Sunday, September 23, 2018

गणेशोत्सवातला भक्तिभाव हरवला; उत्सव बदनाम झाला


     लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती रस्त्यावर आणताना ब्रिटिशांविरोधात लोकसंघटना उभी करण्याचे एक उदिष्ट ठेवले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर प्रबोधन आणि कला संस्कृतीच्या प्रदर्शनाचे व्यासपीठ म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले. सजावट,प्रबोधनपर देखावे, मूर्तीकला प्रदर्शन यातून उत्सव पुढे जाऊ लागला.पण अलिकडच्या काही वर्षात यातील हेतू, उदिष्ट संपुष्टात येऊ लागला आहे. देखावे कमी झाले.महाप्रसादाचे फॅड वाढले,मात्र वर्गणीच्या नावाखाली गुंडगिरी आणि गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीतला धागडधिंगा यामुळे हा उत्सव आता बदनाम होऊ लागला आहे. खरे तर याची बुद्धीवाद्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे.

     गेल्या काही वर्षात गणेश उत्सव मंडळांकडून देखावे, सजावटीला फाटा दिला जात आहे. याच्याही अगोदर कलापथके आपले सादरीकरण करायची,तीही संपुष्टात येऊन आता वीस-पंचवीस वर्षे होत आली. आता पाच-सहा वर्षात देखावा-सजावटींना फाटा दिला जाऊ लागला. लोकांच्या मंडळांचा देखावा पाहायला गर्दी करायचे. दोन-दोन दिवस त्यासाठी वेळ द्यायचे. खेड्यातले लोक आपल्या नातेवाईकांकडे सांगली,कोल्हापूर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यातल्या ठिकाणी गणेशोत्सवात मुक्कामाला जायचे. देखावे पाहून लोकांची मने तृप्त व्हायची. विविध विषयांवर हालते,फिरते आणि जिवंत देखावे पाहायला मिळायचे. त्यातले नाविण्य कौतुकास पात्र ठरायचे. पण अलिकडच्या काही वर्षात या सर्वच गोष्टींना गणेश मंडळे फाटा देऊ लागले. त्यामुळे लोकांचा देखावे पाहण्याचा उत्साहही कमी झाला.
     तालुकास्तरावरचे गणेश मंडळांचे देखावे आता जवळजवळ संपुष्टात आले आहेत. आकर्षक आणि मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि जंगी मिरवणूक आणि त्याबरोबर महाप्रसाद एवढाच काय तो सोपस्कार बाकी राहिला आहे. जिल्ह्यातल्या ठिकाणच्या सजावटी आणि देखावे यामध्येही जवळपास साठ ते सत्तर टक्के घट आली आहे. त्यामुळे पूर्वी जो देखावे पाहण्यासाठी गर्दी करण्याचा जो उत्साह होता, तो राहिला नाही. मात्र मंडळांनी या गोष्टींना फाटा देऊन महाप्रसादाचे फॅड आणले आहे. परिसरातील लोकांना गणेश मंडळाच्या मंडपात जेऊ घालायचे आणि उत्सवाचा उपचार पार पाडायचा,एवढेच सध्या सुरू आहे.
     महाप्रसाद देणं यात काही वाईट नाही.पण म्हणतात ना, भुकेल्याच्या तोंडी घास भरवल्याने येणारा तृप्तीचा ढेकर आत्म्याचीच शांती करणारा असतो. परंतु, गणेशोत्सव काळात जो महाप्रसाद वाटला जातो, तो काही पूर्वापार नाही. यानिमित्ताने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जर हा खर्च खर्या अर्थाने अन्नापासून वंचित असलेल्या लोकांसाठी वर्षभर राबवल्यास ते अधिक पुण्याचे ठरले असते. हा खर्च समाजातील गरजू लोकांसाठी झाला तर एक गोष्ट वेगळी होती. हा खर्च गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केल्यास खूपच चांगला परिणाम भविष्यात पाहायला मिळेल. वृद्धाश्रमासारख्या अनेक संस्थांना अन्नदानाची गरज आहे. त्यांच्यासाठी या पैशांचा उपयोग झाला असता.
     बरे, इतके करत असताना वर्गणी गोळा करण्याची पद्धत काही थांबलेली नाही. रस्ते अडवून, धाकदपटशा देऊन वर्गणी गोळा केली जात आहेच. अशा पद्धतीने गोळा केलेल्या पैशांतून महाप्रसाद दिल्याने कोणते पुण्य मंडळांना मिळणार आहे. कित्येक मंडळे महाप्रसादावर थोडा फार खर्च करून त्रासदायक, कानटळ्या बसणार्या आवाजात मिरवणुका काढण्याबरोबरच ललना नाचवणे आणि त्यापुढे बेभान नाचणे, यावर अधिक पैसा खर्च करीत आहेत. लोकांना अडवून वर्गणी गोळा करणे, ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून दुसर्यांना त्रास देणे, आरतीला पुढार्यांना बोलावून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा वर्गणी हासिल करणे अशा गोष्टींमध्ये आता वाढ झाली आहे. पुढार्यांना निवडणुका जिंकायच्या असल्याने अशा मंडळांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळावेच लागते. अशातून केलेल्या अन्नदानामागची पवित्र भावना राहते कुठे? त्यामुळे गणेश उत्सव आता बदनाम होऊ लागला आहे. यातून उत्सावाला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. उत्सवाला नवे विधायक वळण लावण्याची आवश्यकता असून मंडळांच्या कार्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा आहे. नाही तर उत्सवाचा मूळ हेतू हरवून फक्त उपचारच शिल्लक राहणार आहे.

1 comment: