Friday, November 1, 2019

सगळीकडे भानगडीच भानगडी


काही दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की, मी कुठल्या भानगडीत तर पडलो नाही ना? खूप विचार केल्यावर मी या निष्कर्षाला आलो की, नाही!आपण कुठल्याच भानगडीमध्ये पडलो नाही. मला माझा अभिमान वाटला. मग पुन्हा विचार केला , का आपण कुठल्या भानगडीत पडलो नाही? हा विचार करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. अर्जून महाभारताच्या रणांगणावर आपल्याच नातेवाईकांविरोधात लढायला उभा होता. त्याच्या पुढे प्रश्न पडला होता की, आपल्याच माणसांचा संहार कसा करायचा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला,'ब्रम्ह सत्य,जगत मिथ्या'. याचा अर्थ हे दिसणारं जग सत्य नाही,ब्रम्हच सत्य आहे. त्यामुळे अर्जुना तू या जगताच्या भानगडीत पडू नकोस. हे सर्व फसवं आहे. आजच्या कलियुगात तर आपल्याला फारच विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. आजची मुलं आईबापांना एक तर आश्रमात पोहचते करत आहेत किंवा वाऱ्यावर सोडत आहेत. माझ्याच परिसरातील एक घटना आहे. आईवडिलांना गावाकडेच टाकून मुले पुण्या-मुंबईला स्थायिक झाले आहेत.
आईवडिलांना खर्चायला पैसेसुद्धा पुरवायचे बंद केले होते. बिचारे आईवडील दोन-चार एकर जमीन पडीक टाकून दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीला जात होते आणि आपल्या पोटाची खळगी भरत होते. जमीन रस्त्याकडेला होती,पण पाणी नसल्याने जमीन पडीक ठेवावी लागली होती. वर्षांपूर्वी रस्त्याचा महामार्गात समावेश झाला. रस्त्याच्या विस्तारात शेतकऱ्याची जमीन गेली आणि त्याचा मोबदला म्हणून पाच कोटी रुपये मिळाले. पैसा पाहून मुलांचे डोळे दिपले. बायका पोरं घेऊन ती गावाकडं आली. बापानं पोरांना दादच दिली नाही. गावातले पंच बोलावले. पैसे फिक्सला टाकले. पोरांना त्यांच्यासमक्ष म्हणाला,'आमच्या मृत्यूनंतर जो शिल्लक राहिल तो पैसा तुम्हाला मिळेल. आता एक छदामही मिळणार नाही.' मुलं आल्यापावली गेली. आता त्यांच्या वडीलाने रस्ताकडेलाच टुमदार बंगला बांधला आहे. घरात नोकरचाकर आहेत.  आईवडील ठेवीच्या व्याजावर आरामात जगताहेत. इथे कुणाचं नशीब कधी फळफळेल सांगता येत नाही. पण मुलांचे निष्ठुर वागणे,बापाला किती जिव्हारी लागले होते, हे लक्षात येते.
