तीर्थस्थळ आणि
साम्राज्यनगरी बसवकल्याण
चालुक्यांची राजधानी
असलेले कल्याण हे बिदर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. बसवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याला बसवकल्याण असे नाव दिले आहे.
बाराव्या शतकातील वीरशैव चळवळीचे स्मरण होईल, अशा
किती तरी गोष्टी तिथे सापडतात. कन्नड साहित्याच्या अभ्यासकांना
तर त्याचे महत्त्व अनन्यसाधारणच वाटते.येथे कितीतरी गुहा आणि
मंदिरे आहेत. बसवेश्वर,अक्कनगम्मा, अल्लमप्रभू आदींसह अनेक सत्पुरुषांनी येथे
तपश्चर्या केली. महात्मा बसव येथे गोरगरिबांना
दान देत असत. आणि आपल्या सहकार्यांसमवेत वेगवेगळ्या धार्मिक विषयांवर
चर्चा करीत असत. त्यामुळे वीरशैव समाजासाठी बसवकल्याण हे तीर्थस्थळ
म्हणून महत्त्वाचे वाटते. अनेक देवी-देवतांची
मंदिरे येथे होती. शैव, वैष्णव आणि जैन
लोक येथे राहत असत. काही प्रमाणात बौद्धधर्मीयदेखील येथे राहत
होते. धर्माचे आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून या नगराचा
उल्लेख होई. या ठिकाणी अनेक असलेल्या शीलालेखांवरून इतिहास संशोधकांनी
नगर विस्ताराची आणि उद्योगधंद्याच्या भरभराटीची माहिती दिली आहे. बिज्जळ याने इ.स. 1162 मध्ये बसवकल्याण
येथे चालुक्य घराण्याची सत्ता हस्तगत करून स्वत:ला सम्राट म्हणून
घोषित केले. बिज्जळ हा एक शूर योा, चतुर
आणि समर्थ राज्यकारभारी होता. तो दूरदर्शी राज्यकर्ता असल्याने
त्याने सर्व धर्माला समान वागणूक दिली. या राजाने बसव यांना राज्याचा
खजिनदार म्हणून नेमले. राज्याच्या उत्पन्नाची आणि खर्चाची काळजी
वाहणे आणि हिशोबाची कागदपत्रे जतन करणे ही खजिनदाराची दोन कर्तव्य बसव यांनी निष्ठेने
पार पाडली. बसव यांची खजिनदारपदी नेमणूक संबंधी एक कथा सांगितली
जाते. ती अशी: चालुक्य साम्राज्याचा खजिना
मोजण्याचे काम सुरू असताना तेथील अधिकार्यांची चूक झाल्याने
गोंधळ उडाला. त्यामुळे खजिनदाराला लक्षावधी रुपये राज्याच्या
तिजोरीत भरावे लागणार होते. याचवेळी अर्थमंत्री सिद्धदंडनाथ यांच्याकडे
बसव आले असता त्यांनी खजिना पुन्हा मोजून देण्याची जबाबदारी घेतली. बसवने खजिना मोजला असता हिशोबातील चूक सापडली आणि खजिनदारावरचे संकट टळल्याने
सिद्धदंडनाथ यांनी बसवला खजिनदारपदी नेमले.
बसव यांचे सहकारी
बाराव्या शतकातील
धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख केला जातो,कारण तत्कालिन समजात ते सर्वमान्य महात्मा होते. बहुजन
समाजाने त्यांच्या विचारांना आणि कार्याला पाठिंबा दिला .इतकेच
नव्हे तर त्या काळातील (समकालीन) संत व
विचारवंत त्यांचे सहकारी, शिष्य आणि अनुयायी होते. तरुणपणी मंग़ळवेढे आणि बसवकल्याण येथील त्यांचे सहकारी आणि अनुयायी यांची नितांत
श्रद्धा होती.ओरिसातील कलिंग प्रांतातील महादेवी शेट्टी नावाचा
व्यापारी त्यांचा परमभक्त होता. अलमप्रभू (प्रभूदेव) हा थोर संतदेखील बसवांचा प्रमुख सहकारी होता.
