Wednesday, September 26, 2018

वंशाच्या दिव्याचा नाद सोडा,मुलीला स्वीकारा


     स्त्री भ्रूणहत्या हा मानवतेला मोठा कलंक आहे. हा कलंक आपल्या भारताच्या माथी असा काही चिकटून बसला आहे की, तो निघायलाच तयार नाही. आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना आणि आज मुली मुलांपेक्षा काकणभरदेखील कमी नसताना अजूनही आपल्या देशातले लोक मुलींचा जन्म नाकारताना दिसतात. स्त्रीला गर्भातच मारण्याच्या घटना सातत्याने उजेडात येत आहेत.पण यावर कोणी गंभीर व्हायला तयार नाही. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्त्री भ्रूणहत्येचे पाप करणार्या दाम्पत्यांनी आजची पुरुषांची पिढी कुठी निघाली आहे,याचा अभ्यास करण्यासाठी निदान आपल्या आजूबाजूला तरी पाहायला हवे.वंशाचा दिवा हवा म्हणणार्यांनी आपल्याला मागच्या किती पिढ्यांची नावे सांगता येतील, हे एकदा आठवून पाहायला हवे. मुलगा असो अथवा मुलगी त्यांच्यावर चांगले संस्कार करा, त्यांना चांगले शिक्षण द्या. समाजात एक चांगला माणूस म्हणून त्यांना नाव कमवू द्या. त्यांनी नाव कमावले की, तुमचे नाव निघेल. वंशाचा दिवा म्हणून त्याचे लाड-प्यार करायचे. त्याला सगळ्या गोष्टीत सूट द्यायची आणि मुलीला घरकामाला लावायचे, हा कुठला न्याय आहे. पण कुठलाही धरबंद न राहिलेला वंशाचा दिवा काय दिवे लावणार आहे,याचा जरा पालकांनी विचार करायला हवा. आईची पेन्शन मिळावी म्हणून आईचे प्रेत फ्रिजमध्ये ठेवणारा वंशाचा दिवा आपल्याच देशात जन्माला येतो. चेकवर आईचा अंगठा पाहिजे, यासाठी हा दिवटा असे कृत्य करून जातो. हेच जर पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले असते तर प्रेताची अशी विटंबना झाली नसती.

     ग्रामीण भागापेक्षा शहरातल्या लोकांना मुली नको असल्याची आकडेवारी खरे तर मोठी चिंताजनक आहे. शिकलेली-सवरलेली माणसेच स्त्री भ्रूण हत्येचे पाप करतात, तेव्हा आपला देश नेमका कुठे चालला आहे, याचा अंदाज यायला हरकत नाही. भोंदूबाबांचे प्रस्थ ज्या पुरोगामी देशात वाढत आहे, त्या देशात त्यामुळे माणसांची क्रयशक्ती कमी होत चालली आहे. जाग्यावर बसून पैसे मिळवण्याची स्वप्ने आजकालच्या लोकांना लागली आहेत. मटका आकड्यावर कोट्यवधी रुपये उधळणारे युवक आपल्या देशात आहेत, त्यांना काम करायचे नाही आहे. मटका,जुगारसारख्या अवैध धंद्यांना हद्दपार करता येत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. अंमलबजावणी करणार्यांचे हात चिरीमिरीत अडकले असल्याने देशाच्या भवितव्याची चिंता कुणाला असणार आहे?
     एकिकडे वंशाच्या दिव्यासाठी स्त्री भ्रूणहत्येचे पाप केले जात असताना ज्यांना मुले नाहीत आणि ज्यांना दत्तक प्रक्रियेत मूल दत्तक घ्यायचे आहे,त्यांच्याकडून मात्र कौतुकाची कामगिरी होताना दिसत आहे. खरे तर मूल न होणे हा प्रकार किती वेदनादायी असतो, हे मूल नसलेल्या दाम्पंत्यांनाच माहीत! खास करून स्त्रियांना! कारण तिला समाजात वावरत असताना सतत टोमण्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या समाजात जो कमजोर आहे,त्यालाच आणखी कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आधार न देता त्याची आर्थिक, सामाजिक, मानसिक पिळवणूक कशी होईल, याकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे अलिकडे आपण खंबीर आहोत, असा आव आणून जगण्याची प्रथा वाढत चालली आहे. मात्र मनातील सल जाता जात नाही. त्याच्याने आणखी कोणत्या तरी गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. मन कधीही मनमोकले असावे,यासाठी कोणी काहीही म्हणोत,पण आपण खचून जायचं नाही, हे एकदा स्त्रियांनी शिकायला हवे.
     आनंदाची बाब सांगायचीच राहून गेली. ज्या दाम्पत्यांना मूलबाळ नाही, असे दाम्पत्य दत्तक घेताना मुलींना अधिक पसंदी देत आहेत, ही खूपच आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. विशेष म्हणजे आपला महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. दत्तक घेतलेल्या मुलांपैकी 80 टक्के प्रमाण मुलींचे आहे. 2016 मध्ये देशात दत्तक गेलेल्या मुलांची संख्या 3 हजार 210 होती, यात मुलींची संख्या 711 होती. यातही सर्वाधिक मुली म्हणजे 642 मुली महाराष्ट्रातल्या दाम्पत्यांनी दत्तक घेतल्या आहेत. यापाठोपाठ क्रमांक लागतो कर्नाटकचा! इथे 252 मुली दत्तक गेल्या आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 203 मुली दत्तक गेल्या आहेत. 2017 मध्ये 3 हजार 276 मुले दत्तक गेले. त्यात मुलींची संख्या आहे 1 हजार 852. दुसर्या एका बाजूने ही समाधानाचीच बाब म्हटली पाहिजे. मात्र यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मुली जन्माला याव्यात म्हणून सरकारकडून प्रयत्न चालले आहेत,पण ते नक्कीच अपुरे पडत आहेत. खरे तर शिक्षण पूर्ण करणार्या मुलींना शासनाने नोकरीची हमी दिली तर यात आणखी फरक पडू शकतो. यादृष्टीनेदेखील विचार व्हायला हवा आहे.

2 comments: