Sunday, September 9, 2018

स्मार्टफोनची सद्दी संपली?


     आकडेवारीवर विश्वास ठेवला तर आपला भारत देश एक स्मार्टफोन देश बनत चालला आहे, ही आशा संपुष्टात येताना दिसते. कारण ग्लोबल मार्केट इंटेलिजेन्स फर्म आयडीसीच्या एप्रिल-जूनच्या विक्रीचे आकडे सांगतात की, स्मार्टफोनच्या तुलनेत फिचरफोनची विक्री 1 कोटी 5 लाखाने अधिक झाली आहे. आणखी एका आकडेवारीवर आपण दृष्टीक्षेप टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की, ग्लोबल इंडस्ट्री एनालिसिस फर्म काऊंटरपॉइंटनुसार जानेवारी-मार्च 2018 आणि मागील वर्षाचे स्मार्टफोनच्या विक्रीचे आकडे समान राहिले आहेत. मात्र फिचरफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे.

     याचा अर्थ भारताला ज्या स्मार्टफोन युगाची प्रतीक्षा होती, ती संपुष्टात येऊ लागली आहे काय? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण आजदेखील देशात 50 कोटी लोक फिचरफोनचा वापर करताना दिसतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश फोनची साधने (हँडसेट)ही एक हजार रुपये अथवा त्याहीपेक्षा कमी किंमतीची आहेत. हा जो ट्रेंड आपल्याला दिसत आहे,तो डेटाच्या किंमती कमी आणि वॉयस कॉल मोफत होत असताना दिसत आहे. खरे तर हे आश्चर्यकारक म्हणायला हवे.
     आयडीसीच्या 13 ऑगस्ट 2018 ला जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-जूनच्या दरम्यान 3.35 कोटी फोन विकत घेतले गेले. जे गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत वीस टक्के अधिक  आहेत. पण धक्कादायक गोष्ट अशी की, या कालावधीत 4.4 कोटी फिचरफोन खरेदी केले गेले.  आणि हे आकडे गेल्या वर्षाच्या समान तिमाहीच्या तुलनेत 29 टक्के अधिक आहेत. याचा अर्थच असा की, आपल्या देशात स्मार्टफोन खरेदीसाठी चांगली संधी असतानादेखील लोक फिचरफोनला अधिक पसंदी देत आहेत. अर्थात याला बरीच कारणे आहेत. कारण स्मार्टफोनच्या किंमती लोकांना अजूनही परवडणार्या नाहीत. दुसरे म्हणजे आपल्या देशात अजूनही सर्वदूर इंटरनेटची सुविधा पोहचली नाही. बर्याच लोकांना स्मार्टफोनची आवश्यकताच नाही. अनेकांना मनोरंजनाव्यतिरिक्त स्मार्टफोनचा आणखी उपयोग होऊ शकतो,याची माहितीच नाही. काही स्मार्टफोन स्वस्त आहेत,पण त्यामुळे त्यांचा चांगला रिझल्ट मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अनेकांना फोनचा उपयोग फक्त बोलण्यासाठी, संपर्क करण्यासाठी झाला म्हणजे पुरे, असे वाटत आहे.
     रिलायन्स जिओफोनसारख्या उपकरणांनी आपल्या आकर्षक किंमतीमध्ये म्हणजे 501 रुपये (जुन्या फोनच्या एक्सचेंजसह)अथवा 1200 रुपयांपर्यंत ( ऑफरशिवाय) इंटरनेटची सेवा देत आहेत. यात वॉट्स अॅप, फेसबूक,युट्यूबसारखे अॅप उपलब्ध आहेत. मात्र यात थर्ड पार्टी अॅपची सुविधा नाही. हे हँडसेट पारंपारिक फिचरफोनपेक्षा थोडे चांगले म्हणजे पुढारलेले  आहेत. अर्थात हे फोन फिचरफोन आणि स्मार्टफोनच्या दरम्यानचे आहेत. यांना स्मार्टफोनच्या सुरुवातीच्या मालिकेतील समजले जाऊ शकते.
     परंतु, सगळेच फिचरफोन उपयोगकर्ते याचाही खर्च पेलू शकत नाहीत. कारण या हँडसेटचा किमान मासिक खर्च हा 149 रुपये आहे. काही फोन वापरणारे हे महिन्याला 30 ते 50 रुपयेच खर्च करू शकतात. आपण एका व्यक्तीचे यासाठी उदाहरण घेऊ. रमेश (नाव बदलेले आहे.) हे एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड आहे. त्यांनी एक्सचेंज ऑफरमध्ये 1.8 इंच स्क्रीन असलेला आणि फिजिकल कीपॅडचा मायक्रोमॅक्सचा 1000 (एक हजार) रुपये किंमतीचा खरेदी केला आहे. त्यांचा जुना फोनसुद्धा फिचरफोन होता. हा फोन तीन वर्षे वापरल्यावर काम करायचा बंद झाला होता. रमेश यांना स्मार्टफोनसाठी गुंतवणूक करणे म्हणजे वायफट खर्च करण्यासारखे वाटते.कारण ते ड्युटीच्यावेळी व्हिडिओ पाहू शकत नाहीत.
   
