Saturday, April 22, 2017

भ्रष्टाचारमुक्त पोलिस! कभ्भी नहीं।


     भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी पोलिस विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना बनवायचा आहे. तसे त्यांनी सांगलीतल्या एका कार्यक्रमात बोलून दाखवले आहे. सांगलीतल्या पोलिसांचा प्रताप ऐकल्यावर अशा प्रामाणिक पोलिस अधिकार्याच्या मनाला काय वाटले असणार,हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे.मात्र  भ्रष्टचार मुक्त पोलिस भविष्यात असतील, असा त्यांना विश्वास आहे. त्यासाठी ते स्वत: प्रयत्नशील राहणार आहेत. अर्थात एकट्या अधिकार्याला एवढ्या मोठ्या आवाक्याच्या पसार्यातल्या पोलिसांना सरळमार्गाला लावणं तसं अवघड आहे,पण अशक्य नाही. नांगरे-पाटील यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची धुरा हातात घेतल्यावर त्यांनी या भागात बरेच चांगले उपक्रम राबवले. शाळा, महाविद्यालयातल्या मुलींना भयमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष पथकांची स्थापना केली.या पथकाने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात रोडरोमिओ आणि सडकहर्यांवर कारवाई करून त्यांच्यावर वचक बसवला आहे, मात्र त्यांच्या खात्यातल्या पोलिसांवरच खुद्द महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचा वचक बसण्याची आवश्यकता आहे.


