Sunday, April 30, 2017

महात्मा बसवेश्‍वर (भाग सहा)


वीरशैव संप्रदाय
मध्ययुगात दक्षिण भारतातील कर्नाटकात वीरशैव हा भक्तिसंप्रदाय संत ज्ञानेश्वरांच्या पूर्व काळात उदयास आला. महाराष्ट्रातील महानुभाव, वारकरी,दत्त, समर्थ आणि नाथ या संप्रदायांप्रमाणेच हा संप्रदायदेखील गुरु संस्थेला महत्त्व देणारा आहे. बाराव्या शतकात कर्नाटकात जैन आणि अन्य धर्म संप्रदायांचा प्रभाव होता. वीरशैव संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराने अन्य धर्म पंथांचा प्रभाव कमी झाला. काही संशोधकांनी या संप्रदायाचा उदय हा बाराव्या शतकात झाल्याचे म्हटले असले तरी काही संशोधकांच्या मते, शिवाची सद्योजात ,वामदेव, अघोर,तत्पुरुष आणि ईशान ही पाच मुखे आहेत. त्यांनीच कलियुगात रेवणसिद्ध,मरुकासिद्ध,एंकिराम,पंडिताराध्य आणि विधाराध्य असे पाच अवतार घेतले. त्यांना पंचाचार्य म्हटले जाते. रंभापुरी-कोल्लिपाक किंवा बाळेहोन्नूर(कर्नाटक),उज्जैन(मध्यप्रदेश), केदार(हिमाचल प्रदेश), श्रीशैल( आंध्र प्रदेश) आणि वाराणसी( उत्तरप्रदेश) ही वीरशैवांची पाच पिठे होत. पंचपीठांच्या भारतात अनेक शाखोपशाखा पसरल्या आहेत. बसवेश्वर हे संप्रदायाचे आद्यस्थानी किंवा संप्रादाय प्रवर्तक आहेत किंवा नाही यावर एकमत नसले तरी त्यांनी संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले हे सर्वच अभ्यासक मान्य करतात. त्यांनी अनुभव मम्डप या संप्रदाय पीठाची बसवकल्याण येथे स्थापना केली. कांचीचे शंकराध्याय यांनी संस्कृतात बसवपुराण नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच प्रभुलिंगलिला आणि बसवपुराणाष्टकम या तीन ग्रंथांतून बसवेश्वरांचे चरित्र वर्णन केले आहे. प्रभुलिंगलिलेचा मराठी अनुवाद कवी ब्रम्हवासांनी लीलाविश्वंभर या नावाने केला आहे. याशिवाय अनेक ग्रंथातून त्यांच्या जीवन कार्याची माहिती मिळते. संप्रदायाचा अभ्यास डॉ. रा.चिं.ढेरे यांच्या मते बसवेश्वर हे मंगळवेढे (जि.सोलापूर) येथे इ.. 1133 ते 1153 या सुमारे वीस वर्षांच्या काळात राहिले. मंगळवेढ्याला रेवणसिद्धाचे मंदिर आहे. येथेच त्यांनी वीरशैव संप्रदायाचे संघटन केले. त्यानंतर पुढे संगमेश्वर आणि कल्याणी येथे गेले. लिंगायत हे वीरशैवाहून प्राचीन आहेत, असेही डॉ. ढेरे नमूद करतात. तरीही वीरशैव हे मन्मयस्वामी शाखा आणि लिंगायत परंपरेला आपल्या संप्रदायात समाविष्ट करून घेतात. वीरशैवात वैदिक आणि अविअदिक परंपरांशी नाते सांगणार्या अनुक्रमे पंचाचार्य आणि वीरक्त या दोन विचारधारा आहेत. महाराष्ट्रातील वीअरशैव हे पंचाकार्य तर कर्नाटकातील वीरशैव हे विरक्त परंपरेशी समन्वित झाले आहेत.