 फावल्या वेळात ते आपल्या मित्राचा स्मार्टफोन घेतात आणि व्हिडिओ पाहतात. ते म्हणतात, माझा फोन रोजची बोलण्याची गरज पूर्ण करतो. मग मी स्मार्टफोन का घेऊ? हा फोन मी का घ्यावा हे कळत नाही, मला मासिक डेटा काय असतो,याची माहिती नाही. फिचरफोन स्वस्त आहे. मी तो कधीही बदलू शकतो. 52 वर्षांचे सुरेश ज्यांचा 50 कोटीपेक्षा अधिक लोकांमध्ये समावेश होतो, ते आजदेखील फिचरफोन वापरतात.  आयडीसीच्या असोशिएट रिसर्च डायरेक्टर नवकेंद्र यांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनमध्ये जी वाढ होत आहे, ती अपेक्षेपेक्षा फारच कमी वेगाने होत आहे. आज 40 टक्के फिचरफोन उपयोगकर्त्यांजवळ असे फोन आहेत, ज्याची किंमत एक हजार रुपये आहे.
     आज मोबाईल डेटाचा वापर वाढला, डेटाची किंमत कमी झाली असली आणि व्हिडिओ वगैरे सामग्रीचा वापर वाढला असला तरी फिचरफोनचा वापर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 5 जुलैला रिलायन्स जिओ इन्फोकॉमने दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या 21.5 कोटी ग्राहकांपैकी 2.5 कोटी ग्राहक हे अजूनही फिचरफोन वापरतात. एअरटेलच्या 34 कोटी ग्राहकांपैकी 10 कोटीपेक्षा कमी ग्राहक ( 2018-19 च्या पहिल्या तिमाहीतीला आकडे) डेटा सर्व्हिसचा वापर करताना दिसतात.
     मोबाईल इंटरनेटचा वापर फक्त 27.5 टक्के लोकच करतात. उर्वरीत एक तर फिचरफोनचा वापर करतात किंवा स्मार्टफोन असूनही त्याच्या साधारणसेवेचाच ते वापर करतात. गुगलचे साऊथईस्ट एशिया आणि भारताचे वाइस प्रेसिडेंट राजन आनंदन यांच्या मतानुसार भारतातला बहुतांश भाग हा अजूनही इंटरनेटशी जोडला गेलेला नाही. त्यामुळे स्मार्टफोनची गरज मर्यादित लोकांपुरतीच राहिली आहे. स्मार्टफोनच्या वापरासाठी निरक्षता आणि वहन करण्याची क्षमता मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. एका गुंतवणूक फर्मच्या प्रमुखाच्या दाव्यानुसार कमीत कमी 30 कोटी भारतीय पुढच्या पाच वर्षात अजूनदेखील ऑनलाइन सेवांचा वापर करू शकणार नाही.
     50 कोटी लोक फिचरफोनचा वापर करतात.पण त्यातले जवळपास 20 कोटी लोक असे आहेत, जे एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फिचरफोन वापरतात. अन्य 30 कोटी लोक असे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार  साधारण बजेटचे स्मार्टफोन चांगले नसतात म्हणजेच वापरण्यालायक नसतात. याची मेमरी, स्टोरेज, स्पीड कमी असते. हे फार काळ टिकत नाहीत.