तमाशा हा महाराष्ट्रातला पारंपारिक
मनोरंजनाचा प्रकार. पूर्वी ग्रामीण भागातल्या लोकांना फारशी मनोरंजनाची
साधने नव्हती. त्यामुळे गावच्या यात्रांमध्ये येणारा तमाशा त्यांच्यासाठी
फारच जवळचा वाटायचा. पहाटेपर्यंत चालणारा तमाशा लोकांचे चांगलेच
मनोरंजन करायचा.त्यामुळे तमाशा हा चांगलाच प्रसिद्ध पावला होता.
आजच्या डिजिटल,मोबाईल युगात मात्र हाच तमाशा शेवटच्या
घटका मोजत आहे. आजच्या तरुणाईची रुची बदलली आहे. तमाशा तरुणांसह ज्येष्ठ मंडळींची गर्दी होत असली तरी तरुणाईंना आजच्या सिनेमातील
गाण्यांवर डान्स हवा असतो. त्यासाठीच त्यांचा मोठा आग्रह असतो.
त्यांना गण-गवळण आणि वगमध्ये अजिबात रस नाही.
त्यामुळे पहाटेपर्यंत चालणारा तमाशा आटोपता घ्यावा लागत आहे.
मात्र या तरुणाईच्या अट्टाहासापायी ज्येष्ठ लोकांची कुचंबना होत आहे.
त्यांना संपूर्ण तमाशा आणि पारंपारिक साज हवा असतो,पण या तरुणाईमुळे त्यांना तो पाहता येईनासा झाला आहे.
आज ना उद्या तमाशाला सुगीचे दिवस
येतील म्हणून कलाकार मंडळी तमाशा ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
येणार्या काळात या तमाशासमोर अनेक आव्हाने उभी
राहत आहेत. तमाशा तसा सावकारीच्या पाशात अडकलेला आहे.
त्यात हल्ली लोक तमाशाकडे पाठ फिरवू लागले आहेत. तमाशातून जन्माला आलेली लावणी दिमाखात सिनेमात, स्टेजवर
मिरवत असली तरी तमाशा मात्र अखेरचा श्वास घेत आहे. लावणीने उच्चभ्रू लोकांमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र
इथला कलाकार मात्र तिथे पोहचला नाही. उच्चभ्रू लोकांनीच तिला
हायजॅक केली आहे. त्यामुळे तमाशा कलावत आहे तिथेच आहेत.
तमाशा आणि त्याचा गोतावळा चालवणे आजच्या महागाईच्या काळात चालवणे अवघड
झाले आहे,तरीही तमाशा कलावंत प्रेमापोटी तमाशा रेटत नेत आहेत.
तसं पाहायला गेलं तर तमाशा ही
लोककला तळागाळातील जनतेच्या मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचे साधन आहे. कलावंत कसे तरी करून ही लोककला जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
त्यामुळे त्यांना जनतेची,सरकारची साथ हवी आहे.
जुन्या ढोलकी,हलगी,तुणतुण्याचा
तमाशा सध्याचा पिढीला पसंत पडत नाही. त्यामुळे साहजिक जुना तमाशा
पाहण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ लोकांचे मनोरंजन करता येत नाही, अशी तमाशा कलाकार खंत व्यक्त करताना दिसतात. तमाशा कलावंत
दुहेरी कात्रीत सापडले आहेत. तमाशा वाचवताना त्यांना मोठीच कसरत
करावी लागत आहे. आज
समोर असलेला तरुण प्रेक्षक वर्ग त्यांना हवे ते फर्माईश करताना
दिसतो, शिवाय त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत.
आजचा तरुण वर्ग फक्त नव्या चालीच्या हिंदी-मराठी
गाण्यांना दाद देतो. या लोकांकडून कुठली फर्माईश येईल सांगता
येत नाही. त्यामुळे आजच्या सगळ्याच गाण्यांची तयारी करून स्टेजवर
जावे लागत आहे. आजचा प्रेक्षक दाद देण्यातही काही मर्यादा सोडत
आहे.पूर्वी टाळ्या-शिट्ट्यांनी दाद मिळत
होती, मात्र आज प्रेक्षक रंगमंचासमोरील संरक्षक खिडक्या तोडून
टाकण्यापर्यंत दाद देत आहे.कधी कधी कलावंतांना खडे मारण्याचे
प्रकारदेखील घडतात. अशा प्रकारामुळे तमाशा कला पाहायला येणारा
महिला वर्ग जवळजवळ बंद झाला आहे. प्रेक्षकांनी खरे तर कलेचा आस्वाद
घ्यायला हवा. त्यांनी कलेला संयमाने दाद द्यायला हवी आहे.
विविध वाहिन्यांवरून सुरू असणार्या मालिकांमुळे वगनाट्यापर्यंत प्रेक्षक तमाशागृहात थांबत नाहीत. वास्तविक या वग नाट्यातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही केले जाते. या जुन्या कला समाजाला प्रबोधन देतात.त्यामुळे तमाशासारख्या
कला जिवंत राहण्याची गरज आहे. खरे तर लोकांनीच तमाशाला हात देण्याची
गरज आहे. अन्य कलांमध्ये नवा लूक देत बदल केला जात आहे.लोक त्याला दाद देत आहेत. त्यामुळे तमाशातदेखील नव्या
तंत्रज्ञानासह बदल अपेक्षित आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांनी
तमाशाच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी व ही कला
जिवंत राहण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. यातल्या कलाकारांनाही
संरक्षण आवश्यक आहे. कलाकरच या कलेकडे येत नसतील तर ही कला कशी
जिवंत राहणार आहे?
No comments:
Post a Comment