एक म्हातारी होती. ती बाजारात सूप विकायची. तिच्या
चिकन सूपसारखी चव अन्य कुणाच्या सूपला नव्हती. लोक तिचे सूप विकत
घ्यायचे,पण त्यांना तिचे नाव-गाव काही माहिती
नव्हते. त्यांना फक्त स्वादिष्ट चिकन सूपशी मतलब होता.
रोज सकाळी म्हातारी तिच्या डोक्यावर
एक मोठे काळे भांडे घेऊन बाजारात यायची,एका
झाडाखाली बसायची आणि सूप विकायची. लवकरच तिचे सूप विकले जायचे,मग ती घरी निघून जायची.
त्याच बाजारात कलारी नावाचा एक लहान
मुलगा राहायचा. त्यालादेखील म्हातारीचे सूप फार
आवडायचे. त्याला म्हातारी कोठून येते, हे
जाणून घेण्याची उत्सुकता होती. एके दिवशी म्हातारी आपले रिकामे
भांडे घेऊन माघारी निघाली, तेव्हा तोही तिच्या मागे मागे जाऊ
लागला.म्हातारी एका उंच अशा पहाडावर चढली. कलारीदेखील तिच्या मागून पहाडावर चढला. चालता चालता संध्याकाळ
झाली.कलारीला आता भितीही वाटू लागली,पण
तरीही तो म्हातारीच्या मागे मागे चालत राहिला.
म्हातारी एका झोपडीत शिरली. तिथे एक खूप मोठे भांडे ठेवलेले होते.ते रिकामे होते. म्हातारी त्या भांड्याजवळ गेली आणि गाणं
गायल्यासारखं म्हणू लागली,“ ए! जादूगर पातेल्या,
माझ्यासाठी गरमागरम सूप बनव, चिकनचे सूप बनव,
मी ते विकीन, लोक ते विकत घेतील...”
काय आश्चर्य! लगेच सूप तयार झाले.
भांड्यातून वाफ निघू लागली. सूपाचा वासदेखील काय
मस्त येत होता. त्या वासाने कलारीच्या तोंडाला पाणी सुटले.
त्याची भूक उसळून बाहेर आली. म्हातारी झोपडी बाहेर
गेल्यावर तो न राहून झोपडीत शिरला. भांड्याजवळ गेला. तो भांड्यातून एक चिकनचा तुकडा काढणार तोच, तिथे म्हातारी
टपकली. म्हातारीने त्याला पाहिले आणि मोठ्याने ओरडली.
कलारीने तिथून धूम ठोकली. म्हातारीने त्याचा पाठलाग
केला,पण ती त्याला पकडू शकली नाही.
कलारी धावत धावतच त्याच्या घरी आला. त्याने सगळे काही आपल्या आई-वडिलांना
सांगितले. त्यांनी पहाडाच्या दिशेने पाहिले, तेव्हा तिथून मोठी वाफ उठत होती.
त्या दिवसानंतर त्या म्हातारीने बाजारात
येऊन कधी सूप विकले नाही.कुणी तिला पाहायला पहाडावरदेखील
जाऊ शकला नाही. कलारीने तिच्याविषयी सांगितल्यापासून सगळेच तिला
घाबरत होते. पण अजूनही लोक पहाडावर ढग पाहिला की म्हणतात, “ ती पहा,त्या जादूच्या भांड्यातून वाफ निघालीय.”
No comments:
Post a Comment