शिवाय हे साधारण किंमतीचे स्मार्टफोन फिचरफोनपेक्षा नाजूक असतात. फिचरफोनची बॅटरी फार काळ चालते. त्याबाबत कोणतीच कीरकीर असत नाही. जवळपास तीन दिवस त्याची बॅटरी चालते तर स्मार्टफोनच्या बॅटरीसाठी दिवसातून दोनवेळा तरी चार्जला लावावी लागते. अर्थात नवे मॉडेल याबाबत आश्वासक करत असले तरीही ते या लोकांना आकर्षित करू शकलेले नाहीत.
     50 पैसे प्रति जीबी डेटाच्या या जगतात सर्वात कमी दर आणि फ्री वाइस सर्व्हिस असतानादेखील लाखो-करोडे लोक अजूनही फिचरफोनवरच समाधानी आहेत. माहितीगारांच्या म्हणण्यानुसार फिचरफोनचा वापर करणार्यांना स्मार्टफोन आपल्याला शिक्षण व आरोग्यसारख्या मूलभूत गोष्टींसाठी कशाप्रकारे उपयोगी पडू शकतो, याची कल्पना नाही. नव्याने स्मार्टफोन वापरणार्यांदेखील मनोरंजनाव्यतिरिक्त स्मार्टफोनचा काय उपयोग होऊ शकतो,याची माहिती नाही.
     इंटरनेट अँड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडियाक्षे प्रेसिडेंट सुभो रे सांगतात की, लोकांना स्वस्तातला स्मार्टफोन आणि फिचरफोन यापैकी कोणा एकाला निवडण्याचे स्वातंत्र्य दिले तर ते फिचरफोनचीच निवड करतील. एका चिनी हँडसेट कंपनीचा निर्माता सांगतो की, एंट्री-लेवलचे स्मार्टफोन ग्राहकांना निराश करतात. मेमरी, रॅम, स्टोरेज आणि कॅमेरा रिजॉल्यूशन इतके कमी असतात की, त्याचा वापर त्यांना निराश करून टाकतात. कारण त्यांच्या मनासारखे ते काम करत नाहीत.  त्यामुळे बोलणे या मूलभूत गरजेकडेच हे लोक  अधिक लक्ष देतात.
प्रारंभी स्तराचा (इंट्री-लेवल) स्मार्टफोन कमीतकमी साडेतीन हजाराशिवाय येत नाही. आणि आपल्याकडे 40 टक्के लोकांकडे एक हजारापेक्षा कमी किंमतीचा फिचरफोन आहे. शिवाय साडेतीन हजाराचा फोन म्हणावी अशी क्वालिटी देऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे हे फोन आणखी स्वस्त करणे अशक्य आहे. कारण चिपसेट, एलसीडी स्क्रीन,मेमरी या गोष्टी किंमतीच्या 60 टक्के हिस्सा कवर करतात.त्यामुळे ते आणखी स्वस्त विकता येत नाहीत. त्यामुळे कुठलीही कंपनी चांगल्याप्रकारचा स्मार्टफोन चार हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकू शकत नाही. मग हा स्मार्टफोन लोकांना परवडणार कसा? साहजिकच लोकांना फिचरफोनशिवाय पर्याय नाही. मग आपल्या भारतात स्मार्टफोनची क्रांति कशी येणार

1 comment: