ती पूर्णतः उदासीनतेच्या आधीन होते. अशा व्यक्तींना वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते.
     उदासीनतेनं पछाडलेल्या व्यक्तींना धीर द्यावा. चार हिताच्या जीवनाविषयी गोडी निर्माण करणार्या गोष्टी सांगाव्या. त्याच्याशी प्रेमानं-ममतेनं वागून त्याचं मन हलकं करावं. असं केल्यानं त्याची उदासीनता नाहीशी होते. आपल्या शेजारील,मित्र, नातेवाईक असे कोणी असेल तर त्याला यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करा. (जागतिक आरोग्य दिन)

No comments:

Post a Comment