Friday, September 28, 2018

पाश्‍चात्य संस्कृतीच्या शिरकावाला वाव


     विवाहित पुरुषाच्या पत्नीसोबत केलेला व्यभिचार गुन्हा ठरविणारे 497 वे कलम सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य आणि अवैध ठरविणारा ऐतिहासिक निकाल गुरुवारी (ता.27 सप्टेंबर 2018) दिला. त्यामुळे आता हा गुन्हा राहिलेला नाही. पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला हा निकाल धक्कादायकच म्हणायला हवा. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. साहजिकच हा निकाल भारतीय संस्कृतीला धक्का देणारा आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याला खतपाणी घालणारा आहे.या निकालामुळे अनेकांना उखाळ्या फुटल्या असतील. अनेकांना आता उघड्या डोळ्यांनी फक्त पाहण्याशिवाय काही करता येणार नाही. समाजमनावर याचा गंभीर परिणाम होऊन भारतीय संस्कृतीला फक्त तडेच जाणार आहेत. एकवचनी, एकपत्नी हे शब्द आपल्या समाजात सापडणार नाहीत, त्यासाठी पुस्तकातच शोधावे लागतील.खरे तर आज युवतींवर आणि चिमुरड्यांवर होणार्या अत्याचाराने देश ढव़ळून निघाला आहे. त्यात अशा धक्कादायक निकालाने आणखी काय काय पाहावे लागणार आहे, हे सांगता येणार नाही. ब्लॅकमेलिंग या प्रकाराला ऊत येण्याचा गंभीर धोका आहे.

     वास्तविक भारतीय दंड संहितेच्या कलम 497 मधील काही तरतुदी अथवा त्यातल्या नियमांमुळे पती हा पत्नीचा मालक असल्याचे स्पष्ट होते. भारतीय घटनेप्रमाणे पुरुष आणि स्त्री या दोघांनाही समान वागणूक आहे. समान मान आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पती हा पत्नीचा मालक असू शकणार नाही. मालक हा शब्द तिथे असू नये, हे जरी खरे असले तरी यामुळे आजही कुटुंबातला कर्ताधर्ता म्हणून पुरुषाकडेच पाहिले जाते. म्हणजे रुढ अर्थाने तो त्या कुटुंबाचा मालकच असतो. मात्र या निर्णयामुळे पुढे कदाचित गृहकलह वाढू शकतो. अर्थात याचे लगेच परिणाम दिसणार नसले तरी व्यभिचाराला सोकावलेल्यांना मात्र रान मोकळे झाले असेच म्हणावे लागेल. ना धरता येत नाही, ना सोडता येत नाही, अशी काही लोकांची अवस्था होऊ शकते.
     आज आपल्या देशात सर्वात जास्त खून, मारामार्या अशाप्रकारचे जे गुन्हे होत आहेत, त्याच्या पाठीशी अनैतिक संबंध आहे. या अनैतिक संबंधामुळे आत्महत्या किंवा घटस्फोट तर होतच आहेत,पण कायद्या हातात घेण्याचे कृत्य या अनैतिक संबंधांमधून होत आहेत. त्यानंतर क्रम लागतो,तो भाऊबंदकी आणि शेतजमिनीतील वाद. अशा घटनांमुळे अनेक संसार देशोधडीला लागत आहेत. लहानगी पोरं अनाथ होत आहे. कदाचित यापुढे अशा घटना अधिक वाढतील तर काहींना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहात बसावे लागेल.
     आपल्या देशाची एक स्वतंत्र आणि आदर्श अशी संस्कृती आहे. स्त्री-पुरुषांना विवाहाच्या माध्यमातून सर्वासमक्ष एकत्र आणले जाते. वटसावित्रीसारखे सण आपल्याकडे साजरे होतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी इश्वराकडे मागणी करणार्या पतीव्रता महिला आहेत. एकवचनी,एकपत्नी रामासारखे पती आहेत. आपल्या संस्कृतीत विवाहसंबंधाना अर्थातच व्यभिचाराला स्थान नाही. यातूनच कदाचित भारतीय कायदा करताना विवाह आणि विवाहबाह्य संबंधांबाबत काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. 497 कलमाखाली विवाहबाह्य संबंधांना व्यभिचार ठरवले आहे. विवाहित पुरुषाला दुसर्या व्यक्तीच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवल्यास तो व्यभिचाराचा गुन्हा ठरत होता आणि पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकत होती. पण सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंडसंहितेचे कलम 497 अवैध ठरवले आहे. यामुळे व्यभिचार हा गुन्हा ठरणार नाही. आणखी एक म्हणजे पुरुष किंवा स्त्री दोघांनाच एकमेकाविरुद्ध तक्रार करता येणार आहे. शिवाय दोघांनाही या कारणावरून घटस्फोट घेता येऊ शकतो. अर्थात ही शेवटची आणखी टोकाची भूमिका असणार आहे. महिला या कुणाच्या गुलाम असू शकत नाहीत, असा या निकालाचा अर्थ असला तरी आपल्याकडे या निकालाचा दुसराच अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे. काहींना या निर्णयामुळे विवाहबाह्य संबंधासाठी परवानाच मिळाला आहे, असे वाटणे साहजिकच आहे. आणि त्याचाच अधिक प्रसार होण्यास मदत होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून वाटते.
     आपल्या देशात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा फार कमी आहे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. संस्कृती ही समाजव्यवस्था योग्यपद्धतीने चालावी, यासाठी हातभार लावत असते. पण पाश्चात्य संस्कृतीचा होत असलेला शिरकाव, तसे खुले वातावरण याचे आपल्या लोकांना आकर्षण आहे.त्यामुळे अशा गोष्टी चटकन उचलण्याची किंवा स्वीकारण्याची तयारी आजचे शिक्षण, टीव्ही मालिका, मोकाट इंटरनेट यांच्या संपर्कामुळे आजच्या तरुणांनी केलेली आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीला धक्के मात्र बसणार आहेत.
     या निर्णयाचे पडसाद लगेचच माध्यमातून उमटायला सुरुवात झाली आहे. एमआयएम या पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या निकालाचा संदर्भ देत तीन वेळा तलाक हादेखील गुन्हा ठरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित आणखीही काही संघटना आपापल्या मागण्या घेऊन पुढे येतील. पण या निर्णयामुळे पाश्चात्य संस्कृतीला आपल्या देशात शिरकाव करण्यास वाव मिळाला आहे. कारण विवाहबाह्य संबंध चीन,जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये व्यभिचार हा गुन्हा नाही. आता तो भारतातही गुन्हा ठरणार नाही. मात्र आपल्याकडे स्त्रिया अजूनही फार शिकलेल्या नाहीत. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचे विवाह होत आहेत. आपल्या देशात 40 टक्क्यांपेक्षा अधिक अजूनही बालविवाह होत आहेत. अशा स्त्रियांना आत्मभान कसे येणार आहे, असा प्रश्न आहे. लैंगिक स्वायत्तेचे तत्त्व त्यांना काय कळणार आहे. अर्धवट ज्ञानाचा भलताच अर्थ काढून भलतेच लोक भलतेच काही तरी करून समाजमन गढूळ करतील, याची भीती अधिक आहे.

No comments:

Post a Comment