भारतात अनेक धर्म
असून ,त्यांचे पंथ तथा संप्रदाय आहेत.
हिंदू धर्मातील नाथ,महानुभाव,वारकरी,दत्त आणि समर्थ हे पाच प्रमुख संप्रदाय मानले
जातात. याशिवाय आणखी एक प्रमुख संप्रदाय म्हणजे वीरशैव संप्रदाय
होय. या संप्रदायाची स्थापना महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात केली असे म्हटले जाते. काही
अभ्यासक त्यांना धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते मानतात.थोर समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणार्या या महापुरुषाने
रुढी-परंपरेशी बंडखोरी करत स्वतंत्र धर्म स्थापन केला,
असेही म्हटले जाते. त्यामुळे वीरशैव हा संप्रदाय
,पंथ की धर्म याबाबत मतभेद असले तरी सुमारे 800 वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य गौरवास्पद
आहे.
बालपण आणि शिक्षण
कर्नाटक राज्यातील
विजापूर जिल्ह्यात बागेवाडी या गावात शैवपंथीय ब्राम्हण मादिराज आणि माता मादलंबिका
यांच्या उदरी वैशाख शुद्ध तृतीयेला (अक्षय्य तृतीया) शके 1053 मध्ये (इ.स.1131) बसवेश्वरांचा जन्म झाला.त्यांना
भक्ती भंडारी, बसव आणि बसवन्ना अशीही नावे होती. त्यांना देवराज मुनी नावाचा भाऊ आणि अक्कन्नगम्मा ही बहीण होती. बालपणी उपनयनसंस्कार करण्यास नकार देऊन ते घराबाहेर पडले. परंतु मात्यापित्याने त्यांचे मन वळविल्याने त्यांना घरी नेऊन उपनयन न करताच
शिक्षण घेण्याचे ठरले. बसव या शब्दाचा संस्कृत अर्थ वृषभ होय.
शिवशंकराच्या नंदीचा अवतार आपल्या घरात जन्माला आला, अशी त्यांच्या मातापित्याची धारणा होती. बसवला बालपणापासूनच
धर्म आणि ईश्वर यासंबंधी जाणून घेण्याची इच्छा होती.
मंदिरात सुरू असलेल्या ईश्वर भक्तीच्या कथा ते
मन लावून ऐकत असत. पतंतु धर्मातील भेदाभेद आणि अंधश्रद्धा यांचा
त्यांना राग येई. यासंबंधी थोरामोठ्यांशी ते तर्कसंगत चर्चा करून
एकांतात विचार करीत बसत. बागेवाडी आणि आसपासच्या गावागावात मोठमोठे
शास्त्री पंडित राहात असत. या विद्वानांकडे त्यांनी वेद आणि वेदाची
सहा अंगे, तत्वज्ञान,छंदशास्त्र,
संगीत,वाड्.मय, शिवागम आदी ग्रंथ व विषयांचा अभ्यास केला. बसव हे बालपणापासूनच
कुशाग्र बुद्धीचे असल्याने पारंपारिक शास्त्राभ्यासात ते पारंगत झाले.त्यांच्या स्मरणशक्तीचा सवंगड्यांनाच नव्हे तर गुरुजनांनाही हेवा वाटत असे.
वैवाहिक जीवन
चालुक्य साम्राज्याचे
अर्थमंत्री सिद्ध दंडनाथ यांनी बसवची खजिनदार म्हणून नियुक्ती केली.सिद्ध दंडनाथ त्यांचे मामा होते.
कालांतराने बसव यांनी सिद्धदंडनाथांच्या दोन मुली गंगादेवी आणि मायादेवी
(निलोचना) यांच्यासमवेत विवाह केला. वास्तविक आपल्या पौगंडावस्थेत बसव यांनी संन्यासी म्हणून जीवन व्यतीत करण्याचे
ठरविले होते. त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय सुखी होते. तसेच त्यांना एक पुत्ररत्नही झाले. बिज्जल साम्राज्यात
त्यांना मानाचे स्थान मिळाले. बसव दंडनायक (वरिष्ठ दर्जाचा अधिकारी) म्हणून लोक त्यांना ओळखत असत.
त्यांच्याकडे भेटीला येणार्यांची ,पाहुण्यांची नेहमी वर्दळ असे. त्यांच्या दोन्ही पत्नी
आणि बहीण अक्कन्नगम्मा संर्वांचे यथोचित स्वागत करीत. महात्मा
बसवचे चरित्रकार वर्णन करतात की, सत्ता आणि संपत्ती बसवांकडे
आपणहून चालत आल्या. परंतु त्यांना त्या गोष्टी भ्रष्ट करू शकल्या
नाहीत. त्यामुळे उलट बसव अधिक नम्र झाले. त्यांना गरिबांबद्दल कणव आणि श्रीमंतांबद्दल तुच्छता वाटत होती. स्वत:च्या घराची दारे त्यांनी गरिबांसाठी सताड उघडी ठेवली
होती. स्वत:ला अभिप्रेत असलेल्या धर्मासाठी
जवळची धनदौलत आणि पैसाही खर्चून टाकला. एकदा घरात शिरलेल्या चोराला
त्यांनी पत्नीच्या कानांतील कुड्या देऊन टाकल्या. शुचित्व,नम्रता आणि भक्ती या गुणांनीयुक्त असलेला माणूस म्हणून बसवेश्वरांची चोहिकडे प्रसिद्धी झाली होती. माहेश्वर (शिवाचे भक्त), जंगम आणि अन्य
भक्तगण यांची एकच गर्दी बसवांच्या घरी होत असे. दूरच्या गावांकडून
लोक त्यांच्याकडे येत म्हणून त्यांच्या घराला महामने म्हणजे सर्वश्रेष्ठ घर असे नाव
पडले. कुठल्याही दिवशी आणि कुठल्याही वेळी लोकांचे स्वागत होई.
इष्ठ लिंगाच्या पूजेसाठी तेथे सर्व सोयी होत्या. बसवाच्या भक्तीने आणि प्रामाणिकपणाने सर्व लोकांना आनंद होई.
No comments:
Post a Comment