परंतु काही ठिकाणी अलमप्रभू तथा अल्लमा यांना बसव यांचे आध्यात्मिक गुरू
असा उल्लेख आला आहे. अलमप्रभू यांनीच लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता
सिद्धराम आणि गोग्गय्या यांना वीरशैव समाजाचे अनुयायी बनवले. सिद्धराम यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्य केले. अक्कमहादेवी ही कर्नाटकातील संत बसवांची अनुयायी होती. सारंगी आणि वीणावादक सकलेश मदारस यांनी अनेक वचने लिहिली. मादिवळ माच्चया हा धोबी, अंबिगार चौदय्या हा नावाडीदेखील
वीरशैवीच होते. मोळीगेय मारय्या हा एकेकाळचा काश्मिर राजा संन्यासी
होऊन कर्नाटकातील जंगलात आला होता. त्याची पत्नी राणी महादेवी
आणि राजा मारय्या हे दोघेही शिवभक्त होते. ऐदक्की आणि त्याची
पत्नी लक्कम्मा तसेच बासरीवादक किन्नरय्या हे बसव यांचे भक्त होते. चन्नबसव हा बसव यांचा पुतण्या अतिशय बुद्धिमान आणि व्यासंगी होता. त्याच्या रचनांमधून षटस्थळ तत्वज्ञानाची संपूर्ण आणि पद्धतशीर माहिती व विवेचन
मिळते.
षटस्थळ अवस्था
महात्मा बसव हे
केवळ मोक्ष लालसा असलेले भक्त नव्हते तर प्रखर बुद्धीवादी होते. धार्मिक आणि सामाजिक या दोन्ही
व्यवहारात त्यांना रस होता. ईश्वराबद्दल
बसव म्हणतात, ईश्वर दर्शन म्हणजे निखळ
आनंद आणि ईश्वराशी मीलन म्हणजे उन्मनी अवस्थेतील परमानंद होय.
आपल्या साधनेच्या आरंभीच्या काळात बसव यांनी ईश्वराला आपला मालक आणि स्वत:ला नोकर मानले. त्यानंतर ईश्वराला पती आणि स्वत:ला पत्नी मानून मधुराभक्ती केली. वीरशैव संतांनी घेतलेल्या
गुढ अध्यात्मिक अनुभूतीची अवस्था ही षट्स्थळ अवस्था म्हणजे सहा पायर्यांमधून वर्णन केलेली आहे. या सहा अवस्था म्हणजे भक्तस्थळ,
महेश्वरस्थळ, प्रसादीस्थळ,
प्राणलिंगस्थळ, शरणस्थळ आणि ऐक्यस्थळ होय.1)
भक्तस्थळ: या अवस्थेत भक्त हा आपल्या मालकाचा सेवक
असतो आणि त्याची अध्यात्मिक उमेदवारी या अवस्थेत सुरू होते. 2) महेश्वरस्थळ: या अवस्थेत पुजनीय
ईश्वरापलिकडे दुसरे कोणतेही दैवत भक्त मानायला तयार नसतो.
3) प्रासादीस्थळ: साधकावर दैवी कृपेचा वर्षाव हळूहळू
सुरू होऊन या अवस्थेत त्याचे चित्त आशेने भरू लागते.4) प्राणलिंगस्थळ:
ध्यान करताना तळहातावर धारण केलेल्या ईष्टलिंगात ईश्वर वास करतो, अशी भक्तीची पक्की धारणा या अवस्थेत होते.
या अवस्थेत ईश्वराचे अस्तित्व आपल्या ठायी आहे,
असा अनुभव त्याला येतो. 5) शरणस्थळ: स्वत:ची संपूर्ण ईच्छाशक्ती ईश्वरचरणी पूर्णत: लीन होते. 6) ऐक्यस्थळ:साधकाचे वेगळे स्वत:चे अस्तित्व लोप पावून भक्त ईश्वरमय होतो. पहिली अवस्था म्हणजे दासोहम. मी सेवक आहे आणि अंतिम अवस्था सोहम म्हणजे मीच तो आहे. आपल्या साधनेत आलेल्या प्रत्यक्ष अनुभवातून या सहा अध्यात्मिक अवस्था बसव यांनी
त्यांच्या संत सहकार्यांना सांगितल्या.
No comments:
Post a Comment