     सांगलीतल्या पोलिसांनी चोरीच्या कोट्यवधी रुपयांवरच डल्ला मारून अख्ख्या पोलिस खात्यालाच बदनाम करून टाकले आहे. अर्थात पोलिस तसे बदनामच आहेत. त्यामुळेच त्यांना लोकच मारत सुटले आहेत. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे या पोलिसांनादेखील वटणीवर आणण्याची आवश्यकता आहे. नांगरे-पाटील यांच्यासारखे अधिकारी सगळीकडे असतील तर ही गोष्ट काही अवघड नाही. मात्र पोलिस अधिकारीदेखील सगळीकडे सारखे कोठून मिळणार? पोलिस अधिकार्यांच्या बदल्या कशा होतात आणि पाहिजे ती ठाणी मिळण्यासाठी कशी फिल्डिंग लावली जाते, हेसुद्धा आपल्याला माहित आहे.त्यामुळे त्यांचा पुढचा अजेंडा काय असतो, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याला बोलवावे लागणार नाही.
     महाराष्ट्रात कुठल्याही तालुक्यात जावा,जिल्ह्यात जावा,तिथे तुम्हाला अवैध धंदे अक्षरश: बोकाळलेले दिसतील. अवैध वाहतूक घ्या, मटका,सट्टा,जुगारसारखे अवैध धंदे घ्या,इथे आपल्याला बिनबोभाट सुरू असलेले दिसतील. गावठी दारू तर कधी बंद राहिली आहे, असे तुम्हाला कधीच दिसणार नाही. आता तर महामार्गावरील अथवा त्याच्या 500 मीटर परिसरातील हॉटेल, बार, बियर शॉपी न्यायालयाच्या खरडपट्टीमुळे बंद झाल्या आहेत. मात्र ही गावठी दारू कधी बंद झाली नाही. विदेशी दारू,बियर विक्रीला बंदी असली तरी त्याची अवैध विक्री चालूच आहे. वाळूतस्करी आणि त्यातून गुंडगिरी मात्र जीवघेणी फोफावली आहे. यालाही आळा घालणं सगळ्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सरळ्यानं धंदा करायला द्या नाही तर मरणाला तयार राहा, असा दमच ही वाळूमाफियावाली मंडळी अधिकार्यांना देत आहेत. तरीही पोलिस त्यांचे काही करू शकत नाहीत.
     शासनाने तंबाकूजन्य पदार्थ,गुटखा, मावा यांच्यावर बंदी घालून बराच कालावधी लोटला आहे, मात्र हे पदार्थ कुठे मिळत नाहीत, हे  पोलिसांनी छातीठोकपणे सांगावे. आता या दारुचं तसं झालं आहे. हॉटेल,परमिट बार,बियर शॉपी आदींमधून महामार्गाच्या परिसरात सरळ सरळ  मिळणं बंद झालं आहे. पण दुसर्या मार्गाने सुरू झालं आहे. विशेष म्हणजे या दारूंचे दर दुप्पट झाले आहेत.गुटखा,मावाचेदेखील तसेच आहे. दोन रुपयांना मिळणारी गुटख्याची पुडी दहा रुपयांना मिळत आहे. याची विक्री करणारा, साठा करणारा किती कमावत असेल. मग यातला थोडा पैसा झिरपत झिरपत पोलिस ठाण्याकडे जात नसेल कशावरून? राजरोस बेकायदेशीर दारू विकणारा म्हणतो , आम्ही कुणाला घाबरत नाही. पोलिसांना आमचा हफ्ता जातो. याला काय म्हणायचं?
     खरे तर तंबाकू,गुटखा, अवैध दारू, वाळू याच्या बेकायदेशीर विक्रीला एक समांत्तर यंत्रणा सुरू झाली आहे. मटकाही चांगलाच पोसला आहे.यात गुंड-पुंड पोसले जात आहेत. त्यामुळे साहजिक शांततेचा भंग होत आहे. अशांततेमुळे सर्वसामान्य माणूस जीव मुठीत घेऊन जगत आहे. कधी काय होईल, हे कळत नाही. त्यामुळे या सगळ्या  वस्तू मुक्तपणे विकायला शासनाने परवानगी द्यायला हवी, असं कधी कधी वाटतं. कारण यामुळे  मारामार्या,गुंडगिरी,दादागिरी तरी बंद होईल. लोकांना शांतपणे जगता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांवरचा ताण कमी होईल.खरेच शासनाने याचा विचार करायला हवा, असं वाटतं.
     विश्वास नांगरे-पाटील यांना पोलिस भ्रष्टाचार मुक्त हवा आहे. त्यासाठी त्यांचा प्रयत्नही चालला आहे. मात्र पोलिसी खात्यातल्या नसानसांत भिनलेला भ्रष्टाचार तो असा तसा कमी होणार आहे का?अर्थात काही पोलीस खरेच प्रामाणिक आहेत. त्यांच्यमुळे तर ही यंत्रणा चालली आहे. काही पोलिसांनी आपापल्या बीट किंवा चौकी परिसरात आणखी एक कमाईची यंत्रणा उभी केली आहे. आपल्या भागात काही अवैध घडत नसलं तरी घडवायला लावायचं आणि त्यातून आपले खिसे भरायचे, असा धंदा सुरू ठेवला आहे. यासाठी बीटमधल्या काही युवकांना,लोकांना हाताशी धरले आहे. त्यांनी सावज हेरायचा.त्याला अवैध गोष्टी करायला लावायच्या आणि आपल्या पोलिसमामाला धाड टाकायला लावायची आणि परस्पर सगळे मॅनेज करून आपला खिसा भरायचा. दगडाखाली हात सापडलेली माणसे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून त्यांच्या जाळ्यात अलगद अडकून जातात. यात बरबटलेली पोलीस मंडळी आपल्याबरोबरच आपल्या फॅंटरचा फायदा करून देतात.  त्यामुळे ही माणसे गावागावत सावज शोधतानाच दिसतात. नांगरे-पाटील  अशी भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, ती कशी उपटून काढतील, असा प्रश्न आहे.पण काही प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाला तरी काय कमी आहे का? यावर समाधान मानून आपण भविष्यात तरी भ्रष्टाचारमुक्त पोलिस होतील, अशी  स्वप्ने बाळगायला काय हरकत आहे.


No comments:

Post a Comment