Sunday, September 16, 2018

प्रतिस्पर्ध्याचे अनुकरण करू नका


     चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्व आणि ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे प्रमुख जॅक मा ( वय 54) यांनी 10 सप्टेंबरला आपल्या वाढदिवशीच रिटायरमेंटची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी डेनियल झेंग यांना आपला उत्तराधिकारी नेमला आहे. एका वर्षानंतर कंपनीची संपूर्ण जबाबदारी झेंग यांच्या हाती असणार आहे. बिल गेट्स यांना आपला आदर्श मानणार्या जॅक मा यांनी या पुढचे आयुष्य शिक्षणक्षेत्रात घालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

     जॅक मा सांगतात की, बिल गेट्स यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी कधी त्यांचा इतका श्रीमंत होऊ शकत नाही,पण त्यांच्या अगोदर रिटायर मात्र होऊ शकतो. जॅक मा स्वत:ला अजूनही तरुण समजतात आणि नवीन काही तरी करण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात परतण्याचा निर्णय  याचसाठी घेतला आहे,कारण यापूर्वी म्हणजे सुरुवातीला त्यांनी इंग्रजीचा शिक्षक म्हणून काम केले आहे. चीनच्या पूर्व भागातील झेजियांग प्रांतातल्या हांगझोऊ येथे एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना आयुष्यात स्थीर होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. त्यांना 30 ठिकाणी नोकरीसाठी लायक समजले गेले नाही. अर्थात त्यांना तिथे नोकरी मिळाली नाही.पण त्यांनी हार कधी मानली नाही.
     ज्यांनी ज्यांनी त्यांना नोकरी लायक समजले नाही, त्यामध्ये  केएफसीसारख्या नावाचादेखील समावेश होता. नव्वदच्या दशकात इंटरनेट क्रांती झाल्यावर त्यांनी आपला कारोबार सुरू केला. त्यानंतर जे काही घडले, ते चमत्कारापेक्षा वेगळे नाही. आपला उत्तराधिकारी निवडल्यानंतर मा यांनी कंपनीच्या शेयरधारकांना, कर्मचार्यांना आणि ग्राहकांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कधी कधी असं काही घडतं की, त्यामुळे आपल्याला सर्वोत्तमचा शोध घ्यावा लागतो. पण आपल्याला ठाऊक असायला हवं की, आपल्याला पहिल्यांदा योग्य माणसांचीआवश्यकता असते, सर्वोत्तमची नाही. त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर मी आनंदी राहू शकलो नाही तर मग मी माझ्या कर्मचार्यांना कसा बरं आनंदी ठेऊ शकणार? ते म्हणतात, आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धीकडूनही शिकले पाहिजे. पण अनुकरण करायचे नाही.
     जॅक मा यांनी निर्माण केलेली अलीबाबा ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. शेयरच्या किंमतीच्या आधारावर कंपनीचे मूल्य जवळपास 420.8 अब्ज डॉलर ( सुमारे 30 हजार 284 अब्ज रुपये) आहे. अलीबाबाला या स्तरावर पोहचवण्यासाठी जॅक मा यांना काही कमी संघर्ष करावा लागला नाही. ते गरीब कुटुंबातले होते. पण खूप धडपड्या होते. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्या डोक्यात इंग्रजी शिकण्याचे फॅड शिरले होते. ते सायकलवर स्वार होऊन एका हॉटेलात जायचे आणि पर्यटकांना फिरवून आणायचे. या बदल्यात त्यांना पैसे मिळायचे,पण याहीपेक्षा सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इंग्रजी शिकण्याची संधी मिळायची. यामुळेच ते इंग्रजीचे शिक्षकही बनले.