वीरशैव धर्माची शिकवण
वीरशैव धर्म याचा अर्थ साधारणपणे वीर म्हणजे शूर नायक,शिव या एकाच देवाचे अधिष्ठान मानून त्याची एकाग्र भावनेने भक्ती करावी, अशी वीरशैव धर्माची शिकवण होती. याचा अर्थ त्यांनी इतर देवांचा अनादर करावा, असे नव्हे, तर शिव सर्वश्रेष्ठ आहेतद्वतच लिंगायत किंवा लिंगवत असे नामही या पंथाचे वर्णन करण्यासाठी वापरतात. आपल्या शरीरावर जे (शिव) लिंग धारण करतात ते लिंगायत.त्यांना मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करण्याची गरज नाही. पूजेचे आणि भक्तीचे स्वरुप महात्मा बसव यांनी समजावून दिले होते. तळाशी सपाट असलेले काशीबोराच्या आकाराचे छोटे लिंग सर्व वीरशैवधर्मीय आपल्या शरीरावर धारण करतात.यालाच इष्टलिंग असेही म्हणतात.एखाद्या कपड्यात बांधून किंवा छोट्याशा डबीत ठेवून लिंग नेहमीच गळ्यात धारण करण्याची प्रथा आहे. जेणेकरून हे लिंग छातीवर (हृदयाजवळ) रुळत राहते. दिवसातून दोनवेळा तळहातावर घेऊन लिंगाची पूजा करावी.या पूजाविधीचा एक अर्थ असा की, प्रत्येक आत्मा हा पशू असून त्याचा देव पशुपती असतो. आत्मरुपी पशूला आपल्या देवरुपी मालकाचे सदोदित संरक्षण लाभते. दुसरा अर्थ असा की, मानवी आत्मा हाच मुळी देव आहे. सततच्या संथ प्रयत्नामुळे आत्म्याची उन्नती होऊन त्याला देवत्व लाभू शकते आणि आत्माच देव होतो. वीरशैव धर्मात गुरु,लिंग आणि जंगम यांचा आदर साधक व भाविकांनी करावा, असा आग्रह आहे. वीरशैव धर्माच्या तत्त्वांचा अनुग्रह करून लिंग देणारा तो गुरू. दीक्षा घेतलेल्या माणसाने आपल्या शरीरावर लिंग सतत धारण करावे, असा संकेत आहे. साधुत्व लाभलेल्या माणसाला या धर्मात जंगम म्हणतात. जंगम म्हणजे देवाचे दृश्य स्वरुप,स्थलास्थलावरून तो भ्रमण करतो. भक्ती,ज्ञान आणि वैराग्य याला वीरशैव धर्मात महत्त्वाचे स्थान होते.
साधनास्थळ : कुडलसंगम
महात्मा बसव सोळा वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. वृद्ध आजीशिवाय त्यांना कोणाचाच आधार नव्हता. याच काळात त्यांचे पारंपारिक शिक्षण पूर्ण झाले होते. आई-वडिलांचे छत्र गेल्यावर सर्व समाज त्यांच्याशी कठोर वागू लागला. त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या आल्या. तरीही समाजातील अनिष्ट चालीरितींना बसवेश्वरांनी ठाम विरोध केला. आजीच्या निधनानंतर मात्र त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. लहान भावाला नातेवाईकांकडे सोपवून ते गुरु आणि आत्मज्ञानाच्या शोधार्थ आपली बहीण अक्कगम्माबरोबर अरण्यातून निघाले. वाटेत कुडलसंगम हे मलप्रभा आणि कृष्णा नदीच्या संगमावर वसलेले छोटेसे रमणीय गाव दिसले. या गावालाच कप्पडीसंगम असेही म्हणत. याठिकाणी संगमेश्वराचे (शंकर) मंदिर होते. मंदिराचा कारभार ईशान्यगुरु बघत असे. गुरुंनी बसवची परीक्षा घेतली. मात्र त्यांची ईश्वरभक्ती आणि निष्ठा बघून मंदिराच्या कामात मदत करण्याची परवानगी दिली.बसवची बहीण मात्र गावातील ओळखीच्या कुटुंबाकडे राहू लागली. बसव या ठिकाणी पहाटे उठून पाणी भरणे,ताजी फुले-फळे आणणे, मंदिराची साफसफाई करणे अशी कामे करीत असे. ईशान्यगुरू वृद्ध झाल्यानंतर मंदिराचा कारभार बसवकडेच आला. ईश्वरभक्तीत बसव तल्लिन होऊन जात असे. भक्तीपदे गाणे,नृत्य करणे आनि ईश्वराशी लहान बालकाप्रमाणे संभाषण करण्यात बसव गुंगून जाई. मंदिराचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ त्यांच्या भक्तीने प्रभावित होत. कपिलाषष्टीला कुडलसंगमावर मोठा उत्सव भरत असे. याठिकाणी बसवचे नर्तन,गायन आणि प्रवचन ऐकण्यास हजारो भक्त येत असत. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे याठिकाणी लोक आकर्षित होऊ लागले. कुडलसंगम हे आता बसवेश्वरांचे साधनास्थळ बनले होते. कुडलसंगमाच्या संगमेश्वर चरणी सर्व आयुष्य घालवायचे, असा बसवेश्वरांचा निश्चय होता आणि ईश्वरभक्ती हेच प्रमुख उद्दिष्ट होते. यातूनच पुढे वीरशैव पंथाचा पाया रचला गेला, असे म्हटले जाते. 

No comments:

Post a Comment