Sunday, April 9, 2017

जेतेपदाला गवसणी घालणारी सिंधू

     प्रचंड आत्मविश्वास, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिन मारिनच्या खेळातील उणिवांचा चोख अभ्यास आणि त्यानुसार आखलेल्या रणनीतीची आूक अंमलबजावणी करत पी.व्ही.सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.गेल्या वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अटीतटीच्या मुकाबल्यात कॅरोलिननेच सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नव्हते.त्यानंतर वर्ल्ड सुपरसिरिज फायनल्स स्पर्धेत सिंधूने कॅरोलिनला नमवण्याची किमया केली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी भारतातच झालेल्या प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत कॅरोलिनने सिंधूला हरवले होते. प्रत्येक लढतीगणिक कामगिरीत सुधारणा करणार्या सिंधूने सातत्यपूर्ण खेळासह कारकिर्दीतील सुपरसिरिज दर्जाच्या स्पर्धेचे दुसरे जेतेपद पटकावले. आता सिंधूच्या नावावर ऑलिम्पिक रौप्यपदक,जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके आणि सुपरसिरिज स्पर्धांची 2 जेतेपदे झाली आहेत. आता पी.वी सिंधूची रॅकिंग दोन झाली आहे. याचा तिला मोठा आनंद होणे स्वाभाविक आहे. कॅरोलिन मरीनसोबत खेळल्याने तिला एक मोठी संधी प्राप्त झाली असली तरी तिला पुढचा मार्ग आणखी कठीण असल्याचे वाटते.
पी.वी.सिंधूला खेळ तसा वारसाहक्काने मिळाला आहे.कारण तिची आई पी.विजया आणि वडील पी.वी.रमन्ना दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राहिले आहेत. तिचे वडील 1986 मधील एशियन गेम्स विजेत्या व्हॉलिबॉल संघांचे सदस्य होते. त्यांना अर्जून पुरस्कार मिळाला आहे. तिची आजीदेखील राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू राहिली आहे.

     लहानपणी तिचे वडील तिला आणि तिच्या बहिणीला आयएएस ऑफिसर्स क्लबच्या कोर्टवर घेऊन जायचे. ते व्हॉलिबॉल खेळायचे. पण सिंधूची रुची बाजूच्या बॅडमिंटन कोर्टवर अधिक असायची. मग एका प्रशिक्षकाने वडिलांना सुचवले की, सिंधूला बॅडमिंटन खेळायला देणं आवश्यक आहे. बॅडमिंटन खेळायला संधी मिळाली पण रोज संध्याकाळी बॅडमिंटनचा ज्यादा सराव होत नव्हता. तेव्हा प्रसिद्ध प्रशिक्षक महबूब अली यांनी तिला घरातच रोज वॉल प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला. 2001 साली पुलेला (गोपीचंद) सरांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पिअन स्पर्धा जिंकली,त्यामुळे ती त्यांची फॅनच बनली. आठ वर्षाची असतानाच तिने बॅडमिंटन गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली होती.
     गोपीचंद यांनी गच्चीबोउली येथे आपली अॅ़कॅडमी सुरू केली,तेव्हा तिने त्यांच्याकडून ट्रेनिंग घेण्याचा विचार केला. तेव्हा ती दहा वर्षांची होती. ती पहाटे तीन वाजता उठायची आणि वडिल तिला घेऊन सिकंदराबादहून 56 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या अॅकॅडमीत घेऊन जायचे. तिथे ती साडेचार ते साडेसहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची. सकाळी साडेसहा वाजल्यापासून गोपीचंद सर सायना नेहवालला प्रशिक्षण द्यायचे.तेव्हा ती चांगलीच प्रसिद्धीला आली होती. गोपीचंद सरांनी तिला दोन महत्त्वाची शिकवण दिली होती.कोर्टवर त्यांनी तिला मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा सल्ला दिला होता आणि कठीण सामन्यांमध्ये स्वत:चा आत्मविश्वास गमवायचा नाही,हेही सांगितले होते. दुसरे म्हणजे त्यांनी सिंधूला आक्रमक होणं शिकवलं होतं. खरे तर ती मूळची शांत स्वभावाची,पण गोपीसरांनी तिला प्रतिस्पर्ध्यावर पकड मिळवण्यासाठी कोर्टवर आक्रमक होणं फारच आवश्यक असल्याचं सांगितलं होतं.
     सिंधूच्या खेळाला दोघा आई-वडिलांची मोठी साथ मिळाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे मार्गदर्शनही मिळाले आहे. देशातल्या कुठल्याही भागात बॅडमिंटन खेळायला जाते,तेव्हा तिच्यासोबत दोघेही असतात. एवढेच नव्हे तर सरावादरम्यान आणि सामन्यांनंतर ते आपले मत मांडतात. खासकरून वडिलांनी दिलेला सल्ला तिला उपयोगी वाटतो. तिच्यासाठी आईने रेल्वेतील नोकरी सोडली, कारण तिच्यासोबत जायला-यायला कोणी हवम म्हणून. तिचे दोन हिरो आहेत. त्यातले पहिले हिरो तिचे वडील आहेत,ज्यांनी तिला खेळाविषयी आवड निर्माण केली. आणि दुसरे हिरो तिचे प्रशिक्षक गोपीचंद. त्यांच्यामुळेच ती इथवर पोहचली आहे.
     अलिकडेच तिने सायना नेहवालचा पराभव केला. पण लोक सायनाशी तिची तुलना करतात ते तिला पसंद नाही. ती तिच्याअगोदर कोर्टवर आहे,तिच्यापेक्षाही अधिक पदके तिने मिळवली आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे तिने मुलींना बॅडमिंटनकडे खेचण्यासाठी प्रेरित केले आहे. सिंधूला तिच्या उंचीमुळे लोक तिचा यूएसपी मानतात. खासकरून तिच्या स्मॅशचे कौतुक होते. ऑलिम्पिक पदज जिंकल्यापासून तिने आपली लय कायम राखली आहे नव्हे त्यात आणखी सुधारणा होत आहे.

No comments:

Post a Comment