सांगली जिल्हा स्त्रीभृणहत्याप्रकरणी
पुरता बदनाम झाला आहे. गेल्याच वर्षी म्हैसाळमधील
डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेचा स्त्री भृणहत्येचा कत्तलखानाच समोर
आला होता. आता सांगलीतल्या भूलतज्ज्ञ असलेल्या विजयकुमार चौगुले
आणि त्याची पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ रुपाली यांचा कारनामा उजेडात आला आहे. दोघेही शासकीय नोकर असतानाही पैशांच्या लालसेपायी स्त्री भृणहत्येचे दुकानच
थाटले होते. या लोकांनी अन्य डॉक्टरांच्या मदतीने स्त्री भृणहत्या
घडवून आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हे दोघेही अटकेत असले तरी
आणि यावर अधिक तपास सुरू असला तरी याची चर्चा आणखी काही दिवसच सुरू राहणार आहे.
कारण गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या स्त्री भृणहत्या प्रकरणाचा अद्याप
निकाल लागलेला नाही. सध्या डॉ. खिद्रापुरे
हा जामिनावर बाहेर आहे. त्यावेळी स्त्रीभृण हत्येचा अक्षरक्ष:
कत्तलखाना उजेडात आला होता.त्याची चर्चाही तुफान
झाली होती. सांगली खूप चांगली अशा वल्गना करणार्यांच्या थोबाडीत या कृत्यांना बसली होती. आता पुन्हा
तेच घडून आले आहे. सांगलीचा शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातला
दबदबा यामुळे खाली गेला आहे. सांगलीची पुरती नाचक्की झाली आहे.
स्त्री भृणहत्येचा जिल्हा म्हणून आता या जिल्ह्याची नवी ओळख निर्माण
झाली आहे.
डॉ. खिद्रापुरेच्या हॉस्पिटलभोवती स्त्री भृणहत्येचा कत्तलखानाच उजेडात आला होता.
त्यावेळेला या म्हैसाळच्या प्रकरणात राज्य महिला आयोग, आरोग्य, कृषी,गृहराज्यमंत्री असा
मोठा ताफा सांगलीत अवतरला होता. अनेक संघटनांनी खटला शीघ्रगती
न्यायालयासमोर चालवावा, अशी मागणी होती. मोर्चे निघाले होते. पण नंतर काही दिवसांत सगळेच थंड
पडले. तशीच तर्हा या प्रकराणाची होणार,
असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती
थांबणार कशा असा प्रश्न आहे.
सरकारी यंत्रणांचा ढिसाळपणा यामुळे समोर
आला आहे. अशी प्रकरणे कुठल्या तरी कारणांमुळे उजेडात येतात.पण सगळे आलबेल चालत आल्यावर मात्र सगळे सुरळित राहते. अशा किती तरी प्रवृत्ती जिल्ह्यात अजूनही सुरू आहेत. अशा डॉक्टरांच्या पाठीशी राजकीय शक्ती, पोलिस,
आरोग्य विभाग अशा मोठ्या यंत्रणा उभ्या असतात. अशी माणुसकीला काळिमा फासणारे लोक चक्क काही राजकीय पक्षांची पदे स्वीकारून
आपल्या कृष्णकृत्याला संरक्षणकवच मिळवतात. त्यामुळे सभ्य लोकांचा
जमाना राहिला नाही, हेच यावरून दिसून येते. सिझरिंग ही बाब तर नित्याचीच झाली आहे. नॉर्मल डिलिव्हरी
दहात दोन-तीनच होत आहे. खरे तर याची चौकशी
करणारी यंत्रणा असायला हवी. पण असे काही घडू दिले जाणार नाही.
त्यामुळे सामान्य लोकांना आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वंशाचा दिवा
हवा, ही जी मानसिकता आहे, ती खरे तर
थांबायला हवी. याला कायद्याचा धाक कमी पडत आहे. स्त्री भृणहत्येविषयी किती तरी कायदे झाले असले तरी ही प्रवृत्ती थांबायलाच
तयार नाही. याचा अर्थच असा आहे की, कायद्याची
अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्याची अंलबजावणी करणारेच त्यात
गुंतले तर अशा कृत्यांना आळा तरी कसा बसणार? इथे सगळेच चोर आहेत.
कुणाला कशाचीच चाड राहिलेली नाही. जो तो पैशाच्या
मागे लागला आहे. समाधान ही वृत्ती कमी होऊन त्या ठिकाणी हावरेपणा
आला आहे. या हावरेपणामुळे लोक कमी वयातच श्रीमंत होण्याची स्वप्ने
पाहू लागली आहेत. झटपट श्रीमंतीचे खूळ शेवटी नाशालाच कारणीभूत
होणार आहे. पण तरीही पैशांची हाव काही कमी होत नाही, याचा अर्थच असा आहे की, कायद्याची अंमलबजावणी यंत्रणा
विकत घेता येते, ही मग्रुरी वाढत चालली आहे.
माणुसकीला काळिमा फासणार्या अशा घटना जोपर्यंत सर्वांमध्ये निकोप मानसिकता तयार
होत नाही तोपर्यंत अशा या घटना घडत राहणार आहेत. आता याही प्रकरणाची
काही दिवस चर्चा सुरू राहिल. या डॉ. दाम्पत्यांना
अटक झाली आहे आणि त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. खरे तर एवढ्यावर कारवाई मर्यादित राहता कामा नये. या
लोकांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी आहे. त्यामुळे तरी
मागच्याला ठेच बसून तो शहाणा होईल. नाही तर मग या कायद्याला काहीच
अर्थ उरणार नाही. अशा प्रवृत्ती वाढत जाणार, हे समाजिक शांततेसाठी घातक आहे.
No comments:
Post a Comment