स्तुती
ही सगळ्यांनाच प्यारी असते. काही ना तर ती भलतीच मोहीत करते. त्यात ते पार आंधळे होऊन जातात. त्यात ते आपले नुकसान
करून घेतात. दुसर्याला दुखवतात.
आणखी काही बरेच करतात. स्तुतीपाठक मात्र आपले काम,
आपला स्वार्थ उरकून मोकळे होतात. तरीही राजकारणांना
ही स्तुती भलतीच आवडते.त्यांना त्याच्याशिवाय गमत नाही.
त्यामुळे त्यांच्याभोवती नेहमी स्तुतीपाठकांचा गराडा पाहायला मिळतो.
एकाद्याला राजकारण्याकडून काम करून घ्यायचे असल्यास लोक पहिल्यांदा त्यालाच
पकडतात. कारण त्याच्या गोड,लाघवी बोलण्याला
राजकारणी पार विरगळून जातो. अशा या स्तुतीपाठकांची आपल्या देशात मोठी
परंपरा आहे, इतिहास आहे.
राजा,
महाराजांच्या दरबारात अनेक स्तुतिपाठक असत. त्यांना
भाट असे म्हटले जात असे. राजा, महाराजांची
वारेमाप स्तुती करायची आणि आपल्या पदरात मोठी बक्षिसी पाडून घ्यायची, असा त्यांचा नित्यनेम असे. यापैकी काही तर राजा,
महाराजांच्या पदरी चाकरीच करीत असायचे. त्यामुळे
त्यांना आपल्या अन्नदात्याची स्तुती ही करावीच लागायची. देश स्वतंत्र
झाल्यावर आपल्याकडील संस्थाने खालसा झाली. राजा, महाराजांचे वैभव हळूहळू लोप पावत गेले. मात्र,
असे जरी असले तरी स्तुतिपाठकांची संख्या काही कमी झाली नाही.
ती दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, त्यांचे स्वरूप काहीसे बदलले आहे.
आता
राजकारणी लोक राजे,महाराजे झाले आहेत. म्हणजे
त्यांच्या पदरी स्तुतीपाठकांची आयती जमा होत आहे. आपला स्वार्थ
साधण्यासाठी ही मंडळी त्यांच्या भोवती गराडा घालतात. त्यांना
समोरचे सत्य दिसू नये, अशा प्रकारची व्यवस्था उभी केली जाते.
स्तुतिपाठकांनी केलेल्या स्तुतिमुळे हे राजकारणी एवढे भारावून जातात
की, त्यांना सत्याचा विसर पडतो आणि ते स्वप्नांच्या दुनियेत वावरायला
लागतात. आपल्यासारखे आपणच असल्याचा साक्षात्कार त्यांना होतो.
ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले, जिच्या कृपेने
आपल्याला विविध पदे मिळाली ते सर्व क्षणार्धात विसरून जातात.
त्यांच्यासाठी
जनता कसपटासमान होते. आपण म्हणजे खूप कोणीतरी मोठे असल्यासारखे त्यांना
वाटू लागते. मात्र, या राजकारण्यांचे गर्वाच्या
भरात हवेत उडणारे विमान निवडणुकीच्या वेळी जनता मतपेटीद्वारे दणका देऊन एका दमात खाली
आणते. त्यावेळी त्यांना आपली खरी जागा समजते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. निवडणुकीत आलेल्या
अनुभवानंतर तरी या राजकारण्यांमध्ये काही फरक पडेल, त्यांची वर्तणूक
सुधारेल असे वाटत असते. मात्र, दुर्दैवाने
बर्याच वेळा असे घडत नाही. अनेक राजकारणी
आपल्याला आलेल्या अनुभवातून सुधारत नाहीत. त्यांच्या डोळ्यावरची
झापडे काही केल्या ते बाजूला करायला तयार नसतात. अर्थात काहीवेळा
असेही होते की, त्यांच्या आजूबाजूला असलेला एक वर्ग असाही असतो
की तो राजकारण्यांच्या डोळ्यावरची झापडे कोणाला काढूच देत नाही. कारण तसे झाले तर त्यांचे पितळ उघडे पडणार असते आणि त्यांचा स्वार्थही साधणार
नसतो. त्यामुळे ते जिवाचा आटापिटा करून आपल्या स्तुतीप्रिय नेत्यांना
खूश ठेवत असतात. या राजकारण्यांना आपल्याला कोणीतरी मूर्ख बनवत
आहे. हे सत्य जर समजले, तर या स्तुतिपाठकांची
काही धडगत नसते. त्यामुळे या स्तुतिपाठकांकडून नियोजनबद्धरित्या
सर्व कारभार केला जातो. या कानाची खबर त्या कानाला लागू दिली
जात नाही. यात ते बर्याचवेळा यशस्वी होतात.
या
स्तुतिपाठकांकडून आपल्या नेत्यांचे इतरांबद्दल कान भरले जातात.
त्यांच्याबद्दल नेत्यांच्या मनात गैरसमज निर्माण केले जातात.
नेत्यांकडूनही कोणताही सखोल विचार न करता निर्णय घेतला जातो.
आपल्याशी इतकी वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या सहकार्याच्या बाबतीत त्यांच्याकडून
दुजाभाव केला जातो. त्यांना वेळप्रसंगी महत्वाच्या पदावरुन हटविले
जाते. संबंध तोडले जातात. यातून दोघांमध्ये
मोठी दरीच निर्माण होते. वेळप्रसंगी संघर्षाचे वातावरण निर्माण
होते.
हा
सर्व त्या स्तुतिपाठकांच्या सत्संगाचा परिणाम असतो. जिवाला
जीव देणारी माणसे एका फटक्यात दुरावतात. पण त्याचे त्यावेळी या
नेत्यांना काही वाटत नाही. आपण घेतलेला निर्णय बरोबरच आहे असे
त्यांना वाटते. पण कालांतराने आपण घाईगडबडीत घेतलेला निर्णय चुकीचा
होता ही बाब त्यांच्या लक्षात येते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली
असते. अनेकवेळा हलक्या कानांच्या नेत्यांमुळे त्यांचे सहकारी
त्यांच्यापासून दुरावले जातात. त्यामुळे त्यांच्या संघटनेत,
पक्षात फूट पडते. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे
संबंधित नेत्यांबरोबरच सामान्य जनतेचेही नुकसान होत असते.
असेच
काहीसे इतर लोकांच्या बाबतीतही घडते. त्यानांही
स्तुतीद्वारे भुलविणारे समाजात खूपजण असतात. असे होत असताना काहीजणांकडून
आपला एकप्रकारे गेम केला जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. इतरांनी केलेल्या वारेमाप स्तुतीमुळे ते सुखावतात आणि इथेच नेमकी फसगत होते.
एखादे छोटेसे काम पूर्ण केल्यानंतर कोणी आपली विनाकारण स्तुती करीत असेल
तर आपण वेळीच सावध व्हायला हवे. मात्र, तसे होत नाही.आपली
जर विनाकारण कोणी स्तुती करत असेल तर ती करणार्याचा
हेतू प्रथम तपासून पहायला हवा. नाहीतर पुढील काळात पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.
साध्या
साध्या गोष्टींसाठी ही एखाद्याची स्तुती करण्याची काही व्यक्तींची सवय असते.
अनेकवेळा यातून ते आपला स्वार्थ साधून घेऊ इच्छित असतात. याचे भान आपण ठेवायला हवे आणि अशा स्तुतिपाठकांपासून दूर रहायला हवे.यातच खरे तर भले आहे.
No comments:
Post a Comment