नैराश्य आता फक्त मोठ्यांची व्याधीच
राहिली नाही तर ती मुलांनादेखील होऊ लागली आहे. नैराश्य मुलांसुद्धा
आपल्याकडे खेचत आहे. अलिकडेच दक्षिण पूर्व आशियामधील किशोरवयीन
मुलांच्या मानसिक आरोग्याच्या सद्य परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
त्यात त्यांनी खुलासा केला आहे की, भारतातल्या
13 ते 15 वय वर्षातल्या प्रत्येक चार मुलांपैकी
एक मुलगा नैराश्याने ग्रासलेला आहे. आणि आठ टक्के किशोरवयीन मुले
काळजीमुळे बैचेनीचे शिकार बनले आहेत. ते शांतपणे झोपू शकत नाहीत.
इतक्याच टक्क्यांची मुलं बहुतांश वेळ किंवा नेहमीच एकटेपणा अनुभवताना
दिसत आहेत. अहवालातील आणखी एक धक्कादायक बाब अशी की, मोठ्या प्रमाणात भारतीय मुलांचे आपल्या आई-वडिलांशी फारशे
जवळचे संबंध राहिलेले नाहीत. मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद
राहिला नाही. पण पालक मुलांची काळजीही फार घेत असतात.
मुलांना वाट्टेल त्या वस्तू पुरवतात.फक्त मुलांशी
बोलायला त्यांच्याकडे वेळ राहिलेला नाही. मुलांच्या भविष्याबाबत
पालक जास्तच संवेदनशील असल्याने मुले अधिक नैराश्यतेच्या खाईत लोटले जात असल्याचे अहवालात
नमूद केले आहे. आई-वडिलांचा आपल्या मुलांशी
सतत कमी होत असलेला संवाद मुलांवर मानसिक दवाब आणत आहे. नोकरी
करणार्या आई-वडिलांकडून त्यांना पाहिजे
तेवढा वेळ दिला जात नाही,मात्र त्यांच्यावर विविध माध्यमाद्वारा
वॉच ठेवला जात आहे. याला मानसशास्त्रज्ञांनी हेलिकॉप्टर पॅरेंटिंग
अशी संज्ञा दिली आहे. यामुळेदेखील मुले नैराश्याकडे झुकली जात
आहेत.ज्या नात्यामुळे भावनात्मक संबंध आणि विश्वास मिळायला हवा,यापासून मुले पोरकी होत चालली आहेत.
ही नाती यांत्रिक बनली आहेत. एकत्र बसून गप्पा
मारणं,चांगल्या गोष्टी शेअर करणं, छोट्या
छोट्या गोष्टींचा आस्वाद घेणं, या गोष्टी कमी झाल्या आहेत.
सतत अभ्यासाचे दडपण यामुळे मुलांमध्ये चिंता आणि तणावाच्या धोक्याचा
स्तर वाढत चालला आहे.
ही परिस्थिती फक्त भारतातीलच मुलांचीच नाही तर जगातल्या अन्य देशातल्या
मुलांचीदेखील आहे. अमेरिकेतल्या सेंट लुई युनिवर्सिटी स्कूल ऑफ
मेडिसिन येथील प्राध्यापक स्टुअर्ट स्लेविन यांचा अभ्यासदेखील आपल्याला हेच सांगतो.
त्यांनी ज्यावेळेला हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या तणाव आणि चिंतेबाबत
सर्व्हे केला,त्यात त्यांना 54 टक्के विद्यार्थ्यांमध्ये
तणावाची लक्षणे आणि 80 टक्क्यांमध्ये चिंतेची लक्षणे आढळून आली.
ही बाब फारच गंभीर आहे. हीच परिस्थिती जगभरात आहे,
असे म्हणायला हरकत नाही. शिक्षणाबाबतच्या अपेक्षा
नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत.मुलं सात तासांपेक्षा अधिक वेळ शाळेत
घालवतात. रात्री गृहपाठ करतात. ट्युशन,खेळ,म्युझिक,नृत्य क्लास यासारख्या
अन्य काही गोष्टींमध्ये मुले पार अडकून गेली आहेत. याचा सतत त्यांच्यावर
दवाब असतो. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश,चांगला जॉब आणि भौतिक सुविधांनी संपन्न यशस्वी जीवन या गोष्टींचा मारा सतत
त्यांच्यावर होत असतो.मुलांना सर्वगुण संपन्न आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न याचा उलटा परिणाम
त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे त्यांची क्षमता सतत कमी
होत आहे. शिक्षक आणि पालक यांचा दबाव इतका वाढला आहे की,
पाच-सहा वर्षांची मुलेदेखील त्यामुळे भयभयीत झाली
आहेत.
नैराश्याच्याबाबतीत लोक सातत्याने
चर्चा करीत आहेत, मात्र नैराश्य काही अचानक येत नाही,या गोष्टीकडे कुणाचेच लक्ष नाही. खरे तर याची सुरुवात
लाहानपणापासूनच होते.
ती पुढे पुढे इतकी वाढत जाते की, किशोरावस्थेतच
मुले आत्महत्येसारखी आत्मघातकी पावले उचलताना दिसतात. 2015 मधील
आकड्यानुसार आपल्या देशात तासाला एक मुलगा आत्महत्या करत आहे. हा एक इशारा आहे, तो फक्त पालकांसाठीच नाही तर संपूर्ण
समाज आणि शिक्षण व्यवस्थेसाठीही आहे. शाळेतल्या शिक्षकांनी आणि
पालकांनी एकत्र येऊन मुलांच्या मनस्थितीचे विश्लेषण करण्याची
आवश्यकता आहे. गृहपाठ किती असायला हवा याचा विचार व्हायलाच हवा
शिवाय सुट्ट्यांमध्ये त्यांना अभ्यास दिलाच जाऊ नये. या कालावधीत
त्यांना मोकळेपणाने वागायला मिळायला हवे. शिक्षक किंवा पालकांनी
त्यांच्याशी कठोरपणे वागू नये.
याबाबतीत हरियाणा सरकारने चांगली
पावले उचलली आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून 50 शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत स्कूल बॅग घेऊन जावे लागणार नाही.
त्यांची पुस्तके शाळांमध्येच राहणार आहेत. त्यामुळे
त्यांच्यावर घरच्या अभ्यासाचे दडपण असणार नाही. याशिवाय क्लास
रेडीनेस प्रोग्रामनुसार खेळातून शिक्षण देण्याची तयारी सुरु आहे. जर अशा प्रकारची पद्धत संपूर्ण देशातच अवलंबली तर मुले दबावमुक्त शिक्षण घेतील.
पालकांनाही कळायला हवं की, मुले त्यांच्याकडून
प्रेम,विश्वास आणि प्रोत्साहानाची अपेक्षा
करत असतात.
No comments:
Post a Comment