आपल्या देशात जिवंत माणसांना वाऱ्यावर सोडून मंदिरातल्या देवाला पुजाण्याचा प्रघात वाढला आहे. जिवंत माणसांपेक्षा दगडाला पुजले जात आहे. मला वाटतं , मानवतेला सोडून दगडाला महत्त्व देण्याची ही परंपरा प्राचीन असावी. या भानगडी पारंपरिक चालत आल्या आहेत. भानगडीत पडणं तसं सोपं काम नाही.समोर घडणारी घटना आणि समोर असलेल्या वस्तूची लालसा अशीच असते. आता भानगडीत पडणं धोक्याचंही असतं. प्राचीन ग्रंथांमध्ये याची अनेक उदाहरणे आहेत. कुणी राजसत्ता मिळवण्याच्या भानगडीत पडले, कुणी पैशाच्या मागे लागले ,कुणी सौंदर्याच्या मागे. या सगळ्यांना शेवटी दुःखच मिळाले.मी कुठल्याच भानगडीत नाही, असे छातीठोकपणे सांगत असलो तरी जे या भानगडीत पडले आहेत,त्यांचे काय? ते तर आरामात सुख उपभोगताहेत.आज मोठ्यातला मोठा नेता काय किंवा छोट्यातला छोटा नेता काय, सगळेच खुर्चीच्या भानगडीत अडकले आहेत.आज प्रत्येक राजकारणी जनतेची सेवा, गरिबांची सेवा करण्याचे तोंडाने सांगत असले तरी प्रत्येकाला एक मत,खुर्ची आणि त्यातून मिळणारे फायदे याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतात. खरे तर  आजकाल कुठल्या ना कुठल्या भानगडीत पडण्याची फॅशनच झाली आहे. काही लोकांना तर आपण कधी या भानगडीत पडलो,हेही कळत नाही. भानगडीत पडल्यावर नंतर हेच लोक त्याचे समर्थन करताना दिसतात. काहीजण आपापल्या कुवतीनुसार भानगडीत पडतात.छोटा व्यक्ती छोट्या भानगडीत, मोठा व्यक्ती मोठ्या भानगडीत. गावातले काही लोक प्रामाणिकपणा,सहज जीवन, संवेदनशीलता सोडून नकारात्मक राजकारणाच्या भानगडीत पडतात.हे लोक स्वतः मध्येच अडकून पडतात. इकडे डॉक्टर पैशाच्या मोहापायी शहारांमध्येच अडकून पडतात आणि गावातले लोक देव-देवर्षीच्या मागे लागतात. गावात दुःखाच्या फेऱ्यात अडकलेला जे काही उरलं सुरलं आहे,ते गोळा करून शहराकडे धाव घेतो, आणि तिथल्या गर्दीतल्या फेऱ्यात अडकून पडतो. ना गावाकडे जाता येत नाही, ना शहरात सुखाने जगता येत नाही. का उगाच या भानगडीत पडलो, असे म्हणताही येत नाही.
बायका सोन्याच्या मोहाच्या भानगडीत पडतात आणि सोने गोळा करायला लागतात. काही ठग सोने दुप्पट करून देतो म्हणून किंवा पॉलिश करून देतो म्हणून सोने घेऊन पोबारा करतात. इकडे बायका मात्र हात चोळत बसतात. जिकडे पाहावे तिकडे आपल्याला भानगडीच दिसतात. पोरं पोरी प्रेमाच्या भानगडीत आईबापाला विसरतात. व्यापारी पैशाच्या भानगडीत लोकांना फसवतात. राजकारणी, ठेकेदार  विकासाच्या नावावर लोकांना लुटतात. सगळे वेगवेगळ्या भानगडीतून लुटालुटीचाच खेळ करताना दिसतात. भानगडीत धोके आहेत, पण त्यातूनही फायदे  आहेत, हे लोकांना माहीत आहे. म्हणूनच काहीजण भानगडीतून कुठल्या कुठे पोहचतात.
काही लोक प्रामाणिकपणाचा फायदा घेतात.काहीजण काहींच्या अप्रामाणिकपणावर नजर ठेवून असतात.कुणाला प्रसिद्धी हवी असते. काहींना प्रसिद्धीतून पैसा,पैशांतून सन्मान हवा असतो. सन्मानामागे सर्व काही दडले जाते.सणासुदीला ग्राहक ऑफरच्या भानगडीत पडतात. सेलचे आकर्षण असते. लोकांना कळत असतं, पण त्याला मोहापायी भानगडीत पडावेच लागते. राजकारण सगळ्यांनाच जमत नाही.दुसऱ्याला फसवण्याच्या नादात स्वतः च कधी फसलो कळत नाही.  भानगडीत सुख नसतं. त्यामुळे कुठल्या भानगडीत पडण्यापेक्षा आपला आपल्यावर विश्वास हवा. या विश्वासावर प्रामाणिकपणे चालताना कुठल्या भानगडीत पडण्याचा प्रश्नच पडत नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment