Thursday, April 27, 2017

महात्मा बसवेश्वर (भाग दोन)

वाड्.मयाची निर्मिती
कन्नड भाषेतील उत्कृष्ट लेखक आणि कवी म्हणून महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख होतो. त्यामुळे सामाजिक आनि धार्मिक सुधारक म्हणूनच नव्हे तर एक साहित्यिक म्हणूनही लोक बसव यांचे स्मरण करतात. काही वाड्.मय अभ्यासकांच्या मते वचनांची परंपरा बसवांपासून सुरू होते. परंतु त्या आधीही काही संतांनी आणि सुधारकांनी वचने लिहिली होती. परंतु बसव हे सर्वश्रेष्ठ वचनकार होते., असे सर्वच अभ्यासक मानतात. वचन या शब्दाचा शब्दश: अर्थ गद्य असा होतो. वचन पद्यात नसले तरी वेगळ्या लांबीच्या ओळीत वचनांची मांडणी शक्य असते. एक वचन साधारणपणे तीन ओळींपासून तीस किंवा पस्तीस ओळींपर्यंत असे. प्रत्येक वचन हे अंकित म्हणजे लेखकांच्या स्वत:च्या नावाने संपे. जसे संत नामदेवांच्या अभंगात नामा म्हणे आणि संत तुकारामांच्या अभंगात तुका म्हणे असे असा उल्लेख असतो. बसवाच्या अंकित त्याच्या आराध्य ईश्वराचे होते ते म्हणजे कुडल संगमेश्वर होय. जसे संत एकनाथांनी आपल्या भारुडात आपले (गुरु संत जनार्दनाचा) एका जनार्दनी असा उल्लेख केलेला आढळतो. बसवाने रचलेल्या वचनांची संख्या सुमारे 1400 पेक्षा जास्त असून त्यात उपदेश,समाज परीक्षण आणि आत्मपरीक्षण केलेले आढळते.

महाराष्ट्रातील वीरशैव
महाराष्ट्रातील वीरशैव हे शिवाची अनन्य भक्ती हेच मोक्षाचे साधन मानतात. शिवपरमात्मा आणि जीवात्मा या सामरस्य अद्वैत हे त्यांचे अंतिम श्रेयस आहे. लिंगाचे तीन भाग मानतात. योगांग,त्यागांग आणि भोगांग. योगांगाने जीवाचा शिवाशी संयोग होतो. भोगांगामुळे जीवाला शिवाशी सायुज्यता प्राप्त होते. तर त्यागांगामुळे जीवाची जगाची अनित्यता पटते. या संप्रदायाच्या आचार धर्मानुसार सदगुरुने दिशापूर्वक दिलेले इष्टलिंग सोने,चांदी किंवा लाकूड आदींच्या लहान पेटीत घालून गळ्यात धारण करतात. तसेच सर्वांगावर भस्म लेपन करून ओम नम: शिवाय हा गुरुमंत्र म्हणणे. तसेच अष्टावरण आणि पंचाचारांचे पालन करणे हे महत्त्वाचे आचार मानले जातात. लिंग,जंगम,विभूती,रुद्राक्ष,मंत्र,पदोदक आणि प्रसाद ही अष्टावरणे होत. यामुळे साधक शुचिर्भुत होतो. तर शिवाचार ,लिंगाचार,सदाचार,मृत्याचार आणि गणाचार या पंचाचार हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे नियम आहेत. महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वीची प्राचीन वीरशैव मठ आहेत. वीरभ्रद,रेवणसिद्ध,सिद्धरामेश्वर आदी वीरशैव धर्मप्रचारकांची मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील विसोबा खेचर ,मन्मयस्वामी आणि शांतलिंगस्वामी हे वीरशैव परंपरेतील साधुसंत मानले जातात.
समतेचे पाईक
वीरशैव पंथाच्या प्रथा-परंपरा या अन्य समाजाच्या प्रथा-परंपरांपेक्षा वेगळ्या होत्या. अन्य धर्म-पंथातील चालीरीती प्रथा-परंपरांवर बसवेश्वरांनी कठोर टीका केली. त्यांनी घोषित केले की, वर्ग,समूह,पंथ किंवा धंदा यांचा वीरशैव धर्म स्वीकारण्यासाठी अडसर राहणार नाही. एकदा वीरशैव धर्म स्वीकारल्यानंतर त्याला समानतेची वागणूक दिली जाईल. वीरशैव धर्मात व्यक्तीकडून दोन गोष्टींची अपेक्षा असे: 1) आपल्या पूर्वीच्या धर्माचे सर्व संबंध तोडून नवीन धर्माचा अनुग्रह झाल्यावर शरीरावर शिवलिंग प्रतिमा धारण करणे 2) वीरशैव समाजाचा अनुग्रह घेतल्यावर साधकाची शिवावर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. वीरशैवाकडून अपेक्षित असलेले धार्मिक विधीही अत्यंत साधे होते. वीरशैव साधकाने पाळावयाचे नियम असे: 1) आपल्या कपाळावर आडवे भस्म लावावे. 2) दारु आणि मांस भक्षण बंद करावे. संपूर्ण शाकाहारी व्हावे.3) नेहमी सत्य बोलावे.चौर्यकर्म करू नये. हत्या करू नये. लोभीपणा टाळावा, आळस झाडावा.4) प्रत्येकाने काही तरी धंदा-व्यवसाय करून,कष्ट करून आपली उपजीविका करावी. 5) मंदिरात किंवा दुसर्या कुठल्याही पवित्र स्थळी जाणे टाळावे.6) आपला देह मंदिर असून , शिवभक्त वस्ती करतात तेच पवित्र स्थान असते. 7) वेळेअभावी किंवा साधनांच्या अभावी पूजा करता आली नाही तर त्याची चिंता करू नये. कारण साधकाची ईश्वरावरील नितांत श्रद्धा यालाच खरे महत्त्व आहे. तत्कालीन समाजातील गरीब,पददलित, धार्निकदृष्ट्या मागासलेया आणि सामाजिक व धार्मिकदृष्ट्या उच्च समाजाने नाकारलेल्या बहुजन समाजाला या पंथातील सर्वच गोष्टी पटणे स्वाभाविक होते. त्यांच्या उद्धारासाठी बसवेश्वर जणू अवतार होता, असे त्यांना वाटले. हजारो लोक बसवेश्वरांना शरण गेले आणि त्यांनी या पंथाचा स्वीकार केला. काही सनातनी लोक याला हिंदू धर्मातील एक नवी शाखा किंवा पंथ म्हणू लागले.तर सुधारक विचाराच्या लोकांना वीरशैव हा स्वतंत्र धर्म असल्याचे विचार मांडले. तत्कालिन समाजातील शेतकरी,विणकर,चांभार,कोळी, पारधी,बुरुड,न्हावी,व्यापारी आणि ब्राम्हण या सर्वच समाजघटक ,जाती-जमाती आणि व्यावसायिक यांनी नव्या पंथाचा स्वीकार केला.  

No comments:

Post a Comment