     जॅक मा यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, ती त्यांनी सोडली नाही. 1995 मध्ये ते एक द्विभाषी म्हणून अमेरिकेतल्या सिएटलमध्ये गेले आणि तिथे पहिल्यांदा इंटरनेट पाहिले. तिथे त्यांनी याहू सर्च इंजिनवर काही शब्द शोधले,पण त्यांना चीनचा एकही परिणाम आढळून आला नाही. इथेच त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, आता आपण याच क्षेत्रात काम करायचे.
चीनला परतल्यावर जॅक मा यांनी या क्षेत्रात हात आजमावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कामात त्यांना यश आले नाही. 1999 मध्ये त्यांनी आपल्याच वयाच्या, पठडीतल्या 17 लोकांना एकत्र जमवले आणि 2 हजार डॉलरमध्ये अलीबाबाचा पाया रचला. जॅक मा म्हणतात, मी दोन हजार डॉलर कर्ज घेऊन कंपनी सुरू केली, पण पर्सनल कॉम्प्युटर किंवा ई-मेल यांबाबतीत काहीच गंध नव्हता. त्यामुळे ते म्हणतात की, मी एका आंधळ्या माणसासारखा होतो, जो एका आंधळ्या वाघाच्या पाठीवर स्वार होता. आज त्यांची कंपनी ई-कॉमर्स, ऑनलाईन बँकिंग, क्लाउड कंप्युटिंग, डिझिटल मिडियामध्ये आपला कारोबार करत आहे.
     जॅक मा यांनी आजच्या युवकांना यशाचे काही महत्त्वाचे मंत्र सांगितले आहेत, ते त्यांनी जानून घ्यायला हवे. कारण त्यांच्या पुढच्या आयुष्यात यशाची पायरी चढताना या मंत्राचा चांगला आणि उपयुक्त असा उपयोग करता येणार आहे.
     लोकांचे महत्त्व- जॅक मा म्हणतात की, तुम्हाला काम करताना योग्य माणसांची आवश्यकता असते. तुम्हाला पैशाची कधीच कमतरता पडत नाही. मात्र तुमच्याजवळ स्वप्ने पाहणार्या माणसांची कमतरता असते. मरेपर्यंत का होईना, पण आपले स्वप्न पूर्ण करणारेच आयुष्यात यशस्वी होतात, अशा माणसांची आज गरज आहे.   
     वयानुसार काम- त्यांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत यश मिळाले नव्हते. पण आता ते वयाच्या 54 व्या वर्षी रिटायर होत आहेत. त्यांचे म्हणणे असे की, ज्यावेळेला तुम्ही 20 ते 30 दरम्यानच्या वयाचे असता, तेव्हा तुम्हाला चांगल्या बॉसच्या गोष्टी ऐकायला हव्यात. आणि अनुभवासाठी एकाद्या चांगल्या कंपनीत काम करायला हवे. ज्यावेळेला तुम्ही 30 ते 40 चे होता आणि तुम्हाला तुमच्यासाठी काही करायचे असेल तर करून टाका. वेळ दवडू नका. तुम्ही अपयशी ठरलात तरी तुम्ही स्वत:ला सांभाळू शकता. आणि ज्यावेळेला तुम्ही 50 ते 60 च्या वयाचे होता, तेव्हा तुम्हाला नव्या लोकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याच्या भूमिकेत काम करायला हवे.
     प्रयत्न सुरूच ठेवा-ते म्हणतात की, जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर तुम्हाला कशात संधी आहे, हे कसे कळणार? तुम्हाला यशाच्या कथांमधून शिकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पराभव कधीच स्वीकारायचा नाही. आजचा दिवस वाईट असू शकतो. उद्याचा दिवसदेखील खराब असू शकतो.पण परवाचा दिवस मात्र तुमचा असू शकतो, हे लक्षात ठेवा.
     आनंदी राहा- जॅक मा सांगतात की, मी स्वत:ला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण जर मीच आनंदी नसेन तर माझ्या सहकार्यांना,शेयरहोल्डर आणि माझ्या ग्राहकांना कसा आनंदी ठेवू शकेन? त्यामुळे प्रत्येकाने कितीही संकटे आली तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
     नवाचार, सृजनशीलता- तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याचे कधीच अनुकरण करू नका. तुम्ही जर दुसर्याचे अनुकरण केलात तर संपलात म्हणूनच समजा. किंमतीची नव्हे तर तुम्हाला सेवा आणि नवाचार याची स्पर्धा करायला हवी.



2 comments: