मुंबईतील वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यु झाला.याची तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटली.असे असले तरी पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात.पोलिसांवर हल्ले करणारे सराइत गुन्हेगार नाहीत.सामान्य नागरिक आहेत. त्यामुळे ही माणसे इतकी हिंस्त्र का वागत आहेत,याचा विचार व्हायला हवा.पोलिसांवर हल्ले होतात याची अनेक कारणे आहेत. यातले पहिले कारण म्हणजे त्यांचा वचक कमी झाला आहे, दरारा संपला आहे, अशी एक समाजमनात भावना निर्माण झाली आहे आणि यातून आणखी एक लोकांच्या मनात भयशंका निर्माण झाली आहे,ती म्हणजे जेथे पोलीसच असुरक्षित आहेत तेथे सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित असणार ? अलीकडे पोलीस हा आपल्या व्यवस्थेत नेहमीच टिंगलटवाळीचा विषय राहिलेला आहे. आगोदरही पोलीस टिंगलटवाळीचा विषय होता,पण त्यावेळेस त्याच्या हातातल्या दंडुक्याचा दरारा होता. आज हातात बंदूक असलेल्या पोलिसांचा आदर, वचकदेखील वाटेनासा झाला आहे. राजकारणी तर या पोलीसांना आपल्या हातचे बाहुले असल्यासारखे वागवतात .आणि पोलीसदेखील तसे वागतात. अर्थात ते मजबूर असतात,कायद्याने आणि नैतीकतेने. मागे एकदा ठाण्यामध्ये एका उद्दाम राजकीय कार्यकर्त्यांने एका महिला पोलिसास भररस्त्यात मारहाण केली. विलास शिंदे यांना अशाच एका हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. शिंदे यांच्या हल्ल्यानंतर या घटना सुरूच आहेत. कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याकरिता कोणत्याही नागरिकावर कारवाई करण्याची शक्ती ज्यांच्या हाती आहे अशा पोलिसांवर आपण हात टाकू शकतो असे कोणालाही वाटू लागले आहे,हे वाटणे आणि तशी प्रत्यक्षात कृती होवू लागणे,ही समाजाच्यादृष्टीने भयंकर घातक आणि भीतीदायक आहे. राजकारण्यांसमोर नांगी टाकणारे पोलीस सर्वसामान्यांसमोर वाघ होतात आणि त्यांना वाटेल तशी वागणूक देतात हा पोलिसांबाबत राग आहे. एरवी सराईत गुन्हेगार नसलेली माणसेही किरकोळ कारणावरून हल्ले करायला लागले आहेत. या प्रश्नचिन्हाला कारणीभूत आपली राजकीय व सामाजिक व्यवस्था आहे हे नीट लक्षात घेतले पाहिजे. पोलिसांवर हल्ले होण्याला आता दूसरे कारण आहे,ते म्हणजे भ्रष्ट पोलीस आणि त्यांची यंत्रणा. चिरीमिरीसाठी प्रत्येकापुढे हात पुढे करणारे पोलीस त्यांच्याविषयीचा आदर नाहीसा करत आहेत,हे सर्वात मोठे कारण आहे. पोलीस दलात चिरीमिरी संस्कृती फोफावली आहे. पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्ती राजकारण्यांच्या फायद्याच्याच असतात. तेव्हा त्यांचे व्यवस्थित साटेलोटे चाललेले आहे,असा समज सर्वसामान्यांचा झाला आहे,असे म्हणायला जागा आहे.आणि त्यातून सर्वच पोलिसांची प्रतिमा ढागाळत चालली आहे.पण पोलीस चिरिमिरी खातात, भ्रष्टाचार करतात, निरपराधांना छळतात म्हणून त्यांची ‘इज्जत’ राहिलेली नाही आणि म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जातात किंवा केवळ पोलिसांबद्दलच्या अनादरातून वा द्वेषातून हल्ल्यांचे प्रकार घडतात,असे नव्हे .ते पोलिसांना दिलेले आणि म्हणून राज्यव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. गल्लीतल्या टपोरी तरुणांमध्येच नव्हे, तर क्वचितप्रसंगी सर्वसामान्य गणल्या जाणाऱ्या माणसांमध्येही असे आव्हान देण्याचे धाडस यायला लागले आहे,याचा खरेच विचार व्हायला हवा आहे. माणसे व्यवस्थेप्रति हिंस्र बनत तर नाहीत ना,हे तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे.
No comments:
Post a Comment