महान मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड एडलर यांनी
लोकांमध्ये असलेल्या विशेष शक्ती स्त्रोतांच्या अध्ययनासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी माणसांमधला चमत्कारिक विशेष गुण शोधून काढला,तो म्हणजे- नुकसानीचे नफ्यात रुपांतर करणे. हाच भाव ज्युलिअस रोसेन वॉल्ड यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडला.-
ज्यावेळेला तुमच्या वाट्याला लिंबू येतो, त्यावेळेला
त्याचे सरबत करून प्या. आहे की,नाही चमत्कारिक
विशेष गुण! काही माणसांमध्ये असा गुण ठासून भरलेला असतो.साहजिकच त्यामुळे अशी माणसं आयुष्यात पराभूत कधी होत नाहीत.ती एका वेगळ्या उंचीला जाऊन पोहचतात.
ज्या माणसांना आपण समस्यांनी घेरलेलो
आहे,याची कल्पना येते, तेव्हा अशी माणसं
सपशेल शरणागती पत्करतात. हत्यार टाकलेली अशी माणसं मग म्हणतात,
माझं दुर्दैव! आणखी काय असणार? मला संधीच मिळाली नाही, असे म्हणतो. त्याचे झालेले नुकसान त्याच्या जिव्हारी लागते. तो खचून
जातो. तो आत्म-ग्लानीमध्ये हरवून जातो.
मात्र एकादा बुद्धिमान, समजूतदार माणूस यावर वेगळा
विचार करायला लागतो. आपले हे जे नुकसान झाले आहे, ते कसे भरून काढायचे? त्याचे रुपांतर फायद्यात कसे करायचे?
याच्या विचारातूनच फायद्याचे गणित जुळते. फ्लोरिडामध्ये
एका शेतकर्याने जमीन खरेदी केली. नंतर
त्याला कळलं की, या शेतात काटेरी झुडपांखेरीज काहीच उगवत नाही.
सगळीकडे बिळं आहेत. या शेतात फळझाडं तर राहू द्याच,
अगदी डुकरांचा सांभाळसुद्धा करता येणं शक्य नाही. या शेतातल्या काटेरी झुडपांमध्ये फक्त साप राहतात. साप
ही एक मोठी समस्या होती. मग त्याने या समस्यांना,अडचणींनाच उपयोगी गोष्टींमध्ये बदलण्याचा विचार केला.
शेतकर्याने या सापांना पकडून काचेच्या पेट्यांमध्ये ठेवून दिले.
वेगवेगळ्या प्रकारचे, जातीचे साप त्याने वेगवेगळ्या
पेट्यांमध्ये ठेवून दिले. लोक विविध प्रकारचे साप पाहायला येऊ
लागले. काही लोक सापांवर अभ्यास करायला येऊ लागले. त्याचे शेत म्हणजे एक पर्यटन स्थळ बनले. जवळपास वर्षाला
20 हजारावर त्यांची संख्या झाली. आता त्या सापांचे
विष काढून प्रयोगशाळांमध्ये पाठवले जाऊ लागले. साप चावलेल्या
रुग्णांवर त्याचा उपयोग केला जाऊ लागला. या विषाचाच औषध म्हणून
वापर होऊ लागला. सापाची कातडी पाहिजे त्या किंमतीला विकली जाऊ
लागली. स्त्रियांचे पर्स, चपला आदींसाठी
त्यांचा उपयोग होऊ लागला. पेटीबंद सापाचे मांस जगभरातल्या ग्राहकांसाठी
पाठवले जाऊ लागले. पुढे त्या गावाचे नामकरण रॅटल स्नेक फ्लोरिडा
असे झाले. हा त्या व्यक्तीचा सन्मान होता, जो परिस्थितीपुढे नतमस्तक झाला नाही. झुकला नाही.
त्याने नुकसानीचे फायद्यात रुपांतर केले. नुकसानीने
खचून न जाता वेगळा विचार करणारा माणूस नक्कीच परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे पुढे
जातो.
No comments:
Post a Comment