Friday, April 14, 2017

पाकिस्तानचे तुरुंग म्हणजे कब्रस्तानच

      कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.तसं पाकिस्तानचं आहे. तो आपल्या दृष्ट कारवायांपासून मागे हटणारा नाही. त्याने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानचा दावा आहे की,ते रॉ चे एजंट आहेत. ते पाकिस्तानमध्ये विध्वंसक घातपाती कारवाया आणि हेरगिरी करत असल्याच्या आरोप करण्यात आला आहे. कुलभूषण जाधव हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. इराणमधील चाबहार बंदर परिसरात ते व्यवसाय करत होते. अचानक त्यांना गेल्यावर्षी मार्चमध्ये पकडल्याचे पाकिस्तानतर्फे जाहीर करण्यात आले. पाकिस्तानने 1999 मध्ये शेख शमीम नावाच्या भारतीयाला याच आरोपाखाली फाशीवर लटकावलं होतं. खरे तर भारताने पाकिस्तानच्या किती तरी गुप्तचरांना पकडले आहे,पण त्यातल्या कोणालाही फाशीची शिक्षा सुनावलेली नाही.

     मात्र पाकिस्तानमधील तुरुंग भारतीयांसाठी कब्रस्तान ठरत आहेत. सरबरजीतसिंह,मग चमेल सिंह,त्यानंतर लाहोरच्या तुरुंगात किरणपालसिंह या भारतीयाचा 2016 मध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाला.50 वर्षांचे किरणपालसिंह 1992 मध्ये चुकून वाघा बॉर्डर पार करून पाकिस्तानात गेले होते. नंतर त्यांना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या बॉम्ब स्फोट घडविण्याच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तिथल्या तुरुंगांमध्ये किती भारतीयांना मारले गेले आहे किंवा कितीजण मृत्यूची वाट पाहात आहेत,याची आपल्या देशाला अजिबात कल्पना नाही. तिकडे भारतीय कैद्यांना किती क्रूरपणाच्या यातना दिल्या जात असतात त्या ऐकल्यावर आपल्याला भितीने थरकाप व्हायला होतं.पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेल्या लोकांनी हे कथन केले आहे.
     खरं तर आपण मित्रत्वाचा हात द्यायला सदोदित तत्पर असतो पण तिकडून नेहमीच उलटी गंगा वाहत असते. पाकिस्तानमधल्या कोट लखपत तुरुंगात मारल्या गेलेल्या चमेलसिंह या भारतीय कैद्याच्या मृतदेहातील किडनी, लिव्हरसारखे अवयव गायब करण्यात आले होते, या घटनेला काही फार दिवस झाले नाहीत. भारताने पाकिस्तानच्या 90 हजारपेक्षा अधिक युद्धकैद्यांना सिमला समझोता करारानुसार आपल्या मायभूमीत जाण्यासाठी सोडून दिलं होतं, परंतु,पाकिस्तानने भारताच्या 54 युद्धकैद्यांना अजूनही  सोडलं नाही. विशेष म्हणजे हे सगळे भारतीय सैन्यातील महत्त्वाचे अधिकारी होते. त्यात मेजर अशोक सुरी यांचाही समावेश होता. त्यांचा 1971 च्या युद्धात सहभाग होता. पाच जुलै 1988 साली मुख्तार सिंह या भारतीय युद्धकैद्याची सुटका करण्यात आली होती. ते ज्या तुरुंगात होते,त्याच तुरुंगात सरबजीत सिंह यांना मारण्यात आले होते. त्याने सांगितले होते की, मेजर अशोक सुरीदेखील लखपत तुरुंगातच होते. गेल्या दशकांपासून भारतीय सेनेतल्या त्या 54 अधिकार्यांच्या आई-वडील,पत्नी,मुले आणि त्यांच्या नातेवाईकांचे डोळे त्यांची वाट पाहून शिणून गेले आहेत. जिनेव्हा कन्वेंशनकडे कानाडोळा करत पाकिस्तानने त्या 54 सैन्य अधिकार्यांना कधीच भारताच्या हवाली केले नाही. फ्लाइट लेफिनेंट बी.बी तांबे आणि त्यांची राष्ट्रीय स्तर बॅडमिंटन चॅम्पिअन पत्नी दमयंती तांबे यांची करुण कहानी तर मन हेलावून टाकणारी आहे. दमयंती तांबे यांनी सांगितले की, पाच डिसेंबर 1971 रोजीच्या संडे पाकिस्तान या पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्रात पाच भारतीय विमान पायलटांना अटक करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमीत तांबे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, त्यांना 1978 मध्ये एका बांगलादेशच्या नौदल अधिकार्याने लायलपूर तुरुंगात तांबे नावाचा एक भारतीय कैदी असल्याचे दमयंती यांना सांगितले होते.
     आता जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यावर भारतालादेखील मोठा धक्का बसला आहे. हे वृत्त अचानक आले आहे. भारताने सर्व त्या पातळींवर त्यांच्या सुटकेचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र भारताला जाधव पाकिस्तानात नेमके कोठे आहेत,याची काहीही कल्पना नाही. भारताने जाधव यांना फाशीची शिक्षा दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. मात्र पाकिस्तानकडून परिणामाला तयार असल्याचे सांगण्यात आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. बदलत्या घटनाक्रमानुसार भारताने  जवळपास एक डझन पाकिस्तानी कैद्यांची सुटका न करण्याचा निर्णय घेतला आहे. या कैद्यांची सुटका बुधवारी ता. 12 एप्रिल रोजी करण्यात येणार होतीसरकारचे म्हणणे असे की,पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याची ही योग्य वेळ नाही. म्हणजे या दोन्ही देशांचे संबंध जाधव यांच्या प्रश्नावर आणखी ताणले गेले आहेत. यानिमित्ताने आरपार की लढाईला भारताला तयार राहावे लागणार आहे. कारण पाकिस्तान फाशीची शिक्षा मागे घ्यायला तयार नाही. यात भारताकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे सर्व भारतीयांचे डोळे लागले आहेत

No comments:

Post a Comment