Wednesday, April 5, 2017

आयुष्याला कधीही कलाटणी मिळू शकते

     आपल्याजवळ पैसाअडका आहे,घरदार आहे,पोरंबाळं आहेत,घरात सगळ्या सुख-सोयी आहेत,पण तरीही जीवन कसं जगायचं माहित नाही, अशी किती तरी माणसं आहेत. जीवन पूर्ण आनंदानं आणि हेतूपुरस्सर जगायचं असतं,याची कल्पनाच नसते. आपले कोणते मित्र आहे,ते काय करतात.खरेच ते मित्र म्हणण्याच्या लायकीचे आहेत का, याचा कधी एकांतात बसून तपास केलाय का?घरात मुला-बाळांच्या गरजांना प्राधान्य देणार नाही,पण मित्र म्हणवणांर्‍यांबरोबर पार्टीत वाट्टेल तेवढा पैसा खर्च करणार? आपण असे किती पैसे उधळले,याचे कधी मोजमाप करणार नाही.पैसा आला किती,गेला किती,याचा हिशेब नाही. नोकरी असेल, चांगला जम बसलेला धंदा-व्यवसाय असेल तर ही बेफिकिरी वाढते. दारु-बिरु आणि जेवणावळींच्या पार्ट्यांची सवय लागली तर घरातले अन्न गोड लागत नाही आणि दारु पिल्यावर मच्छी-मटणशिवाय चालत नाही. अशा परिस्थितीत आयुष्याला आनंद कसा मिळणार, यशाचे शिखर कसे गाठणार? सुखी जीवन म्हणजे काय, हे काय डोंबलाचे कळणार? आला दिवस घालवला.याला जीवन म्हणायचे का?
     आजपर्यंत माझंही आयुष्य असंच गेलं आहे. कधी पैशाचा हिशेब केला नाही. किती आले,किती गेले याचा लेखाजोखा कधी मांडत बसलो नाही. मी नोकरीला लागल्यापासून दारू प्यायला सुरुवात केली. सुरुवातीला बीअरमध्ये पाणी घालून ती प्यायला सुरुवात केली. मग अख्खी बीअर... मग थोडी हॉट... मग सिक्स्टी..नायंटी...क्वॉटर... पुढे एकाने भागेना ...दोनानेही भागेना...कोटा वाढला...मग पुढे तर त्याला धरबंदच राहिला नाही. आज मागे वळून पाहिल्यावर विचार करतो तेव्हा दारूवर किती पैसा खर्च झाला,याला गिणतीच नाही. तब्बल आठरा वर्षे दारू प्यालो. तशी वीस वर्षे होतात, दारू प्यायला सुरुवात करून पण मधे दोन वर्षे सोडली होती. एवढ्या वर्षांच्या दारूचा खर्च काढला तर माझ्या आयुष्यात खरेच काही तरी चांगलं घडलं असतं.दारूने माझे खूप नुकसान केले.पण त्याचा त्यावेळेला विचारच कोण करतो.नशीब एवढंच की माझं घरदार रस्त्यावर आलं नाही.तेवढं होण्याअगोदरच सावरलो. आता विचार करतो तेव्हा खरेच आपल्या जीवनाला काहीच अर्थ नव्हता. एवढ्या कालावधीत काही चांगल्या बाबीही घडल्या. म्हणजे आपण पार दारूत बुडालो नव्हतो.त्यामुळे काही जमेच्याही गोष्टी आहेत.पण आज वाटते, या कालावधीत जे काही प्लस पाईंट होते,तेही खरेतर निर्रथक वाटताहेत. आपल्या आयुष्याला कसलेच वळण नाही, कसलेही नियोजन नाही. अहो,हेतुपुरस्सर काहीच नाही.हे कसले जीवन? मग विचार करतो,खरेच आपण सुखी होतो? आयुष्यात समाधानी होतो? काही बनण्याचे ध्येय होते? नोकरी मिळाली म्हणजे सगळे झाले का? मला वाटते,हे एवढे आयुष्य खरेच फुकाचे गेले. 
     मधल्या काळात पार आत्मविश्‍वासही गळून पडला होता. कुणाला काही बोलल्याचे,कुणाशी वाईट वागल्याचे आठवून मन खायला उठायचं.खरेच आपल्या आयुष्यात खूप चुका झाल्यात. भयंकर म्हणण्याइतपतही झाल्या असतील, असं वाटायचं. आणखी एक विशेष अशा काळात आपल्याला कोणी समजून घेणार नसतं.उलट आपली खिल्ली उडवणारी अधिक असतात.मजा पाहणारी भरपूर असतात. वरून आपल्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,पण आतून ते आसुरी आनंद लुटत असतात. यावर बरेच लिहिण्या-सांगण्यासारखे आहे,पण ते जसे जसे आपण पुढे जाऊ तसे ते ओघाने ये ईल. पण अयुष्यातली निम्मी वर्षे सरल्यावर मला असं वाटतं की आता खरेच आपण नियोजनबद्ध जगावं. तुम्ही म्हणाल, आता असे जगून काय उपयोग ? पण नाही, यापुढेही हेतूपुरससर,परिपूर्ण आणि आनंदानं जगता येतं. आजच्या घडीला मी खराच आनंदी आहे. कारण झाल्या गोष्टी टाळून चांगलं जगता येतं, यावर माझा विश्‍वास आहे. अजूनही फार काळ गेला नाही. अजूनही बरेच काही करण्याची हिम्मत आहे, आत्मविश्‍वास आहे. मला इतरांनाही तेच सांगायचे आहे. ज्यांना कुणाला तुम्ही बोलला,फसवलंत असे वाटत असेल, असे वैगेरे वैगेरे सगळे विसरून जा. पण हे करताना पुढील आयुष्यात त्यांच्यासाठी काही करता येत असेल तर नक्की काहीतरी करा. तुमच्यावर बदला घ्यायला टपलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. त्यांना काय करायचे ते त्यांना करू द्या. ज्यांनी तुमचा अपमान केला, अन्याय- अत्याचार  केला त्यांना माफ करून टाका.कारण त्यातच तुमचं भलं आहे. ते ओझं वागवत तुम्ही सुखाने-समाधानाने जगू शकणार नाही.
     जीवन हलगर्जीपणाने जगण्यापेक्षा योजनाबद्ध रितीने आणि योगायोगाने जगण्यापेक्षा योग्य निवडीने जगायचे ठरवा. याची सुरुवात कधीही करता येते. आयुष्याला कधीही कलाटणी मिळू शकते,याच्यावर विश्‍वास ठेवा. आपल्या डोळ्यांसमोर कुणीतरी प्रेरणा ठेवा. आपला एक हिरो निश्‍चित करा. आणि सगळ्यात म्हणजे वाचन करा. चांगली पुस्तकं वाचा. पुस्तके आपल्याला भरपूर काही देतात. मला वाचनाची आवड आहे. सांगली-कोल्हापूरला गेलो की, हमखास पुस्तके खरेदी करायचो, आजही करतो आहे.पण वाचनासाठी वेळ नाही म्हणून त्यांचं वाचन कधी व्हायचं, कधी व्हायचं नाही. पण आता त्याच्यासाठी खास वेळ काढतो आहे. आवड असली की सवड मिळतेच, नाही का?

No comments:

Post a Comment