Sunday, September 2, 2018

सर्विलान्स टेक्नॉलॉजीने स्वच्छंदी जगण्यावर नियंत्रण


     आज अनेक कारणांमुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शाळांवर यासाठी सक्तीच करण्यात आली आहे. मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड प्रकरणांमुळे तर त्याची अनिवार्यता स्पष्ट होऊ लागली आहे.पण यामुळे आणखी एक धोका आपल्यासमोर स्पष्टपणे येऊ लागला आहे. सर्विलान्स टेक्नॉलॉजीमुळे शाळा प्रमुख,पालक यांची जबाबदारी कमी झाली असली तरी आपण या पिढीच्या स्वच्छंदी आणि मोकळ्या जगण्यावर घाला आहोत,हेही लक्षात घेतले पाहिजे. आजची पिढी आता वेगळ्याच वातावरणात आणि कुणाच्या तरी देखरेखीखाली, दडपणाखाली वावरताना दिसत आहे. यामुळे त्यांना मनासारखे जगण्याला मुरड घालावी लागत आहे. यामुळे मुले विशेषत: मुली आपला आत्मविश्वास गमावण्याची शक्यता अधिक आहे. घरात देखरेख, शाळा-कॉलेजातही नजरकैदेत राहिल्याने त्यांच्यावर पारदर्शकतेच्या नावाखाली आपण तंत्रज्ञानाकडून नियंत्रण ठेवत आहोत.

     अशा प्रकारचे नियंत्रण परदेशात ठीक आहे अथवा ज्यांचे आई-वडील नोकरी करणारे असतील,त्यांच्या पाल्यांसाठी योग्य आहे, ज्यांना वेळोवेळी त्यांच्या मुलांच्या शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. पण बाकीच्यांचे काय? असे पालक आता त्यांच्या मुलांना असेही विचारू शकत नाहीत की, त्यांनी शाळेत काय काय केले? कारण आता त्यांना थेट आपल्या डिवाईसवर कुठे असेल, तिथे पाहायला मिळत आहे. आजच्या टेक्नॉलॉजीमुळे आता हे सर्व शक्य झाले आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्याकडच्या लहान शहरांमध्येही येऊ घातले आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे बर्याच गोष्टी समजून घ्यायला सोप्या झाल्या आहेत. पूर्वी घरापासून आणि आपल्या माणसांपासून दूर राहण्यासाठी शाळा हे एकच माध्यम होते. त्यामुळे याठिकाणी स्वच्छंदपणे खास करून मुलींना वावरता येत होते. इथे वागण्याला एक प्रकारचे स्वातंत्र्य होते. हे स्वातंत्र्य आत्मविश्वास आणि नवीन काही तरी करण्याची ऊर्मी देत होते. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या देखरेखीच्या काळात मुले आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकत नाहीत. आता ही मंडळी मनसारखे जगण्यासाठी एकांत शोधू लागले आहेत.
     आपण क्षणाक्षणाला त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. पारदर्शीपणा,सुरक्षा याच्या नावावर आपण अगदी क्लासरूमपर्यंत परवानगीशिवाय  त्यांच्यावर नजर ठेवून आहोत. यामुळे मुलांच्या जगण्याला आपण कुंठीत करत आहोत. त्यांच्या स्वच्छंदी जगण्यावर घाला घालत आहोत. याचे दुष्परिणाम आपल्यालाच महागात पडणार आहेत. ब्रिटीश फिलॉसोफर जेरेमी बेंथम यांनी 1791 मध्येच सर्विलान्स टेक्नॉलॉजीमुळे मुलांच्यावर केली जाणारी देखरेख त्यांच्या स्वातंत्र्यावरच घाला असल्याचे म्हटले होते. आता ते सत्यात उतरत आहे. यामुळे मुले फारच सावधपणे आणि सांभाळून वागत आहेत. मुलांवर याचे मोठे दडपण येत आहे. त्यांच्या इच्छा- आकांक्षा दबल्या जात आहेत. काही नवे करण्याची ऊर्मी असूनही घरातले काही म्हणतील काय, या भितीने ते त्यापासून दूर राहत आहेत. खरे तर पालकांना मुलांच्या खासगीपणाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment