Sunday, April 30, 2017

महात्मा बसवेश्‍वर (भाग पाचवा)

स्वच्छता आणि शीलतेचे महत्त्व
तत्कालिन समाजावर अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा, रुढी आणि अंधश्रद्धा यांचा मोठा पगडा होता. त्याला छेद देऊन नवीन समाज घडविण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले. अनेक देव-देवतांची उपासना करण्यात समाज गुरफटला होता. पासतापास,नवससायास, पशुबळी, शरीराला इजा पोहोचेल अशा वाईट उपासना यांचे स्तोम माजले होते. महात्मा बसव यांनी जुनी दैवते टाकून फक्त शिव उपासना करावयास सांगितले. मांसाहार,भांग आणि मदिरापान सोडावयास लावले. तत्कालिन साधू, शिष्य आणि साधक हे अत्यंत अस्वच्छ राहत असल्याने त्यांना रोगराई होत असे. याउलट महात्मा  बसव यांनी स्वच्छ आणि सत्शील राहणीला पोषक आचारसंहिता तयार केली. बसव यांचा पुतण्या चन्नबसव याने पन्नास आचारांची नियमावली तयार केली. त्यात नियमित स्नान करणे ,दात घासणे,हिंसा टाळणे, सत्यवचन ,पती-पत्नीने एकनिष्ठ राहणे आदींचा समावेश होता. वीरशैव धर्माचा प्रचार करणार्या गुरुंना या गोष्टी आपल्या शिष्यांना शिकवण्याची आज्ञा होती. वीरशैव धर्माचे निष्ठावंत प्रचारक गावोगाव फिरून धर्मप्रचार करीत. त्यातील काही प्रचारक धर्माची तत्त्वे समजावून सांगताना गोरगरिबांच्या घरी अन्न सेवन करीत नाहीत. त्याइवजी ते शिधा गोळा करून दुसरीकडे स्वयंपाक करून जेवण करतात. असे बसव यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या गोष्टींची निर्भत्सना केली. मनुस्य कुठल्याही जातीचा असो तो श्रेष्ठ-कनिष्ठ नाही असे ते म्हणत. त्या काळात दळणवळणाच्या सोयी नसल्याने काशी किंवा रामेश्वर यात्रेला जाताना शेवटचा निरोप घेऊनच लोक निघत. सुखरुप परतीची शक्यता कमीच होती. बसव यांना मात्र यात्रा म्हणजे श्रम,पैसा आणि वेळ यांचा अपव्यय वाटे. त्यामुळे वीरशैवश साधकाने यात्रा करण्याची गरज नाही. कारण तो साधक स्वत:च देवाचे वसतिस्थान आहे, असेही ते सांगत.

अखेरचा कालखंड
वीरशैव पंथ किंवा धर्माचे महत्त्व समाजात वाढू लागल्याने शत्रूंची संख्या वाढू लागली होती. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रस्थापितांना धक्का बसल्याने त्यांनी वीरशैव समाज आणि महात्मा बसवेश्वरांविरुद्ध कट-कारस्थान करण्यास सुरुवात केली. चालुक्य घराण्याचा सम्राट बिज्जळ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याच्या दरबारात बसव एक खजिनदार म्हणून अधिकारी पदावर असला तरीही राजा आणि अधिकारी यांच्यात फारसे चांगले संबंध नव्हते. कारण बिज्जळला मदत करणारे जमीनदार आणि मंत्री हे प्रस्थापित व्यवस्था आणि परंपरेचे पुरस्कार करणारे होते. तर महात्मा बसव हे बंडखोर विचारांचे होते. साहजिकच राजा आणि बसव यांच्यात खटके उडू लागले. त्यातच एक वेगळीच घटना घडली. बसवकल्याण शहरात मधुवय्या या ब्राम्हणशिष्याची मुलगी आणि अल्लय्या (हरळप्पा) या अस्पृश्य शिष्याचा मुलगा यांच्या विवाहास बसव यांनी मान्यता दिली. सनातनी लोकांनी राजा बिज्जळकडे यासंबंधी तक्रार केली. बिज्जळ याने संतापाच्या भरात नववधू-वरांचे डोळे काढण्याची आज्ञा दिली. या घटनेने वीरशैव समाजात वादळ उठले. याच्या निषेधार्थ जगदेव या बसवच्या अनुयायाने राजा बिज्जळची इ.. 1167 मध्ये हत्त्या केली. असा आरोप करण्यात येऊन वीरशिव समाजातील लोकांना राजाच्या लोकांनी मोठा त्रास देण्यास सुरुवात केली. सनातन्यांच्या या अत्याचाराला कंटाळून श्रावणशुद्ध प्रतिपदेला शके 1090 मध्ये (1168) महात्मा बसवेश्वर यांनी कुडल संगमावर जलसमाधी घेतली.
बसव जयंती सोहळा

बसवेश्वर यांच्या जीवनकार्याच्या कालखंडाला सुमारे आठशे वर्षे झाली तरीही अनुयायी आणि भाविकांमध्ये या महात्म्याविषयी नितांत आदर आणि श्रद्धा दिसून येते. कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील लातूर ,नांदेड आनि उस्मानाबाद या जिल्ह्यांत वीरशैव समाज मोथ्या प्रमाणावर आहे. नोकरी,व्यवसाय आणि उद्योगधंद्यांमुळे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील वीरशैव,लिंगायत,जंगम,गोसावी गुरव आदी समाज मोठ्या प्रमाणावर असून ते महात्मा बसवेश्वराला मानतात. लिंगायत समाजाचे अनुयायी एकमेकांना प्रेमाने बसवण्णा असे म्हणतात. अण्णा म्हणजे थोरला भाऊ होय. वीरशैवांनी तयार केलेल्या बहुतेक भुर्जपत्र हस्तलिखितांची सुरुवात ही बसवलिंगय्या नम: अशी होते. म्हणजे श्री बसवलिंगाला नमस्कार असो संकटप्रसंगी किंवा दु:खात असताना भाविकांच्या मुखातून बसव-बसव असा उच्चार होतो,त्यामुळे आपल्यावरचा दुर्धर प्रसंग टळेल, असा त्यांना विश्वास वाटतो. दरवर्षी कर्नाटकात आणि दक्षिण महाराष्ट्रात बसव जयंती सोहळा उत्साहात साजरा होतो. खेड्यापाड्यातील लोक आपली घरे स्वच्छ करतात. पहाटे स्नान करून नवीन कपडे घालतात आणि मोठ्या प्रमाणावर शिवमंदिरात जाऊन पूजा करतात. देवाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवून नातेवाईकांना जेवण देतात.

No comments:

Post a Comment